Primary tabs

नाॅस्टाल्जिया

share on:

 

टिव्ही आला.. दिवाणखान्यात असलेल्या रेडिओची जागा त्यानं घेतली. पण आत्तासारख्या तीन त्रिकाळ सिरीयल, सिनेमा यांचा पाऊस पाडत नव्हता. ठराविक वेळ कार्यक्रम, बातम्या आणि मग रात्री दहा वाजता टिव्ही बंद होणारे ते सोनेरी दिवस होते. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. त्यामुळं मोनोपाॅली. चांगलं सकस कथानक असेल तरच त्या सिरीयल निवडल्या जात. आश्चर्याची गोष्ट अशी की फक्त तेराच भागांना परवानगी असायची. म्हणजे कादंबरी कितीही मोठी असली तरी कथानक १३ भागातच संपवावी लागायची सिरीयल.

     एक मात्र खरं... दूरदर्शनवर लागणाऱ्या त्या सिरीयल्सना दर्जा होता. आत्तासारखा चमचमाट नव्हता, पण कथा चांगल्या नी आटोपशीर होत्या तेरा भागात निकाल... फालतू वाढाचार नाही. दिखावा नाही.. सुटसुटीत..       अशाच काही दर्जेदार मालिका त्या वेळी होऊन गेल्या. त्यांची ही मालिका...नाॅस्टाल्जिया. साधारणपणे १९८५ नंतर टिव्हीवर लागणाऱ्या बहुतांश सिरीयल चांगल्या होत्या. सास बहू कुरकुर होती, पण कुरघोड्यांचे एपिसोड नव्हते. विवाहबाह्य संबंध हायलाईट केले नव्हते. त्या कथा, ती माणसं आपली वाटायची. अशाच काही आवडलेल्या सिरीयल्सची ही मालिका नाॅस्टाल्जिया.

आज पहिला लेख  - फरमान

 

      माझ्या आवडत्या सिरीयलमध्ये कायम वरच्या नंबरवर आहे फरमान. कंवलजीत आणि दिपीका देशपांडे यांच्यासह विनीता मलिक, नवीन निश्चल, राजा बुंदेला यांनी आपल्या सहजसाध्या अभिनयानं फार वर्षं माझ्या मनात घर केलं आहे. अशी मला प्रचंड आवडलेली सिरीयल फरमान.  मी नववीत असताना ती दर सोमवारी रात्री नऊ वाजता लागायची. दिपीका देशपांडे व कंवलजीत यांच्या नकळत फुललेल्या प्रेमाची ती कथा.

 

       ऐमन शाहाब (दिपीका देशपांडे) ही एक अनाथ मुलगी असते.  बडे सरकार जमरुद महल (विनीता मलिक) ही नवाब घरातील सून असते. त्यांना असिस्टंट  हवी असते, म्हणून पेपरमध्ये जाहिरात देतात. ऐमन हैदराबाद येथे नोकरीसाठी त्यांच्या फरमान या हवेलीत येते. बेंगलोरहून निघालेली उपाशी ऐमन हवेलीत पोहोचते. मुलाखतीनंतर तिला बडे सरकार आपल्याकडं नोकरीला ठेवून घेतात. बशारत नवाब (राजा बुंदेला) बरोबर तिची चांगली मैत्री होते. एका लग्न समारंभात बडे सरकार तिला आपल्यासोबत खास हैदराबादी वेशभूषा करवून घेऊन जातात. नवाबांचे रीतरीवाज माहीत नसलेली ऐमन चुकून पुरुषांच्या बाजूच्या व्हरांड्यात जाऊन उभारते. तिथं अचानक एक अतिशय देखणा राजबिंडा तरुण येतो आणि तिला मिठी मारतो. संतापून ऐमन त्याला मुस्कटात देते. झालेली गोष्ट ती कुणालाही सांगत नाही.

     दुसरे दिवशी बडे सरकार आणि त्यांचा लवाजमा दांडेलीला रवाना होतो. तिथं पेंटिंग करत असताना तोच तरुण तिला परत दिसतो. तो आपला पाठलाग करत आला आहे अशा समजुतीने ऐमन त्याला परत फटकारते. तो ही तिची जमेल तेवढी फिरकी घेतो. ती बडे सरकारना ही गोष्ट सांगायची ठरवते आणि त्याचवेळी तो तरुण तिथे येतो आणि ऐमनला तेंव्हा समजते की तो तरुण म्हणजे बडे सरकारचा एकुलता एक मुलगा अजहर नवाब आहे.

    पहिल्याच भेटीपासूनच अजहर नवाब आणि ऐमन यांच्यात बेबनाव सुरू होतो. पण नंतर नंतर नकळत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. अजहर नवाबची मैत्रीण रेहाना, बशारत नवाब, त्याची बहीण शाहना, आई तस्लीम पाशा यांची वेगवेगळी उपकथानकं जराही बोअर करत नाहीत. पुढे फरमान या हवेलीचं अजहर नवाब हाॅटेल बनवतो. त्याचं नांव ही आलमपनाह ठेवतात. ऐमन चिडून अजहर नवाबला आलमपनाह म्हणत असते. ऐमनचं चांगलं काम तिला जनरल असिस्टंट ते जनरल मॅनेजर या पदावर नेतं. आणि चित्रकार असलेले अजहर नवाबचे काका वकार जंग आणि बडे सरकार यांचं त्यांच्या लग्नापूर्वी असलेलं प्रेम नंतर बडे सरकार आणि अजहर नवाब यांना कसं त्रासदायक ठरतो हे ऐमनला समजतं. अजहर नवाबचं शाहनाशी लग्न होणार आहे असं समजून ती आलमपनाह सोडून जायचं ठरवते आणि अजहर नवाब आपल्या प्रेमाची कबुली देतो अशी हॅपी एंडींग असलेली ही सिरीयल कितीही वेळा पाहिली तरी मला कंटाळा येत नाही.

    यात कंवलजीतने अजहर नवाब फार छान साकारला आहे. कितीतरी शाॅट्समध्ये तो अमिताभ बच्चनची काॅपी करतो असं वाटतं. पण त्याने हैदराबादच्या नवाबाचे उर्दू उच्चार इतके परफेक्ट केले आहेत की बस!!! दिपीका देशपांडेचं नवखेपण क्वचितच जाणवतं. तिच्या प्रेमात पडलेला बशारत नवाब आधी एकदम खोडकर आणि नंतर जबाबदार मिलचा मॅनेजर राजा बुंदेलानं‌ फार छान उभा केला आहे. नवाबिण असूनही त्याचा गर्व नसलेली, कठोर पण प्रेमळ बडे सरकार विनीता मलिकनी  छान साकारली आहे. खरंच कितीही वेळा पाहिली तरी बोअर न होणारी ही प्रेमकहाणी. तुम्ही बघा...आणि सांगा आवडली का!!

- मुक्ता कुलकर्णी

 

No comment

Leave a Response