Primary tabs

मिशन इम्पॉसिबल भाग ५

share on:

 

 ट्रेकसाठी ग्रुपने जो गड निवडला, तो अगदी तासा-दीड तासाच्या अंतरावर होता. साकेत, मिथिला, अद्वैत आणि वि-ऋचा, सगळेच ट्रेकला जाणार होते. खरं तर स्वप्नीलही यावा, असं बाकीच्यांना वाटत होतं. पण त्या घटनेनंतर तो थोडासा depressed होता. त्याची समजूत काढता येईल का, अशी शंका सगळ्यांनाच वाटत होती.

``मी स्वप्नीलशी बोलतो!`` अद्वैत म्हणाला, तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

``Seriously?`` ऋचानं अद्वैतला विचारलं.

``Yes, of course, I am serious! माझ्यामुळे त्याला त्रास झालाय, माझ्यामुळे त्याला दुखापत झालीय, मी त्याची माफी मागेन. I will say sorry आणि मी त्याला ट्रेकला येण्यासाठी रिक्वेस्ट करेन.`` अद्वैतनं सांगितलं, तेव्हा सगळ्यांनाच बरं वाटलं.

``तू खरंच स्वप्नीलशी बोलणारेस?`` मिथिलानं पुन्हा न राहवून विचारलं.

``Yes dear!`` अद्वैत म्हणाला. मग हळूच साकेतला डोळा मारत तो म्हणाला, ``I hope, मी तिला Dear म्हटल्याबद्दल तुला काही...``

``नाही रे, वेडा आहेस का?`` मिथिलानंच साकेतच्या वतीनं अद्वैतला उत्तर देऊन टाकलं.

``थॅंक्स!`` अद्वैतला खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं.

``आणि तुला काय वाटलं, साकेत मला dear म्हणतो? किंवा दुसऱ्या कुणी मला म्हटलं, तर jealous होतो तो? त्याला काय फरक पडतोय?`` मिथिलानं लगेच तोंड वाकडं करून टोमणा मारला.

``आणि तुला तरी काय फरक पडतोय? Bye the way, तुला कशाला dear म्हणू मी? फार तर Reindeer म्हणेन!`` साकेत उगाचच तिला चावला आणि ती पिसाळली. विषय भलतीकडेच गेला म्हणून सगळ्या ग्रुपनं कपाळावर हात मारून घेतला.

ट्रेकच्या दिवशी भल्या पहाटे स्वप्नील पाठीला सॅक लावून ठरलेल्या ठिकाणी हजर झाला, तेव्हा सगळ्यांनाच भारी वाटलं. जे काम इतर कुणाला जमणं अवघड वाटत होतं, ते अद्वैतनं करून दाखवलं होतं.

``मस्त वाटतंय यार तुला बघून!`` विराज स्वप्नीलला म्हणाला.

``करेक्ट आहे!`` ऋचानं लगेच अनुमोदन दिलं.

``तू आता अख्ख्या ट्रेकमध्ये पुन्हा `करेक्ट आहे` म्हटलंस ना, तर तुला तिथून चालत घरी पाठवून देऊ, बघ!`` या वेळी स्वप्नीलनं तिला दम दिला.

ऋचा एवढंसं तोंड करून विराजकडे बघत राहिली.

``त्याच्याकडे बघत बसू नकोस. हे पटतंय की नाही, सांग!`` स्वप्नील तिच्याकडे रोखून बघत म्हणाला.

``करेक्ट आहे!`` ऋचानं पटकन उत्तर दिलं आणि स्वप्नीलसकट सगळे खिदळायला लागले.

``साकेत कसा आला नाही अजून?`` मिथिला म्हणाली. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की साकेत खरंच आला नाहीये. अरे, आपण त्याला कसे विसरलो, असं त्यांना वाटून गेलं.

``माझ्याही डोक्यातूनच गेलं. मी बघून येऊ का?`` अद्वैत म्हणाला.

``चल, मी पण येतो तुझ्याबरोबर!`` स्वप्नीलही पटकन म्हणाला आणि अद्वैतच्या बाईकच्या मागे बसू लागला.

``ए नको! मिथिला, तू येतेस का? तुला माहितेय ना त्याचं घर? ``मिथिलाकडे बघत अद्वैतनं बाईकला किक मारली. मिथिलाचं लक्षच नव्हतं. तिनं साकेतला फोन लावला होता.

``हा उचलत का नाहीये?`` ती वैतागली.

``उचलत नाहीये का? ओह... मग काहीतरी कारण असेल. आपण त्याला डिस्टर्ब नको करायला. आपण जायचं का?`` अद्वैतनं सुचवून बघितलं.

``ए नको यार! साकेतशिवाय ट्रेकला मजा नाही!`` विराज म्हणाला.

``करेक्ट आहे!`` ऋचानं लगेच त्याच्या वाक्याला शेपूट जोडलं.

``बरं, मग आता काय करू या?`` अद्वैतनं सगळ्यांकडे बघून विचारलं. तेवढ्यात समोरून साकेतच्या बुलेटचा आवाज आला आणि काही क्षणांत तो समोर येऊन उभा राहिला. मिथिला धावत त्याच्याकडे गेली आणि त्याच्या पाठीत प्रेमानं एक धपाटा घालून म्हणाली, ``नालायक! होतास कुठे एवढा वेळ?``

``अगं, मला उशीर का झाला माहितेय का, काल रात्री...`` साकेत उत्साहानं काहीतरी सांगत होता, तेवढ्यात अद्वैत त्याला अडवत म्हणाला, ``ए, आता इथेच सगळं रामायण सांगत बसलास, तर उशीर होईल. निघायचंय आपल्याला. चला गाईज, निघू या ना?``

``येsssस!``करून सगळ्यांनी दंगा केला.

``चल बस मिथिला!`` साकेतनं तिला खूण केली, तेवढ्यात अद्वैत तिला अडवत म्हणाला, ``अं हं...! आज मिथिला माझ्याबरोबर येणार!`` त्याचं वाक्य ऐकून सगळे चमकून अद्वैतकडे बघायला लागले.

(क्रमशः)

 

 अभिजित पेंढारकर

 

No comment

Leave a Response