Primary tabs

आजीची पोतडी!!!

share on:

आजीची गोधडी असते... पोतडी कुठून आली? आमच्या आजीची एक अदृश्य पोतडी आहे आणि ती आम्हा सर्वांना सोबत करते. तर आमची आजी हे प्रकरण जरा न्यारंच होतं. एकदम खडूस स्वभावाची ही बाई डाॅनच होती. तिच्या कंपूत असलेल्या सगळ्या म्हाताऱ्या एकजात खडूस. त्यांच्या सुना त्यांना जाम टरकून असायच्या. आमची आई.. काकी यांनी तिला सर म्हणायची सोय नव्हती म्हटलंच चुकून सर; तर ही लगेच तर्र होऊन घराची रणभूमी करून टाकेल असली वांड बाई होती ती!!!

येता जाता तोंडून वेगवेगळ्या म्हणी हत्यारांसारख्या खेळवत समोरच्या माणसाला गारद करायचं अद्भूत कसब तिच्याकडं होतं. कामं सोडून गप्पा छाटत, टीव्ही बघत कुणी बसलं की तिचा पारा चढायचा आणि जो पट्टा सुरू व्हायचा की तिच्यासमोर कुणी थांबायला मागायचं नाही. तरी बरं, त्या वेळी फक्त दूरदर्शन आणि आकाशवाणी हे दोनच पर्याय होते. आत्तासारखी ढीगभर चॅनल्सनी खंडीभर रेडिओ स्टेशन नव्हते नाहीतर या आजीनं काय नासधूस मांडली असती याची कल्पनाही करवत नाही मला.

एकदा या आज्जी गैंगमधल्या कुणीतरी गप्पात सांगितलं..अमकीची सून माहेरची गरीब घरातील आहे. नी इथं कसा माज दाखवत आहे. गप्पाष्टक संपवून आजी आली आणि त्या ज्या मनुताई होत्या त्यांच्या सुनेचं खास कौतुक सांगितलं.

"जिनं बघितला नाही दिवा तिला दिला आवा!"

 मग दुसरं काय होणार?

"सुखात पडली बेंडकुळी अन खायला मागती पुरणपोळी!"

"आमच्या घरी दे म्हणावं पाठवून आठ दिवसांत सरळी करून सोडते!" आम्ही नातवंडं च्याटमच्याट….

आमच्या कुमारला काकांनी मोठ्या हौसेनं फुगा आणला. तर या पठ्ठयानं तो विळीवर चिरला.. आत काय आहे बघायचं होतं म्हणून!! झालं आजी लगेच. "गळा कापला खोकला मिटला. काही खेळणी बिळणी आणून द्यायच्या लायकीची नाहीत आमची कार्टी!"

तरी आई बाबांना राहवतं कुठं.. सचिनला रेल्वे आणली. एक राऊंड झाला असेल..नंतर रेल्वेचा आवाज येईना म्हणून काकी बघायला गेली तर हा रेल्वेचा डबा खोलून बसलेला.."अगं, रेल्वेत बसलेली माणसं कुठं गेलीत बघत होतो!'

"हजारदा सांगून झालंय खेळणी आणू नका पोरांना.. खाय-प्यायला आणा.. ही पोरं आहेत होय? भुतं मेली.. पण ऐकणार कोण? थेर नाचतंय थेरात नी कोंबडं नाचतंय केरात!!!" आजी कडाडली.

मग एकदा एक भांडीवाली लावली. नवीन होती. आठ दिवसांत परिस्थितीचं गाणं गाऊन तिनं पैसै मागून घेतले नी गायबच झाली. एकत्र कुटुंबात ढीगभर भांड्यांचा पडलेला डोंगर पाहून जे चवताळली म्हातारी.."अक्कल कमी त्याला भांडवल थोडं नी म्हैस देऊन घेतलं घोडं.. मला सांगायचं तरी होतं पैसे देताना!"

ती नेहमी म्हणायची, "काय गोड? तर पैसा गोड.. माणूस नाही. काय गोड? तर काम गोड.. माणूस नाही!!! " हे अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून बरंचसं होरपळून निघालेलं तत्त्वज्ञान होतं. हे कळायचं ते वयही नव्हतं. आजोबा वकील होते. माणसांचा सतत राबता. माझ्या एका काकांना तिच्याशी वाद घालायला फार आवडायचं. ती चिडायची.

"लाज ना लज्जा..बघा माझी मज्जा!" म्हणायची. समाजसेवेची आवड आहे असं कुणी म्हटलं की तिचं डोकंच फिरायचं. म्हणायची,"का गं बाई रोडकी तर गावची उसाभर थोडकी!" आळशी माणसांचा तिला विलक्षण तिटकारा होता.

कामाचा, श्रीमंतीचा देखावा करणारे लोक चेष्टेचा विषय असायचा. हसून म्हणायची,"घरावर नाही कौल आणि रिकामा डौल!"

कामधंदा सोडून फालतू कामं करत वेळकाढूपणा करत असताना कुणीही दिसलं की तिचा ठरलेला बाण,"काम नाही घरी नी सांडून भरी!"

छोटी नातवंडं बाबा, काका, दादा यांना शिवलेली. आयांकडं जायला किरकिर करताना दिसली की हसून म्हणायची, "पळत्या घोड्यावर सगळे स्वार.. बश्शा घोड्याला कोण पुसं? आया स्वयंपाकघरात कोंबणार आपल्याला हे कळतं बरं पोरांना.."दिवसभर रांधा वाढा उष्टी काढा यात अडकलेल्या सुनांना निक्षून सांगायची, "बारा नंतर स्वयंपाकघर बंद. नाहीतर काम नाही काडीचं आणि फुरसत नाही घडीची असं होतं!"

 

आजोबा गेल्यानंतर कुणी कुणी भेटून गेले. एक नातलग बरेच उशिरा आले. जवळपास दोन तीन महिने झाल्यानंतर आले. ती बोलली वगैरे. पण ते गेल्यावर गुगली टाकली, "म्हातारा मेला हिवाळ्यात.. रडू आलं पावसाळ्यात!!"

शेजारी शहांचं फार मोठं खटलं होतं. त्यांच्या फिरतीवर असलेल्या काकांना म्हणायची,"हौसेने केला नवरा.. त्याच्या पायाला भवरा!!" एकदा कुजबुज सुरू होती म्हणजे या सासवा-सुना काहीतरी बोलत होत्या. तोवर पोरं आली. लगेच यांनी विषय आवरता घेतला तरी आजीनं सिक्सर मारला होताच, "घरची करते देवा देवा..बाहेरचीला चोळी शिवा!"

तिच्या कंपूतल्या रुक्मिणीबाई यांना आम्ही रुक्मिणीआजी म्हणायचो आणि दुसऱ्या मनुताई. मनुताई फार गरीब स्वभावाच्या होत्या असं आम्ही म्हणत असू. तर आजी ,"हम्म...गरीब. तोंड गायीचं नी लाथ गाढवाची आहे तिची!" अशा एकेक म्हणी म्हणजे हसून हसून लोटपोट करायच्या. आजही आम्ही भावंडं जमलो की सहजावारी या म्हणी आजही आम्ही बोलतो. नव्यानं ऐकणारे लोक हसून लोटपोट होतात. आणि आम्ही त्यांचं हसणं एंजॉय करतो.

- मुक्ता कुलकर्णी

No comment

Leave a Response