Primary tabs

भविष्यातील मुलास पत्र !

share on:

प्रिय भविष्यातील माझ्या मुला,

   आज मी तुला एका अनोख्या ठेवीची ओळख करून देईन म्हणतो. ही ठेव आमच्यासाठी फार महत्त्वाची होती, म्हणून आम्ही ती हृदयापासून जपून ठेवली होती. आज ती तुझ्याकडे सुपूर्द करण्याची वेळ आली आहे.
   लहानाचे मोठे होत असताना आमच्या बऱ्याच गोष्टी पुरवण्यासाठी अवलंबून राहत होतो. खाण्यापिण्यापासून रंग आकार समजून घेण्यापर्यंत. आमच्या अवतीभोवती असलेलं जग कसं आहे, किती आहे हे समजून घेण्यासाठी शरीराला असलेली पाच इंद्रिये वापरून जग समजून घेत होतो. पण अवतीभोवती असलेलं जग समजण्यासाठी असलेल्या वेळ, वय, दृष्टी या व्यवधानांची सीमा असलेलं हे जग आस्वादायचं कसं? अनुभवायचं कसं?
  मग एक वेगळं इंद्रिय चिकटवून घेतलं स्वतःला. तसं ते डोळ्यांशी जोडलेलं पण तरीही वेगळी दृष्टी देणारं. त्यासाठी एक लिपी आत्मसात करावी लागली, एक भाषा आत्मसात करावी लागली. त्वचेला एक नवीन इंद्रिय फुटलं, लेखणी नावाचं. त्यातून स्त्रवू लागला आमचा इतिहास, आमचा वर्तमान, आमचं भविष्य त्यातून आकार घेत होतं.
  यथावकाश आम्ही त्याला नाव दिलं, पुस्तक. कोरे कोरे कागद, त्यावर उमटलेली शाई, अन् सुरेख आवरण. नव्या पुस्तकाचा वास घेताना आमच्या नाकाला गुदगुल्या होत. असंख्य पानांमध्ये आपली एक वेगळी गोष्ट सांगणार हे पुस्तक. प्रत्येक पुस्तकाचा नवा वास, नवा स्पर्श. छोट्या छोट्या चिल्ल्यापिल्ल्यांची याच्याशी ओळख व्हायची ती झोपी जाताना राजा राणीच्या गोष्टी ऐकताना. कधी सुंदर सुंदर रंगीत चित्रे पाहताना. मग एकदा हे पुस्तक स्वतःहून वाचायला यायला लागलं की जो आनंद होई! लहान मुले त्या रम्य जगात हरवून जात. छोट्या मेंदूतली मोठी कल्पनाशक्ती, अद्भुत काहीतरी पाहायची तहान असं सगळं भागे त्यातून.
  मग जसं जसं कोवळ्या वयाचे धुमारे मोठे होऊन नव्हाळीने नटलेला अधमुरा पक्वपणा यायला लागला, तसं हे विश्व दूर गेलं, अन् आजूबाजूच विश्व, त्यातील सुखदुःखे जाणीव रेषा गडद करत लक्ष वेधून घेऊ लागली. आमच्या मेंदूत आता अवघ विश्व पुरेना झालं. आम्ही माहितीच्या साठ्याद्वारे नवी नवी क्षितिजे काबीज केली. यथावकाश या पुस्तकाच्या रूपात काही बदल झाले. तरीपण त्या सहाव्या इंद्रियाची जागा हे नवीन रूप घेऊ शकले नाही. त्या कागदी पुस्तकाचे सिंहासन संस्कृतीच्या इतिहासात आजही अजिंक्य आहे. मानवाच्या भवतालातली सगळी क्रांती अन् अनुभव विश्वातील सगळी उत्क्रांती या पुस्तकात मौजुद आहे. माणसाच्या विचार शैलीत झालेले बदल, त्यांना दिशा वेळोवेळी या पुस्तकांनी दिली आहे. या पुस्तकांत मांडलेल्या विचारांपुढे अनेक बलाढ्य समाजसंस्था झुकल्या, राजसत्ता झुकल्या.अनेक विचारवंतांना जिवंत जाळण्यात आले, काहींनी जिवंतपणी अग्निदिव्य अनुभवले.
  विचारांद्वारे क्रांती घडवणारा माणूस जातो, पण पुस्तकाच्या रूपाने मागे उरतो. विचार ही संस्कृतीची एक अमूल्य ठेव आहे.याने माणसाच्या माणूस असण्याला अर्थ मिळाला. त्याला इतर प्राण्यांपासून वेगळे स्थान निर्माण करता आले. नैतिक अनैतिकता पुस्तकाच्या आधारावर ठरली, तशी माणूस असण्याची व्याख्याही. केव्हातरी मी भूतकाळात हरवून जाईन.माझे सगळे संचित इतिहासजमा होईल. माझ्या खुणा इतक्या पुसट होतील, की पृथ्वीच्या पोटातून त्या शोधून काढाव्या लागतील. हे सारे अटळ, अलिखित भविष्य आहे, जे खरे करण्यासाठी मला जावे लागेल.
   मात्र जाण्यापूर्वी तुझ्या हातात ही अनमोल वस्तू देऊन जाईन म्हणतो. कदाचित तू ही वस्तू पाहणार नाहीस, कदाचित केव्हातरी तुला तिची झलक पाहायला मिळेल, तीपण काचेच्या आड, बंद कपाटात. कदाचित तुला हे समजणार नाही की ही वस्तू आपल्या, म्हणजे आमच्या अन् अप्रत्यक्षपणे तुमच्याही विकासाच्या वाटचालीत किती महत्त्वाची होती. तू इतिहासाची पाने चाळशील (म्हणजे असा वाक्प्रचार तरी वापरात असेपर्यंत) तेव्हा सहज तुला काही प्रश्न पडतील. या प्रश्नांनी तुझ्या जीवनात फार काही फरक पडेल का, याविषयी मला कल्पना नाही. कदाचित जीवन एवढ्या स्तरापर्यंत बदलून गेलेलं असेल, की जुने संदर्भ लागू होणार नाहीत. पण माहितीचा साठा एकत्र असण्याची गरज तुम्हाला जाणवणारच आहे तोपर्यंत पुस्तकाला मरण नाही.
  कदाचित या माहितीच्या साठयाचं रूप वेगळं असेल.आमच्या काळातच याची चाहूल लागली होती, आम्ही एका छोट्या चिपच्या आधारे ही मोठी दुनिया आक्रसवून एका छोट्या प्रतलावर आणली.
 तुमच्या काळात या प्रतलाचे रूपांतर कदाचित वेगळ्या परिभाषेत वाचल्या जाणाऱ्या पुस्तकात होईल. काळाच्या पोटात काय असेल काय माहीत?
 ही ठेव स्मरणात ठेव.
 कदाचित तुझीही हीच शेवटची स्मृती असेल, ब्रम्हांड नावाच्या एका भल्याथोरल्या ग्रंथात स्मरणासाठी ठेवलेल्या पुस्तकखुणेप्रमाणे.
तुझाच
वर्तमान.
© सिद्धी नितीन महाजन.

No comment

Leave a Response