Primary tabs

घरी रहा सुरक्षित रहा!

share on:

#Thanks_to_corona

   बिडीचा धूर काडीत...त्या धुरात देव दिसल्यागत पाहत पक्या म्हनला, "चल जाऊ गावाकडं.. बास झालं तुझं सोंग आता" मी म्हन्लो,
"नकं, मला नाही यायचं गावाला. आधीच काम बंद. नंतर एवढ्या सुट्ट्या पडल्या तर मुकादम पैसं द्यायचा नाही. बापाच्या दर महिन्याच्या औषधालाच हजारभर रूपये लागत्यात."
"आरं जित्ता राह्यला तर पाठवशील ना पैसं. महामारी आलीये म्हन्त्यात. गावाकडं जायलाबी बंदी येईल लवकरच. कामं तर बंद. आता काय कवड्या खाशील का? तुझा बाप मराया टेकलाय तिथ. मेला बिला तर सरनावर उडी मारलीस तरी घावायचा नाही तुला तो"
पक्या बोलत व्हता ते सगळं डोक्यात घुसलं असं नाही. डोकं भिनभिन करत व्हतं. बिडी प्यायची जोरदार तलफ आली व्हती पन् पैसंच नव्हतं घ्यायला. ठायी ठायी पांगलेलं काळीज नाईलाजानं गोळा करून त्याचं गाठोडं बांधलं. दुसरा काही रस्ताच नव्हता. माझ्याबरूबर कामं करनारी कितीतरी जनं जिवाच्या करारानं, उपाशीतापाशी निघाली व्हती. एष्टी बंद व्हायच्या आत सगळ्यांना गाव गाठायचा व्हतं. दुसरं काही असो नसो नशिबात पन मरन मात्र पक्क लिवलेलं व्हतं सटूबाईनं. महामारीनं नाही मेलो तरी भुकेनं मरनारच व्हतो.
      पक्यानं मुकादमाला दारू पाजून त्याची जुन्या मोटार सायकलची चावी पैदा केली व्हती. मुकादम शुद्धीवर यायच्या आतच त्या जुन्यापान्या गाडीवर निम्म्या रातचंच निगालो.
        गावाची दगडी वेस लांबूनच दिसायची. वेस ओलांडून सूर्य हळूच वर यायचा. दोन वर्षात असा मोकळ्या आकाशातला आख्खा सूर्य एकाचवेळी मी पाह्यला नव्हता. शहरात बिल्डींगीच्या आडून अर्धा, चतकोर सूर्य पाहायला मिळायचा. त्यानं कधी पोट भरलं नव्हतं. गावाकडच्या सूर्यासारखा तो मायाळू वाटायचाच नाही कधी. हजेरी घ्यायला छडी घेऊन पोहोचलेल्या कडक मास्तरावानी वाटायचा तो सूर्य.
    मला यकदम बरं वाटलं गावची वेस पाहून. तांबडं फुटायला लागलं व्हतं. रानातली पांदीची मसनवटीकडची वाट वळखीची व्हती. तिथं गाडी लावून दिली. आमचं नशीब जोरावर व्हतं. कोनतरी गेलं व्हतं गावातलं. त्या मर्तिकाला आलेल्या जत्थ्या बरूबरच मी आन पक्या आपापल्या घरापतवर गेलो.
    आईनं पाहीलं. तिचे डोळे भरून आले. लकवा मारलेला, बाप दोन वर्षापासून जागेवर व्हता. त्याच्या येका डोळ्यातून पानी गळू लागलं. घशातून न कळणाऱ्या भाषेतले आवाज निघू लागले. माझ्याबी गळ्यात हुंदका दाटून आला. दोन वर्षापूर्वीचा परसंग आठवला मला.
दोन वर्षापूर्वी सख्ख्या बापावर हात उगारला व्हता मी. त्याच्या दारूचा मला वीट आला व्हता. आईला आता काम व्हत नव्हतं. एवढ्यातेवढ्या गोष्टीवरून तो हात उगारायचा. मी हात धरला त्याचा. बाप गुरकावला, बरंच काय बडबडला. शिव्या घातल्या. ते नेहमीचच व्हतं. शिव्या खात खातच मोठा झालो व्हतो.
    पन बापाची एक गोष्ट मनाला लागली.
"तू माझ्या पोटचाच नव्हं. तुला पोसायचं मला काय कारन न्हाय. चाल निघ इथून."
     नुकतंच मिसरूड फूटलं व्हतं. राग डोक्यात मावत नव्हता. दहावी पासचं सर्टिफिकेट घेतलं आन चपलाबी न घालता निघालो. आई हातापाया पडली पन मी बधलो नाही. तडक घर सोडलं. वाट फुटंल तसा पळत सुटलो. आई कुठवर पळनार व्हती. मी मागं न पाहताच मसनवटीकडच्या रस्त्यानंच हमरस्त्याला लागलो. बिनातिकीटाचाच शहरात आलो.
 शहरात आलो आन् इथलाच झालो. मोकार कष्ट केलं. पैसं हातात खेळू लागल्यावर मावा खायचा, बिडी प्यायचा माजभी केला. दारूच्या वाट्याला तेवढा गेलो नाही. गावाची मायबापाची आठवन यायची. एखादा रांगडा शेतकरी गावाकडून शेतमाल घेऊन यायचा. त्याला पाहून बारं देतांनाचा, मोठ्यांदा गानी म्हननारा बाप आठवायचा. कधी कधी पाठुंगळी बांधलेलं लेकरू घेऊन एखादी मजूराची बाई दिसायची. तिच्याच मला बाई दिसायची नाही...
आई दिसायची....
कधीतरी मग एक दिवस कामाच्या गनगनीतच शहरात आलेला पक्या भेटला. पक्या आपला लहानपणापासूनचा जोडीदार.
   माझी गचांडी धरून, फाडकन मुस्काटात ठेवून म्हनला,
"भाड्या कुठं हरवला व्हता रं? तुझे म्हताराम्हतारी यडे झाले तुला हुडकता हुडकता."
मला मनात बरंच वाटत व्हतं. बरी जिरली वाटलं. नंतर पक्या जे बोलला त्याच्याने माझा सगळा तोरा खारकन उतरला.
 "××××!! तुझ्या टेन्शनमुळं तुझा बाप लकवा होऊन पडलाय जागंवर. आई चार घरी धुनंभांडं करती. ह्याच्यात्याच्या पाया पडून, हातावर पैसं ठेवून तुला हुडकायला सांगती. बापामुळं तिला हलता येत नाही कुठं नाही तर तुला शोधन्यासाठी दुनिया पालथी घातली असती तिनं. आन भाड्या तू इथं मजा मारतूस"
  काही बोलता आलं नाही मला. पक्याच्याबी डोळ्यात पानी व्हतं आन माझ्याबी. पक्याच्या मिठीत मला जनू माझं शिवू घातलेलं काळीज मिळालं. दुप्पट कष्ट करू लागलो, मावा खायचं, बिडी प्यायचं बंद केलं.
     आईशी फोनवर बोललो. पक्या गावाला जायचा तवा पैसंबी पाठवलं पन् कित्येकदा वाटूनबी गावाकडं जायला मन होईना. सुंभ जळून गेला पन पीळ जात नव्हता. बाप फोनवर बोलू शकत नव्हता. त्यानं रदबदली केली असती, तर त्याची नांगी ठेचल्याचं समाधान मला मिळालं असतं आन गेलोबी असतो पन पक्यानं हजार मिनत्या केल्या पन माझा ताठा काही जात नव्हता. आईबी माझीच आई. दर फोनला रडायची पन एकदाबी म्हटली नाही ये म्हनून. मी तिच्या बोलन्याची वाट पाहत अजून काही महिने तशेच काढले. पैशै पाठवनं सोडलं नाही आन माझा ताठा पन.
पन आज ह्या महामारीनं मला गुडघे टेकायला लावले खरं...उरलासुरला समदा ताठा डोळ्यातल्या पान्यातून वाहून गेला. आईनं गालावरून हात फिरवला. तिनं कानशीलावर कडाकडा बोटं मोडली..म्हनाली,
"ह्या महामारीच्या रूपानं देव पावला...
माझं वासरू घराला आलं.."
बापाचे, आईचे, माझे डोळे गळत व्हते. काही बोलायला सुधरत नव्हतं..
तीन दिवसापासून खाल्लं नव्हतं काही पन आज पोट भरल्यावानी वाटू लागलं...

©डॉ. क्षमा शेलार

No comment

Leave a Response