Primary tabs

सांड की आंख - परीक्षण

share on:

एक अचूक लक्ष्यभेद -  

 

 

२०१९ची दिवाळी संपता संपता ‘सांड की आंख’ नावाचा सुंदर चित्रपट बघितला होता. आजच्या जमान्यातल्या प्रत्येकाने पाहावा असाच हा सिनेमा! आता खूप सुधारणा झालीये, आता असे कुठे दिसते, हल्लीच्या बायका म्हणजे... इ.इ. प्रश्नांना हात घालणारा एक संयत सिनेमा, असे मी तरी म्हणेन. कुठेही बटबटीत प्रसंग, भाषणबाजी असं काहीही न करता अलगद स्त्रीत्वाची बूज राखणं म्हणजे काय हे हा सिनेमा दाखवून देतो.

तसं पाहायला गेलं, तर रुढार्थाने या सिनेमात कुणीही खलनायक नाही. अगदी म्हणायचंच झालं, तर भारतीय पुरुषाची पारंपरिक मानसिकता हीच इथे खलनायकाची भूमिका वठवते. संपूर्ण सिनेमात कुठेही भांडणं, आक्रस्ताळेपणा, उगाच जिवाला चाळवणारे प्रेमप्रसंग, कट-कारस्थाने असं काहीही नाही आणि तरी तो मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. 

आपल्याच आजूबाजूला डोळे उघडे ठेवून वावरल्यावर जे काही दिसतं त्याचं चित्रीकरण इथे  समोर येतं. प्रेक्षकाच्या अगदी नकळत हा सिनेमा स्त्रीवाद मांडतो. आजही अनेक भागांत अशा परिस्थितीतील स्त्रिया आपण पाहतो. बरेचदा स्त्रियांना बरोबरीचे समजले जात नाही. स्वतःच्या हक्कांसाठी त्या देत असलेला लढाही आपल्याला नवीन नाही. या सिनेमातून हा लढा एका वेगळ्याच प्रकारे समोर येतो. स्वतःपेक्षा घरातल्या पुढच्या पिढीच्या मुलींसाठी, त्यांच्या सन्मानासाठी घरातल्या दोघी प्रौढा/ वृद्धा जो काही लढा देतात तो अतिशय सकारात्मकतेने इथे मांडला आहे.  

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या दोघींचं खूप कौतुक वाटतं. एकीकडे तरुण, सुंदर अशा भूमिका करतानाच वयस्कर, त्यातही बरेचदा घुंघटाआड चेहरा ठेवत त्यांनी या भूमिका निभावल्या आहेत. मला तापसीपेक्षा भूमीचं काम जास्त भावलं. अर्थात ते १९-२० इतकंच फरकाने आहे. 

पिक्चरमध्ये सुरुवातीच्या काही दृश्यांतून गावातल्या स्त्रियांच्या स्थितीबद्दल आपल्याला कळतं. राजस्थानमधील एक खेडेगाव. त्यातील सरपंचांचं घर आणि त्या घरात आलेल्या नववधूला पहिल्या रात्री तिची जाऊ देत असलेली ओढणी... त्या वेळी संवादातून जे काही पोहोचतं ते पिळवटून टाकणारं आहे. 

इथे बायकांनी घरात, शेतात, वीटभट्टीवर सगळीकडे राबायचं. पुरुषांचं काम म्हणजे हुक्का पिणे, बायका काम करतात की नाही यावर देखरेख करणे आणि भरमसाठ मुले जन्माला घालणे. इथे बायकांनी पुरुषांशिवाय कुठेही जाता कामा नये असा दंडक, शिक्षण तर दूरच! पण याच गावात डॉ. यशपाल येतो. त्याला गावात शूटिंग रेंज सुरू करून मुलांना उत्तम नेमबाज बनवायचे आहे. त्यामुळे मुलांना सरकारी नोकरी मिळेल, असेही तो सांगतो. 

घरात घुसमट होणाऱ्या, या परिस्थितीत बदल व्हायला हवा असं मानणाऱ्या; पण काही करू न शकलेल्या चन्द्रो आणि प्रकाशी तोमर ह्या आपल्या मुलीला, नातीला त्याने शिकवावे म्हणून घरच्यांच्या नकळत त्याच्याकडे घेऊन येतात. तेव्हा अगदी अनपेक्षितपणे त्या आज्या उत्तम शूटिंग करू शकतात, असं डॉ.च्या लक्षात येतं. त्याच्या अटीमुळे मग मुलींसाठी या आज्याही येतात. त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून खेळतात. घरात खोटे बोलून स्पर्धांना जातात, मेडल्स मिळवतात. त्या रोज यायला लागण्याच्या आधी त्यांच्या घरच्यांना घाबरणाऱ्या आपल्या मदतनीसाला डॉ. यशपाल म्हणतो, ‘देखो हवा का रुख बदल रहा है!’ हा सीन पाहताना अंगावर रोमांच आलेले. हवेचा रोख बदलतो आहेच, सिनेमातूनही आता बायकांची केवळ उपभोग्य वस्तू म्हणून असणारी भूमिका बदलते आहे. प्रत्यक्षातही जेव्हा बदलेल तो सुदिन! तसाच एक त्या दोघींनी पदक जिंकल्यानंतर घेतलेल्या मुलाखतीचा प्रसंग, अंतर्मुख व्हायला लावणारा.  

खूप छोट्या छोट्या सीनमधून इथे दिग्दर्शक दिसून येतो. त्याने केलेलं काम दिसून येतं. बाईची ओळख ही त्यांनी चेहऱ्यावर घेतलेल्या घुंघटच्या रंगापुरती हे दाखवणाऱ्या सुरुवातीच्या सीनपासून ते शेवटी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या लेकीने वडिलांच्या जागी आईचे नाव आपल्या जर्सीवर लिहिणे, घरातल्या मोठ्या जावेने शेवटी घुंघट उचलून नवऱ्याला सुनावणे, घरातल्या बायकांनी एकजुटीने या सगळ्यांची गुपितं सांभाळणे या सगळ्या गोष्टींमधून आणि इतरही प्रत्येक फ्रेममधून दिग्दर्शक डोकावत राहतो. यात एक प्रसंग आहे. जेव्हा डॉ. त्यांना सांगतो, हा खेळ खेळताना तुम्हाला पँट घालावी लागेल. त्याचे कारणही सांगतो. पँट घातली की, डावा हात खिशात ठेवून नेम धरता येतो. तशीच पद्धत असते. त्यावर चन्द्रोचे उत्तर असतं, “पँटच घालून खेळायचं, तर काय फायदा? जेव्हा घागरा घालून आम्ही हे करू शकू तेव्हाच याचा उपयोग होईल.”  बाई जशी आहे तशीच राहूनही खूप काही करू शकते. त्यासाठी तिला पुरुषासारखं व्हायची, वागायची गरज नाही. हा मोलाचा संदेश इतक्या लहानशा वाक्यातून आणि देहबोलीतून दिला गेलाय. बाईला असणारं दुय्यम स्थान ती केवळ तिच्या वागण्यानेच बदलू शकते. वेशभूषा बदलणे हा तो मार्ग नाही नक्की. तिने स्वतःचा विकास स्वतः करून घ्यायचा आहे. त्यासाठीचा लढा हा तिचा तिला लढायचा आहे. कोणी तिच्या पुढ्यात सन्मानाचं, संधीचं आयतं ताट देणार नाहीये.  स्वविकासाचा मार्ग पुरुषांशी बरोबरी केल्याने येईलच असं नाही हे त्यांना पक्कं ठाऊक आहे.  

स्वतःला हवी असलेली गोष्ट मिळवतानाही स्त्रिया आपलं कुटुंब, माणसं, नातेसंबंध सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र हे सहजसाध्य कधीच नसतं. हा संघर्ष करताना कधी युक्ती-प्रयुक्तीने घरच्यांच्या गळी उतरवत, कधी आपल्या निर्णयांवर ठाम राहत, तर प्रसंगी खोटे बोलूनसुद्धा करावा लागतो. कुणाच्या भल्यासाठी खोटे बोलले तर ते पुण्याच असते असं म्हणतात याची प्रचीती येते. 

सिनेमात प्रकाशीच्या लग्नापासून ते वयस्कर होईपर्यंतचा एक बराच मोठा कालखंड दाखवला आहे. मात्र इतर सिनेमांप्रमाणे एखादी घटना घडली आणि धाडकन काही बदल झालेत असे दाखवले नाहीये. समाजात होणारे खरे बदल हे अतिशय हळूहळू होत असतात. पटकन ते लक्षातही येत नाहीत आणि हेच इथे दाखवले आहे. हे फार छान वाटलं. 

सिनेमातली उडता तितर, वूमानिया आणि बेबी  गोल्ड गाणी ही छान झाली आहेत. गाण्यांतूनही सिनेमा पुढे जातो. 

कोणताही चांगला बदल घडवायचा असेल, तर त्याला विरोध होणारच हे मान्य करावं लागेल. मात्र एकदा का आपल्याला त्या बदलाचे महत्त्व पटले की, मग घराचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील ह्याची पर्वा करणं सोडावं लागतं. क्वचित कधी काही विपरीत परिणामांना तोंड देण्याची पाळीही येऊ शकते. मात्र कुणीतरी हा संघर्ष करावाच लागतो. तेव्हाच त्याची फळे नंतरच्या लोकांना मिळतात. त्या अर्थाने या सिनेमातली बंदूक ही काहीशी प्रतीकात्मकही मानता येईल. 

ही जरी सत्यकथा असली तरी आपल्या रोजच्या जगण्यातही जुन्या, कालबाह्य रूढी-परंपरांवर नेम धरण्याची वेळ येते, काही चांगलं घडवून आणण्यासाठी ठामपणे समाजाच्या समोर उभं राहण्याची वेळ येते. तेव्हा सारासारविवेकाची बंदूक आपल्या हाती असायला हवी आणि पदराला गाठ मारत ती रोखून लक्ष्यभेद करण्याचं शारीरिक त्याहीपेक्षा मानसिक सामर्थ्य आपण कमवायला हवं. 

- आरती देवगांवकर

No comment

Leave a Response