Primary tabs

"समृद्ध जाणिवा"

share on:

भूक लागते तेव्हा...

 

आपल्या जेवणातील ते अर्धेच जेवण खातात. अर्धे त्या कुत्र्याला आधी खाऊ घालतात अन मग स्वतः  खातात. दिवसभर आजूबाजूच्या ज्येष्ठ मंडळीशी संवाद साधत असतात.  कुणाचे पाय चेपून देतील तर कुणाला हवं नको ते पाहतील. आमचं बरंच काम ते  सोप करायचे.

" तुम्हाला भूक लागत नाही का?  त्या कुत्र्याला कशाला टाकता?" मी वैतागून बोललो.

"तो मुका जीव आहे. तुम्ही मला खायला देताय, त्याला कोण देईल? सगळे बंद असल्याने बिचारे उपाशी फिरायचे. मी दोन घास देतोय, तर कायम माझ्यासोबत फिरत आहे. माणसापरि हे मुक बरं... म्हणून मी माझ्यातला घास  त्याला देतोय." असं बोलून तो थोडेसे गूढ हसला. काळ्यापांढऱ्या दाढीतून डोकावणारे त्याचे पिवळे दात भेसूर वाटले अन शून्यात नजर लावून तो रस्त्यावरील उन्हात काय शोधू पाहत होता हे त्यालाच ठाऊक. 

 दूर सिमापार गुलबर्गा जिल्ह्यातील कुठल्याशा छोट्या गावात राहणारा. पदवीपर्यंतच शिक्षण झाल्यावर आयुष्यात काहीतरी करावे म्हणून बायकोपोरासह शहराची वाट धरलेली. इथे आल्यावर चांगली नोकरी काही भेटली नाही. बिगारी मजूर म्हणून एका ठेकेदाराकडे काम धरले.  जनावरासारखे काम करावे लागे, यातच सोबतच्या मजूराच्या साथीने दारूच व्यसन लागलेल.  पडेल ती कष्टाची काम केली पण फार काही हाताला लागेना.  कामाचे चार पैसे अन इथला घरखर्च याचा मेळ बसेना. घरात रोज कमी पडायचं. उपासमार  होऊ लागली. घरात आदळआपट होऊ लागली. तोंडाला तोंड लागू लागले, भांडण झाल की जास्तच प्यायला लागलो 

 काम लागल तर संध्याकाळी देशीच्या दुकानाकडे पाऊल आपोआप वळायची. काम नसल तरी  हातभट्टीची सोय लावायची. घरी आलो की भांडण अन बायकोला बेदम मारायचो. हे खूप वाढत गेले अन एक दिवस बायको मुलांना घेऊन माहेरी निघून गेली.  त्या वयातील धुंदीत काय होतय ते समजत नव्हते अन  मी बेभान वागत होतो. आयुष्य उध्वस्त होत होतं... दारूच्या नशेत मला समजत नव्हत.. 

माझं पिणं वाढतच होतं.

 

दीपक चव्हाण. वय ५० च्या आसपास, अंगात काळा शर्ट , त्याच्या बाह्या कोपरापर्यंत दुमडलेल्या, त्याच रंगाशी साधर्म्य असलेली पॅन्ट, पायात बूट, डोक्याचे केस अस्ताव्यस्त वाढलेले, काळी-पांढरी दाढी मात्र त्यामानाने आटोक्यात, जवळ एक पिशवी ज्यात कपडे व्यक्तिगत गरजेच्या वस्तू ...

 

तारुण्यातील बेभानपण संपत गेला अन आयुष्यातील उध्वस्तपण लक्षात आले. तोवर वेळ निघून गेली होती. आता मुलं मोठी झालीत त्यांना माझ्याबद्दल ना आस्था ना प्रेम. बायकोला अर्धांगवायू झालेला  मुलं कमावती झाली पण माझच मन मला खातंय म्हणून इथेच राहतो. एका  हाॅटेलमध्ये मोरीवर काम करतो. आता दारू पीत नाही. पगार झाला की बायकोला औषधपाण्यासाठी पाठवतो.

एकेकाळी  दारूच्या नशेत जेवणाचे  ताट मी कित्येकदा पायाने भिरकावल होत. नशेत आंकट बुडालेल आयुष्य, उध्वस्त झालो होतो पुरता. खूप उपासमार झाली. पोटात कावळे ओरडू लागले की समजते या चपातीची किंमत.

  या अन्नाच महत्व मला पोटात अन्नाचा कण नसताना जी आग लागते ती  जीवघेणी असते. त्या जीवघेण्या भुकेच महत्व समजण्यासाठी जीवनात कधी ना कधी  उपासमार झाली पाहिजे. या उपाशी कुत्र्यासारखा मी हाॅटेलमध्ये खात असलेल्या लोकांकडे पाहत असायतो.  भूक खूप वाईट. ती जीवघेणी उपासमार घडली अन भुकेच गणित समजलं. त्या उपाशीपोटी मुक्या जीवाला मागता येत नाही हाच फरक आहे त्याच्यात अन आपल्यात.

या कुत्र्याला जीव लावलाय बघा मी. या मुक्या जीवाला घासातला घास देतोय म्हणून सोबत आहे.

 

लॉकडाऊनमुळे, आजूबाजूला श्रमिक वर्गाचे सुरू असलेले हाल पाहून मनोमन दुःख होतं. आज एका वर्गाला खायला नसताना एक वर्ग पंचतारांकित सुखासिन आयुष्य जगतोय. त्यांनी आपल्या घराची खिडकी बंद केल्याने त्यांना उपाशी  दीपक दिसत नसेल कदाचित. कोरोनाच्या या आपत्तीने तरी त्यांच्या धुंद डोळ्यातील साचलेली  पुट दूर व्हावीत. रात्री भरलेलं जेवणाचं ताट समोर आल्यावर, मला दीपक पुन्हां पुन्हां  आठवतो. अन मी त्यातील एक पोळी बाजूला काढून ठेवतो. बाहेर जाताना ती पोळी सोबत घेतो. रस्त्याने जाताना एखादी गाय वा कुत्रा दिसला की ती पोळी त्याच्या मुखात घालतो. 

 

आपल्या उध्वस्त आयुष्याला सावरत असताना या माणसांचे साधंसोप जगणं. घासातला घास दुसऱ्यास देण्याच त्याच्यापुरते असलेले त्याच स्वतःच तत्त्वज्ञान आपल्या जाणीवा समृद्ध करून जातं.

(अंध अपंग बेघर यांच्यासाठीच्या भोजन व्यवस्था निमित्ताने शहरातील  विविध उड्डाण पुलाखाली, रस्त्यावर, झाडाखाली राहत असलेली ही  माणसे भेटत आहेत. अगदी बिनचेहऱ्याची असणारी ही माणसे त्यांच्या साध्यासोप्या जगण्यातून बरंच काही सांगून जातात  अन जाणीवा समृद्ध करत राहतात.)

 

सचिन पाटील

९८६०४९९२७२

‌तरुण मित्र - मैत्रिणींनो बोलूयात

No comment

Leave a Response