Primary tabs

कोषांतर - परीक्षण

share on:

"कोषांतर" या गझलसंग्रहाला आजमितीला १२ मानाचे पुरस्कार लाभले आहेत.यात स्मृतीशेष उ. रा. गिरी पुरस्कार, मराठी ग्रंथ संग्रहालय ठाण्याचा श्रीस्थानक साहित्य पुरस्कार व सोलापूरचा मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार असे दोन तीन महत्त्वाचे उल्लेखनीय पुरस्कार होत.याबद्दल त्यांचा द्वारकानाथ संझगिरी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कारही झाला आहे. यातच त्याचे महत्व जाणवते.
आता संग्रहाबद्दल...
'स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे'

कवी ग्रेस यांच्या या ओळी ठायी ठायी आठवत राहतात कोषांतर  वाचताना.

सुप्रिया मिलिंद जाधव यांचा हा पहिलाच गझलसंग्रह एका नजरेतच डोळ्याचे पारणे फेडतो.सर्वप्रथम अत्यंत देखणे मुखपृष्ठ मन वेधून घेते. अंडी, अळी, कोष आणि सुंदर रंग पंखांवर ल्यालेलं फुलपाखरू ....काटेरी तारांपलीकडे भिरभिरणारं!
त्यातली पहिली तार झुकलेली.
सुप्रियाताईंच्या आयुष्यातले हे सगळे टप्पे सगळ्या अवस्था सहज व्यक्त होतात इतकं बोलकं मुखपृष्ठ आहे नावडकर आर्ट्स यांनी केलेले.
प्रस्थापित गझलकार भूषण कटककर (बेफिकीर) त्यांचे मार्गदर्शक, गुरू. त्यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभलेली आहे.
वेदनेपासूनच काव्याची निर्मिती होते. संसाराच्या ऐन बहरातच साथीदार गमावण्याचे दुःख त्यांच्या गझलेत ठायीठायी दिसते आणि त्याचा तितकाच अपरिहार्यपणा, केलेला समंजस स्वीकार. झेललेले एकाकीपण,मनाची हळवी अवस्था अतिशय हळुवारपणे येते. उत्कटपणेही.
मनाचा मनाशी चाललेला संवाद,त्यातले भावनिक चढ-उतार
एकटेपणातून झालेले चिंतन यांचे प्रतिबिंब त्यांच्या शेरांमधे दिसते.
एक शेर पाहा की,
"झगडते ताठ मानेने जगाशी
वरमते मी स्वतः ला भेटल्यावर"
निसर्गातील प्रतिमा प्रतिकांचा चपखल वापर त्यांच्या शेरात आढळतो.
 "तडाखा वादळी पचवून झुलते
 किती खंबीर आहे ही डहाळी
असाच
ऐलतिरावरती मी पैलतिरी तो राही
हतबलतेच्या लाटा स्पर्शत दोघांनाही"
हा एक शेर. एकाच व्यक्तीच्या दोन बाजू या दोन शेरात दिसून येतात. वास्तवाचा खंबीरपणे सामना करून पुन्हा उभं राहणं हे डहाळीच्या रूपकातून त्या सुचवतात. तर मृत्यूमुळे दोन तीरांवर दोघे अशी स्थिती आणि एक जीवघेणी हतबलता.
"काजव्यांमुळे लखलखणारे झाड पाहिले
दृष्य मनोरम अलभ्य असले सूर्यालाही"
हा शेर वाचून एकदम भाऊसाहेब पाटणकरांची आठवण होते.
पुराणातील प्रतिमा त्या चपखलपणे वापरतात.
"उर्मिला विरहात जळते एकटीने
जानकीचा गाजतो वनवास नुसता"
हा शेर किंवा
"राधिकेला वाटतो हेवा तिचा
ह्यात मीरेचे खरेतर साधले" हा शेर.

"हिरकणीइतकीच फरफट रोज होते
फक्त अमुचा पाठ अभ्यासात नाही"
हा त्यांचा सिग्नेचर शेर आहे.
अशी इतिहासाची वर्तमानाशी सांगड त्या घालतात.
समाजातील लोकांचा स्त्रियांच्याबद्दलचा दृष्टिकोन, वागण्याबोलण्यातली विसंगती त्या शेरातून मांडताना म्हणतात...
"वेल ही वृक्षाविना दिसल्याबरोबर
ओंडका अन ओंडका बहरून आला
"असाच अजून एक शेर आहे.
"पांढरे होताक्षणी हे भाळ माझे
रंग दुनियेचा खरा समजून आला"

शेर वाचल्यानंतर अर्थाचे अनेक तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे.
ही दोन त्याची उदाहरणे पाहा.
"असावा राहिला कच्चा
घडा अपसूक फुटतो का"
किंवा
"तो काहीही बोलत नाही
सर्व समजते त्याला बहुधा"

समस्त स्त्रीजातीची कैफियत त्या शेरात मांडतात की,
"येथली स्थित्यंतरे त्याच्याचसाठी
आजही आहे तिच्यास्तव तोच साचा"
किंवा हा अजून एक शेर
"गती संपली संपला गोडवाही
कशास्तव नदी सागराला मिळाली?"
विचाराअंती अर्थाच्या छटा मनात निर्माण होतात.

संवेदनशील मनाने टिपलेले अनुभव निसर्गातील, समाजातील घटना एका आवेगाने त्या मांडतात. अंतर्मनातील विचारांचा थांग लावण्याचा त्यांचा प्रयत्न सतत जाणवत राहतो.
"प्रवाहाला वळवणे शक्य आहे
स्वतःला ठाम कर अपुल्या मतावर"
हा शेर किंवा लोकांची दुटप्पी वागणूक पाहिल्यावर लिहिलेला हा शेर
"कोणाला मी नकोनकोशी
कोणी नाते सांगत जाते"
कोणालाही सहजपणे भावणारा असा हा शेर आहे.
व्यवहारी जगात हळव्या मनाची होणारी घुसमट व्यक्त करताना त्या म्हणतात,
"जगाने पाहिले माया किती सोडून गेला
जगाने पाहिले नाही किती त्याहून गेले"

एक स्त्री म्हणून जगताना डावलले जाण्याचे, गृहीत धरण्याचे अनुभव काही नवीन नाहीत पण ते अनुभव त्यातलं दुःख त्या नेमक्या शब्दात दोन ओळीत थेट पोचवतात. शेर आहे की
"आयुष्य म्हणजे डांव पत्त्यांचा
ती हारते त्याची रमी होते"
असाच अजून एक
"त्याच्या गुन्ह्याची नोंदही नाही
ती शिंकली की बातमी होते"

त्यांच्या लिखाणात निसर्ग विज्ञान इतिहास पुराण समकालीन असे सगळे विषय दिसतात.No means no! पिंक सिनेमाची आठवण यावी असा एक शेर त्यांनी लिहिलेला आहे की
"फोडून उकल करण्याची तू नकोस घेऊ तसदी
"नाही"  या शब्दामध्ये कुठले जोडाक्षर नाही"
त्यांची गझल टाळी मिळवणारी नसून ती अभ्यासू रसिकाला विचारास भाग पाडणारी वाटते.
विषयविविधतेने हा गझलसंग्रह नटलेला आहे.
कोणत्याही माध्यमातून व्यक्त झाले तरी लिहिल्यानंतर वाचकाच्या मनात त्या लिखाणाचा अंश उरला विचारात शब्द उतरले तर ते खऱ्या अर्थाने यशस्वी लेखन. सुप्रियाताईंचे शेर ह्या कसोटीवर खरे उतरतात.
गझल हा  काव्यप्रकार,हाताळायला अवघड मानला जातो. सहज थेट काळजाला भिडणारे शेर लिहिणे, कोणाचा प्रभाव न पडू देता आपली स्वतंत्र शैली टिकवणे महा कठीण. त्यात स्त्री गझलकारांची संख्या अगदीच मोजकी. पण तरीही त्या आपला वेगळा ठसा उमटवतात.

हा गझलसंग्रह अशा काळात आला आहे की
आज सुरेश भटांपासूनचा कालावधी लक्षात घेतला तर स्त्रियांच्या गझलही विपुल प्रमाणात लिहिली जातेय.व्हाँट्सअप, फेसबुक, इंटरनेट अशा सोशल मिडियावर लगेच प्रसिद्धी मिळविणे सहजसोपे आहे. पण अनेकजणी त्या लाटेवर स्वार होऊन लिहितात टाळीबाज तत्कालीन प्रसिद्धीसाठी लिहितात असे सुजाण वाचकांना जाणवतेच पण सुप्रिया अगदी अपरिहार्य झाल्यावरच लिहितात त्यामुळे ती पोटतिडिक वाचकालाही भिडते.त्यामुळेच ही गझल अस्सल आहे सच्ची आहे. आणि मुख्य म्हणजे काळाच्या कसोटीवर टिकणारी आहे. त्यांनी स्त्रीचे आयाम गझलेला  बहाल केले आहेत हेच साहित्यक्षेत्राताला मोठे योगदान आहे.
जे विचार उदाहरणे त्या या संग्रहात मांडतात ती चिरकाल टिकणारी आहे. आज लिहिले आणि उद्या विसरून गेलो अशा या गझल नाहीत. काळाच्या कसोटीवर टिकणारे लिहिणे हेच खऱ्या साहित्याचे लक्षण आहे हेही मोठे योगदान होय. यातील विचार मनात रेंगाळत राहतात.विचार करायला भाग पाडतात.
हा गझलसंग्रह सर्वार्थाने वाचनीय आहे यात शंका नाही. मराठी गझलसंग्रहांमध्ये
कोषांतरने महत्त्वपूर्ण स्थान पटकावले आहेच
पहिल्या संग्रहासाठी त्यांनी सुमारे आठ वर्षे इतका प्रदीर्घ वेळ घेतला आहे. स्त्रीच्या भाव विश्वापलीकडचे अनेक विषय त्या पुढील संग्रहात हाताळतील असा विश्वास त्यांनी मनोगतात दिलाच आहे.
पण पुढील संग्रह लवकर येवो हीच शुभेच्छा!!!

स्वाती यादव.          
पृथ्वीराज प्रकाशन
१७.०१.२०१८.      किंमत : ₹ १५०/-

 

No comment

Leave a Response