Primary tabs

मिशन इम्पॉसिबल - भाग - १

share on:

 

प्रिन्सिपल शैलजा मॅडमच्या केबिनच्या थोडंसं अलीकडे `एफवाय`च्या मुलांचा एक घोळका थांबला होता. मॅडम आत कधी बोलावणार याची वाट बघत नव्हे, तर मॅडमनी आज आपल्याला का बोलावलंय याची चर्चा करत. त्यांनी आत बोलावण्यापेक्षा काहीतरी कारण काढून इथून कटता आलं तर बरं, अशीच त्यांची चर्चा सुरू होती.

``ह्या साकेतनंच काहीतरी राडा केला असणार! दरवेळी माती खायची सवयच आहे त्याला!`` मिथिला म्हणाली.

``गप्प बस! मी काय केलंय? तूच परवा क्लासरूममध्ये नेलपेंट लावत बसली होतीस, त्यावरून संजनामॅडमनी कंप्लेंट केली असणार तुझी!`` साकेतनं चिडून उत्तर दिलं.

``हे बघ, तू...`` मिथिला काहीतरी बोलणार, एवढ्यात तिचं दुसऱ्या बाजूला लक्ष गेलं.

``वि-ऋचाकडे बघ! एकमेकांमध्ये Completely lost आहेत !`` मिथिलानं तिकडे खुणावलं.

``अगं, ते एकमेकांच्यात नाही, इन जनरलच `लॉस्ट` आहेत!`` साकेतच्या या कमेंटवर बाकीची मुलंही हसली, तशी विराज आणि ऋचा यांची तंद्री भंग पावली. एकमेकांमध्ये हरवून गेलेली ही जोडी कॉलेजमध्ये `वि-ऋचा` या नावाने फेमस होती.

``आपण प्रिन्सिपल मॅडमना भेटायला आलोय बरं का, made for each other कपल! तेव्हा जरा इकडे लक्ष ठेवा!`` साकेतनं त्या दोघांना सुचवलं. विराज चिडून काहीतरी बोलणार होता, तेवढ्यात शैलजा मॅडमनी आत बोलावल्याचा निरोप मामांनी दिला आणि ती चर्चा तिथेच थांबली. साकेत, मिथिला, वि-ऋचा आणि बाकीची मुलं थोडीशी दबकत आत गेली.

``गुड मॉर्निंग, मॅडम!`` साकेतनं आपण सगळ्यांचा लीडर असल्याच्या थाटात मॅडमना विश केलं.

``गुड आफ्टरनून गाइज!`` मॅडमनी घड्याळाकडे बघत एकाच वाक्यात त्याची विकेट काढली आणि सगळे फिस्सकन हसले. वातावरणातला तणाव किंचित हलका झाला.

``काय चाललंय सध्या क्लासमध्ये?`` मॅडमच्या या गुगलीनं सगळेच काळजीनं एकमेकांकडे बघायला लागले.

``मॅडम...ते....`` कुणाच्याच तोंडून शब्द फुटेना.

``एक प्रोजेक्ट करायचाय आपल्याला, त्यासाठी वेळ आहे ना, असं विचारत होते!``  मॅडमनी खुलासा केल्यावर सगळ्यांना थोडंसं हुश्श केलं.

कॉलेजच्या annual day निमित्त एक app तयार करायचं होतं. कॉलेजच्या सगळ्या एक्स-स्टुडंट्सनाही यावेळी या फंक्शनमध्ये सहभागी करून घ्यायचं होतं, त्यांच्या वेगवेगळ्या activities घ्यायच्या होत्या. त्यासाठी app तयार करावं लागणार होतं. मॅडमनी नक्की काय काय करायचं, कॉलेजला काय अपेक्षित आहे, हे समजावून सांगितलं.

``अद्वैत!`` सगळ्या मुलांनी एकदम उत्साहानं एकच नाव घेतलं.

``मॅडम, अद्वैत म्हणजे टेक्नॉलॉजीतला किडा आहे. तोच आम्हाला गाईड करू शकेल!`` मिथिला म्हणाली.

``गुड. मग त्याला सांगा. तो का आला नाही आज?`` मॅडमच्या या प्रश्नावर कुणीच काही बोललं नाही. सगळ्यांना माहीत होतं, की अद्वैत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अतिशय हुशार असला, तरी सध्या तीच टेक्नॉलॉजी त्याच्या डोक्यावर बसली आहे. `मिशन इम्पॉसिबल` नावाच्या व्हिडिओ गेममध्येच तो बुडालेला असतो.

ह्या गेमची सगळीकडे हवा होती. प्रत्येक यंगस्टरला ह्या गेमनं वेड लावलं होतं. पण फक्त 4 gb ram किंवा त्यापेक्षा जास्त configuration असलेल्या मोबाईलवरच तो डाउनलोड होत असे. अर्थातच, महागड्या मोबाईलवर. अद्वैत श्रीमंत घरातला मुलगा होता आणि त्याला पैशांची कधीच काही कमी नव्हती. हा मोबाईल गेम्सचा नाद मात्र त्याला हल्लीच लागला होता आणि त्यामुळे ह्या ग्रुपपासूनही तो थोडासा तुटल्यासारखा झाला होता.

``अद्वैत एक्सपर्ट असला, तरी तो वेळ देणार का आपल्यासाठी?`` विराजनं शंका काढली.

``करेक्ट आहे!`` ऋचा म्हणाली.

``आपला मित्रच आहे ना तो? आपण त्याच्या गळ्यात पडू!`` मिथिला म्हणाली.

``हो, ते तुला सांगायला नकोच! तू कुणाच्याही कधीही गळ्यात पडू शकतेस!`` साकेतनं तिला चिडवलं, तशी मिथिला उचकली.

``तू सारखा तिच्याशी भांडत जाऊ नको रे!`` विराज म्हणाला.

``करेक्ट आहे!`` ऋचा पटकन म्हणाली.

``तुला विराजची कुठलीही गोष्ट कधी इनकरेक्ट वाटू शकते का? तो तुला म्हणाला, की `तू वेडी आहेस`, तरी तू म्हणशील, `करेक्ट आहे!`` साकेत म्हणाला आणि सगळेच हसायला लागले.

एकूणच अद्वैत हा या प्रोजेक्टसाठी अतिशय परफेक्ट माणूस असला, तरी त्याला तयार कसं करायचं आणि तो वेळ देणार का, ह्या दोन्ही शंका ग्रुपसमोर होत्या. शैलजा मॅडमनी विश्वासानं आपल्यावर ही जबाबदारी टाकलेय, ती पूर्ण करायला हवी, असंही त्यांना एकीकडे वाटत होतं.

अद्वैत ज्या `मिशन इम्पॉसिबल` गेममध्ये हरवून गेला होता, तो गेम थोडासा डेंजरच होता. आपल्या पर्सनल लाइफमधली सगळी माहिती त्या गेमला पुरवायची. आपल्याला कोण आवडतं, कोण आवडत नाही, ते सांगायचं. मग जे कुणी आपल्याला आवडत नाही, त्याला कसं छळायचं, कसं कॉर्नर करायचं, हे तो गेमच आपल्याला सांगायचा. त्या माणसाची सगळी माहिती आपल्याला पुरवायचा.

``अद्वैतला ह्या गेममधून थोडं बाहेर काढायला हवं यार! नाहीतर आपल्याला हा प्रोजेक्ट करता येणार नाही.`` विराज म्हणाला.

``करेक्ट आहे!`` ऋचानं लगेच त्याला पाठिंबा दिला.

``फक्त प्रोजेक्टसाठी नाही, आपला मित्र म्हणूनही त्याला ह्या गेममधून बाहेर काढायला हवं!`` मिथिला म्हणाली, ते सगळ्यांनाच पटलं.

एवढ्यात साकेतचा फोन वाजला. अद्वैतचा नंबर बघून त्याला उत्साह आला.

``अद्वैत यार, तुझीच आठवण काढत होतो आम्ही. अरे एक...`` साकेत पुढे काही बोलायच्या आधीच पलीकडून आवाज आला, ``मी अद्वैतची आई बोलतेय रे.``

``हां बोला काकू..!`` साकेत थबकला.

``अरे, अद्वैतचा accident झालाय. कसं कुणास ठाऊक, आमच्या टेरेसवरून खाली पडलाय तो. हॉस्पिटलमध्ये आहे!`` काकूंनी दिलेली माहिती ऐकून साकेतला जबर धक्का बसला. भेटायला येतो सांगून त्यानं फोन ठेवला. सगळेच ह्या बातमीनं हादरून गेले. लगेच हॉस्पिटलला जायला निघाले.

``साकेत, अद्वैत टेरेसवरून पडला, हा खरंच accident आहे, की त्या गेममधलं एखादं मिशन?`` मिथिला म्हणाली आणि सगळे तिच्याकडे चमकून बघायला लागले.

.... 

(क्रमशः)

 

अभिजित पेंढारकर.

No comment

Leave a Response