Primary tabs

मिशन इम्पॉसिबल भाग - २

share on:

 

अद्वैतचे मित्रमैत्रिणी त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले, तेव्हा त्याची अवस्था बघून त्यांनाही वाईट वाटलं.

अद्वैतच्या एका पायाला फ्रॅक्चर झालं होतं. पाठीला मार लागल्यामुळे महिनाभर बेडरेस्ट घ्यावी लागणार होती. नशीबाने, त्याच्या डोक्याला काही मार लागला नव्हता.

``अद्वैत, हे कसं काय झालं रे?`` मिथिलानं कळवळून विचारलं.

``टेरेसच्या कठड्यावर बसलो होतो तेव्हा तोल गेला!`` अद्वैतनं आईकडे बघून सांगितलं, पण त्या सांगण्यात काही दम नाहीये, हे साकेतच्या तेव्हाच लक्षात आलं. त्यानंच मग अद्वैतच्या आईवडिलांना विश्रांती घेण्याच्या निमित्तानं घरी पाठवलं आणि तो अद्वैतपाशी आला.

``अद्वैत, तू काही तोल वगैरे जाऊन पडलेला नाहीस, मला माहितेय!`` साकेत त्याला म्हणाला, तेव्हा अद्वैत थोडा दचकला.

``नाही रे, खरंच..!`` त्यानं खुलासा करायचा प्रयत्न केला.

``गप!`` साकेतनं त्याला मैत्रीच्या हक्कानं दटावलं.

``आता खरं काय ते सांग!`` साकेत त्याला म्हणाला. मिथिलाही त्यांचं बोलणं ऐकत शांतपणे बाजूला उभी होती.

``अं...अरे यार, खरं सांगायचं तर माझ्या गेममधलं ते एक मिशन होतं. टेरेसवर उभं राहून आपली हिंमत दाखवून देणं.`` अद्वैतनं दबक्या आवाजात स्पष्ट केलं.

``वेड लागलंय का तुला?`` मिथिला त्याच्यावर ओरडून म्हणाली.

``सॉरी यार! तू ओरडू नको ना माझ्यावर!`` अद्वैत थोडा हळवा झाला होता.

``अगं, खरंच. आपण हिंमत दाखवली, तरच आपल्या शत्रूची वाट लावता येते, असं होतं ते मिशन!`` अद्वैतनं मग सगळंच सांगून टाकलं.

साकेत आणि मिथिलानं त्याला चांगलाच डोस दिला. हा गेम खेळणं किती वाईट आहे, त्यामुळे शरीरावर, मनावर कसा परिणाम होतो, त्याच्या आईवडिलांना किती त्रास झाला असेल, असं सगळं ऐकवलं, तेव्हा अद्वैतला खरंच वाईट वाटलं.

`आम्ही तुला यातून बाहेर पडायला मदत करतो, पण तू असा वेड्यासारखा वागू नको,` असं मैत्रीच्या हक्कानं दोघांनी त्याला सांगितलं, तेव्हा अद्वैतला बरं वाटलं. मिथिलानं त्याचा हात हातात घेऊन त्याला दिलासा दिला. अद्वैतच्या डोळ्यांत पाणी आलं. साकेतला बाहेर कामासाठी जायचं होतं, म्हणून तो निघून गेला आणि मिथिला अद्वैतबरोबर थांबली. तिनं त्याची काळजी घेतली, त्याला औषधं दिली, त्याच्याशी गप्पा मारून त्याचं मन रमवण्यासाठी तिनं प्रयत्न केले.

पुढचे काही दिवसही मिथिला हॉस्पिटलला नेमानं येत राहिली. साकेत, वि-ऋचाही अधूनमधून यायचे, पण मिथिला आल्यावर अद्वैतला जास्त बरं वाटायचं. ती त्याला सगळ्या प्रकारची मदत करायची. त्याला आधार देऊन हळूहळू बेडवर उठून बसायलाही तिनं मदत केली आणि अद्वैत महिनाभरात बरा झाला.

 

``welcome back!`` सुमारे दीड महिन्याच्या गॅपनंतर अद्वैत पहिल्यांदा कॉलेजला आला, तेव्हा सगळ्या ग्रुपनं त्याचं मनापासून स्वागत केलं. त्यांची कॅंटीनमध्ये एक जोरदार पार्टीसुद्धा झाली.

``thanks to all of you!`` अद्वैतनं सगळ्यांचे आभार मानले.

``special thanks to my dear friend मिथिला!`` असं म्हणून अद्वैतनं तिचे आभार मानले आणि तिला स्वतः तयार केलेला एक बुके प्रेझेंट केला. सगळ्यांनी मिथिलाला चिअर केलं.

कॉलेजमधलं आयुष्य पुन्हा आनंदात सुरू झालं. हळूहळू दिवस पुढे सरकायला लागले. अद्वैतही आता बऱ्यापैकी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागायला लागलाय, असं ग्रुपला वाटायला लागलं होतं. अद्वैतला बरं करण्यात मिथिलाचा मोठा वाटा होताच.

`एकदा मी पण असाच आजारी पडतो, म्हणजे तरी तू माझ्याशी नीट वागशील!` साकेतनं तिला टोमणा मारला तेव्हा मिथिला पुन्हा उचकली.

`मी तुझ्याशी नीट वागत नाही का? बरं, ठीकेय. उद्यापासून दाखवते तुला!` असं म्हणून ती `बाय` करून निघून गेली आणि साकेत `बावळट आहे ही!` असं म्हणून स्वतःशीच हसत राहिला. पुढच्याच क्षणाला पुन्हा मिथिलाचा मेसेज आला, तेव्हा त्याला वाटलं, आता ही मस्का मारायला मेसेज करत असणार.

`ताबडतोब माझ्या घरी ये. आपल्याला स्वप्नीलकडे जायचंय. त्याच्यावर कुणीतरी अटॅक केलाय!` 

`स्वप्नील?` साकेतला धक्का बसला. मग त्याला अचानक आठवलं, आजच अद्वैतचा स्वप्नीलशी काहीतरी वाद झाला होता. म्हणजे अद्वैत पुन्हा त्या गेमच्या नादाला लागून?

हा विचार मनात आल्यावर साकेत मनाशीच विचार करायला लागला.

(क्रमशः)

 

अभिजित पेंढारकर.

No comment

Leave a Response