Primary tabs

घरी रहा सुरक्षित रहा!

share on:

 

आईने थरथरत्या हाताने शेजारचा मोबाईल हातात घेतला. बॅलेन्स संपण्याचा मेसेज वाजणार हे माहीत असूनही तिने मुलाला फोन केला. घरकामाला येणारी सुनिताही कितीतरी दिवस आली नव्हती. त्यामुळे अंथरूण ओलं झालं होतं. दुर्गंधी येत होती; पण तिचा इलाज नव्हता. मुलाला तिची औषधं आणण्यासाठी बाहेर जावं लागलं होतं. खरं तर त्याने काळजीने महिनाभराची औषधं आणून ठेवलेली होतीही. पण महामारीनं दुकानं बंद झाली तर काय करायचं ह्या भीतीनं आई नको नको म्हणत असतानाही तो बाहेर पडला होता.
कधी नव्हे ते तिला तिच्या जुनाट दम्याचा राग राग आला. त्या दम्यानं हल्ली हल्ली मुलालाही विळखा घातला होता. तेव्हापासून तर दमा म्हणजे दुश्मनासारखाच होता. त्यात आता ही महामारी..
विठ्ठलाने अजून काय दाखवायचं बाकी ठेवलंय कोण जाणे. दोन वर्षापासून मी अशी अंथरूणाला खिळलेली. त्यामुळे लेकाला कोणी मुलगीपण देईना. श्रावणबाळासारखी सेवा करतो माझी.

इकडे व्हेंटिलेटरवर शेवटचे आचके देतांना मुलाला सारखं वाटत होतं. आईच्या काळजीपोटीच बाहेर पडलो. रस्त्याने चालतानाच जाणवत होतं श्वास पुरत नाही आताशा आपल्याला. अंगही कणकण करत होतं. घरात औषधं होती महिनाभराची. किराणाही होता थोडाफार. नसतो पडलो बाहेर तरी चाललं असतं.
 किती दिवस झाले कोण जाणे मी हॉस्पिटलमध्ये आहे. आई जिवंत असेल का आता? मी बाहेर नसतो पडलो तर अजून काही दिवस तिची काळजी घेऊ शकलो असतो.

मीबाहेरपडलोनसतोतर

घरीचरहाआपल्याजिवलगांनावाचवा.
(कदाचित थोडंसं गैरसोयीचं होईलही पण जिवंत राहणं तरी शक्य होईल. जिवंत राहाल तर जिवलगांची काळजी दीर्घकाळ घेऊ शकाल. घरी राहा. सुरक्षित राहा.)
- डॉ. क्षमा शेलार

No comment

Leave a Response