Primary tabs

"समृद्ध जाणिवा"

share on:

खंडूची भूक...

कचऱ्यात भेटलेल्या भाताची चव कशी लागत असेल, तो भात खात असतांना मनात नेमके काय विचार येत असतील, रात्रीचा उरलेला भात तुम्ही सकाळी पिशवीत भरून कचऱ्यात  फेकता, तो कुणीतरी भुकेने कासावीस झालेल्याच्या दृष्टीस पडतो, तो आजूबाजूला पाहात ती पिशवी घेऊन बाजूच्या गटारीजवळ जाऊन बसून खाऊ लागतो, कशी लागत असेल त्याची चव, कुठली लज्जत त्या पहिल्या घासाला येत असेल, तो पहिला घास तोंडात घालताना बाजूचा कचरा, त्याचा जीवघेणा वास .. खाद्य शोधत आजूबाजूला हुंगत फिरणारी डुक्कर आणि त्यांची पिल्लं, समोरची भव्यशी ११ मजली बिल्डिंग त्यातील उघड्या खिडकीकडे पाहात तोंडात डोळे मिटून घातलेल्या घासाची चव काय असेल,
सांगाता येईल?

लॉकडाऊननंतर जगात काय बदल होणार, कोरोना आधीचे जग आणि नंतरचे जग कसं असणार, कोरोनानंतरच्या जगातील नव्या संधी, भारताला यापुढे खूप संधी असणार आहेत,  भारताला महासत्ता बनण्यासाठी या संधींचा सुयोग्य वापर करायला हवाय, हे भारतातील अर्थतज्ज्ञ सांगू लागलेत, त्यांना माहिती असेल का त्या कचऱ्यात भेटलेल्या भाताची चव ...?

करड्या रंगात लहान लहान पांढरे ठिपके असलेला शर्ट, रंग उडत निघालेली निळी जीन, हातात निळ्या पट्ट्याचं साधं घड्याळ, पायात चप्पल, जवळ एक "बिग बी"चा फोटो असलेली पिशवी, त्या कचऱ्यात सापडलेली एक दोन पुस्तक, पेपर आणि दुसरे कागद भंगार जमवलेले एक पोते ... नाव खंडू !

कोरोनाच्या विषाणूमुळे जग थांबलंय, सगळ्या जगात लॉकडाऊन सुरू आहे . लॉकडाऊनमुळे सगळ्यांना घरातच थांबावे लागत आहे . मूव्ही पाहायला, शॉपिंगला जायला, पार्ट्याना जायला, गप्पा अन मित्रमंडळीसोबत भेटीगाठीना जायला मिळत नसल्याने  एक  वर्ग  दु:खी आहे मध्यमवर्गीयांची दु:ख आणखी जरा आगळीवेगळी आहेत तर एक वर्ग चक्क उपासमारीने बेजार झालाय.

रोज कचऱ्यातील कागद-भंगार जमा करून ते विकून घर चालावायचे, आता जमा तर करतोय, पण पुढे विकता येत नाही. दुकाने बंद आहेत, घराजवळ हे नेऊन साठवतोय, चाळू झाले की एकदम विकेल. चार पैसे एकदम येतील. माझी ७ वर्षांची पोरगी आहे, काल रात्री तिलाही खायला घरात काही नव्हते. कालपासून मी ही काहीच खाल्ले नव्हते.  खूप भूक लागली होती.  कचऱ्यात भात सापडला.  पोटाची आग वाढतच होती.  तो भात उचलला अन इथे बसून चार पाच घास तोंडात टाकून गिळून टाकले, न चावताच ...
विटलेला भात आहे.  त्याचा वास सुटलाय.  काय करणार दादा.  खूप भूक लागलेली ...!

खूप अस्वस्थ झालो मी, त्याच्या या शब्दांनी, काय बोलावे तेही सुचेना. खंडूच हे जगणे मला हादरवून गेले. मी त्याचं हे दु:ख पाहायला यायला नको होतो. मला शरमल्यासारखे झाले. दोन वेळच्या जेवणाची किंमत, अन जरा कुठे भाजीला चव नसली की डाफरणारे आपण, मला माझी देखील किळस वाटू लागली ...

बाजूला पडलेले पुस्तक तू वाचतोस काय, असं विचारताच ...
'हो , दुपारी उन्हाच जरा वेळ  बसलो की वाचतो.'
"संपूर्ण बनो" हे  वारेन डबल्यू विअरस्बी यांचे पुस्तक ,
मन व व्यक्तीत्व विकासाच्या अनुषंगाने असलेले पुस्तक, इंग्रजी पुस्तकाचे हिंदी भाषांतर, कुठेतरी रद्दीच्या दुकानात त्याला मिळालेले.

 जगण्याची भ्रांत असताना, घरात खायला नसताना हा माणूस चक्क पुस्तक वाचतोय, ते ही आत्मबल वाढीच ... हे सगळंच अनाकलनीय होतं.

मी थरथरत्या हाताने थोडे पैसे त्याच्या हातावर ठेवले, मुलीला खायला घेउन जा, सचिनदादाने दिले म्हणून सांग. मी भेटायला येईन एकदा, त्या चिमुकलीला...यापेक्षा फार काही बोलायचे होते.. पण माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झाले. घशाला कोरड पडली होती, तो भात माझ्या नजरेत रुतून बसला होता... माझा पत्ता अन फोन नंबर कागदावर लिहून मी त्याला  दिला, अन खाली मान घालून निघालो ...

पंचतारांकीत अभिनेते , उद्योगपती, राजकारणी मंडळीचे लॉकडाऊन काळातील जगणे माध्यमात दाखवण्याची चढाओढ असलेल्या काळात, खंडू आणि त्याच्यासारख्याचं जगणे कोण विचारात घेणार? खंडू तू असंच जगणाऱ आणि एक दिवस मरणार, तुझे प्रश्न कोण लक्षात घेणार, तुझ्या पोटी जन्माला आलेली मुलगी म्हणजे  "तैमूर" नाही, तिचं बालपण असंच उपाशीपोटी सरणार,  तिची दखल कोण घेईल?
तीच बालपण तुम्ही फेकलेला कचऱ्यातील शिळा भात खाण्यात असंच करपून जाईल  ...
आम्ही ही वास्तवाशी देणेघेणे नसलेल्या सिने जगतातील रंगवलेल्या चेहऱ्याच्या  पंचतारांकित मंडळीचे व्हिडीओ पाहण्यात दंग होऊन जाऊ,  काही सामाजिक संस्था पोट भरलेल्या लोकांनाच परत परत भरवत राहतील, छान छान फोटोही बातमीसह झळकतील, अर्थतज्ज्ञ पुन्हा नवी आकडेमोड करतील, ते सांगतील महासत्तेकडे जाण्याच्या वाटा...
खंडू व त्याच्यासारखे  समाजातील शेकडो जीव असेच उपासी झोपतील ... उपाशी खंडूच्या पोटात दोन वेळीच पोटभर जेवण देणारा, त्या वाटेने भारताला महासत्तेकडे घेऊन जाणारा! असा कोणी अर्थतज्ज्ञ असेल तर तो भारताला हवाय ...!

- सचिन पाटील
९८६०४९९२७२
तरुण मित्र मैत्रिणीनो बोलूयात

 

No comment

Leave a Response