Primary tabs

नाॅस्टाल्जिया - जुनून

share on:

 

 यूट्यूबमुळं मला माझ्या लहानपणी ज्या क्लासिक सिरीयल लागायच्या त्या पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत आणि त्यातील त्या वेळी सुटलेले... न समजलेले भाग होते ते अगदी नीट समजून पाहणं हा एक आनंदाचा भाग आहे. फरमानबद्दल मागंच लिहिलं आहे.

     सिनेव्हीस्टाजनं तयार केलेली जुनून ही दूरदर्शनवरील सिरीयल १९९३ ते १९९५ पर्यंत चालू होती. परिक्षीत सहानी, बीना, बेंजामिन गिलानी, स्मीता जयकर, दीना पाठक, फरिदा जलाल, सईद जाफरी, नीना गुप्ता, अर्चना पूरणसिंग, मंगल धिल्लन राजेश पुरी, किट्टू गिडवानी ही स्टारकास्ट असलेली ही सिरीयल. बारकाईनं बघताना काय काय जाणवलं... बीना, स्मिता जयकर या अतिशय सुंदर दिसल्या आहेत. अभिनयही संयत आणि छान. नीना गुप्ता - प्रचंड गोड काम केलंय तिनं आणि ते दिखाऊ गोड नाही वाटत. फरिदा जलाल ही एव्हरग्रीन आई. सईद जाफरींचे बाबा तर खरोखर छान. आजकाल लाफ्टर शोमध्ये किंचाळत हसणारी अर्चना पूरणसिंग इथं मात्र इतकी सात्विक दिसलीय!!! आणि सगळ्यात भारी काम झालं आहे ते मंगल धिल्लनचं. एका रियासतीचा राजकुमार आई-बाप इंग्रजांकडून डोळ्यांदेखत मारले गेल्यानंतर ठोकरा खात मोठा होतो. त्याचा जो अॅटीट्यूड आहे तो फार आवडला. तो गर्व, घमेंड किंवा ताठा नाही तर स्वाभिमान आहे. या सुमेरनं आपल्याशी  लग्न करावं म्हणून हट्टून बसलेली घमेंडखोर मुलगी किट्टू गिडवानी आणि रेखाशीच लग्न ठरलंय तर तिच्याशीच करणार हा बाणेदारपणे सांगणारा सुमेर राजवंश.. अशी उपकथानकं असूनही ही सिरीयल बोअर झाली नव्हती..

      बीना आणि परिक्षीत सहानी हे राजनगर रियासतीचे राजा राणी. बरीच वर्षे त्यांना मूल बाळ नसतं. एका नर्तकीबरोबरच्या राजाच्या प्रेमातून सुमेरचा जन्म होतो आणि त्याला जन्म देते नी ती नर्तकी मरते. मोठ्या मनाने राणी सुमेरचा स्वीकार करते. सुमेरचं लग्न रेखाशी लहानपणीच ठरवलेलं असतं. आणि एका हल्ल्यात त्याच्या डोळ्यासमोर आई-वडिलांना इंग्रज गोळ्या घालून मारतात. सुमेर कशीबशी मिळतील ती कामं करत मोठा होतो. मुंबईत एका हाॅटेलमध्ये तो कॅप्टन म्हणून काम करत असतो. त्याच हाॅटेलमध्ये रीमा (नीना गुप्ता) रिसेप्शनिस्ट असते. सुमेर ( मंगल धिल्लन) तिच्यावर सख्ख्या बहिणीसारखं प्रेम करत असतो. तिच्याच घरी तिच्या आई बाबांसोबत राहत असतो. रेखा (अर्चना पूरणसिंग) आणि सुमेरनं लग्न करून आपल्याच घरी राहवं अशी रिमाच्या आई-बाबांची (फरिदा जलाल, सईद जाफरी) इच्छा असते. पण हाॅटेलमध्ये काम करताना कुणाकडूनही टीपसुद्धा न घेणारा मानी सुमेर त्याला तयार होत नाही.

       नियतीच्या मनात काही वेगळेच असते. रिमा आणि आदित्य धनराज (शशी पुरी) यांचं एकमेकांवर प्रेम असतं. आदित्य हा धनराज ग्रूपच्या मालकाचा मुलगा. दहाच वर्षाचा असताना त्याचे वडील गेलेले असतात.  त्याची आई ( स्मिता जयकर) एवढा मोठा कारभार लालाजींच्या (विष्णू शर्मा) भरवशावर ठेवून असते. याच इंडस्ट्रीच्या एक्सपान्शनसाठी आदित्य परदेशी जातो आणि त्याच वेळी रिमाला त्याच्यापासून दिवस गेलेले असतात. त्याच्याशी संपर्क साधण्याचे तिचे सगळे प्रयत्न फसतात. शेवटचा पर्याय म्हणून ती त्याच्या आईला जाऊन भेटते. पण तिला त्या हाकलून देतात आणि आपल्या पोटातील बाळाचा बाप कोण? या गुपितासह रिमा आत्महत्त्या करते. तिच्या जाण्याच्या धक्क्याने तिचे वडीलही हार्ट अटॅकने जातात.

      सुमेर आणि रेखा रिमाच्या आईसह त्यांच्या घरी राहायला येतात. रिमाच्या बाळाचा बाप कोण हे तिथं अचानक समजतं. आदित्य धनराजला यातील काहीही माहिती नसते. तो परदेशातून परत येतो आणि रिमाच्या घरी जातो. तिला रितसर आईला भेटवण्याचा त्याचा प्लॅन असतो. पण तिथं सुमेरकडून त्याला समजतं की आपल्या आईमुळेच रिमानं‌ आत्महत्त्या केली. मग सुरू होतो एका सूडाचा प्रवास. बिल्डर बनलेला सुमेर.. आदित्य धनराजला मातीत मिसळायची प्रतिज्ञा करतो..ते वेड..ते ध्येयच होतं सुमेरच्या आयुष्याचं!!! ते पूर्ण होतं का.. हे तुम्ही बघा.. त्याचं‌ टायटल साँग आजही मनात रेंगाळतं..इतक्या वर्षांनंतरही त्या ओळी मनात घोळतात..

कहाँ दिल जले तो सुकूं चाहीये..

जुनूं के लिये बस जुनूं चाहीये!!!

- मुक्ता कुलकर्णी

No comment

Leave a Response