Primary tabs

"समृद्ध जाणिवा"

share on:

 

दुसऱ्याच्या घरी घरकाम करणाऱ्या त्या माय माऊलीने २३ किलो तांदूळ प्रबोधनच्या भोजन सेवाकार्यास दिलेत ....!
लक्ष्मण या वस्तीभागात राहणाऱ्या तरुण मित्राचा आलेला फोन उचलून मी कानाला लावला , पटकन बोल ...
भाभीचे (त्याची आई) तुझ्याकडे काहीतरी काम आहे . तुला घरी बोलावलंय, काही काम असेल तर फोनवरच सांग ...
माहिती नाही ,
येऊन जा ..
बर ठीक आहे ! अस म्हणत तो संवाद संपला ...
दोन दिवसापुर्वी भाभीचं काय काम असेल पाहून येऊ  म्हणून वाट वाकडी करून त्यांच्या घराकडे गेलो होतो , घरी जाताच त्या वार्धक्याकडे झुकलेल्या माय माऊलीचे मी दर्शन घेतले.  
एवढ्या रोगाच्या काळात कश्याला फिरत असतो रे, स्वत:ला जप बाबा, असं बरंच काही काळजीच्या सुरात ती बोलत होती, नेमका तिच्या बोलण्याचा रोख अन मला बोलावणे माझ्या लक्षात येईना झाले, काहीकाळ तसाच गेला ...
लक्ष्मणच्या मुलाने आणलेला चहा मी पिऊ लागलो होतो.
"अरे लक्ष्मण सांगत होता तु आंधळया पांगळयाना रोज जेवण वाटप करतोस म्हणून, मला पण तुझ्या या कामात मदत करायची आहे!" एव्हाना भाभीच्या सुरुवातीच्या बोलण्याचा रोख लक्षात आला अन मला वाटले ती माझी फिरकी घेऊ लागलीये.  
मी काही करत नाही माझे मित्र करतात, मी सहज बोलून गेलो ...
भाभी वस्ती भागात आपल्या मुलासमवेत राहणारी एक जेष्ठ महिला , ७० च्या पुढे गेलेले वय, मुलं खाजगी ड्रायव्हर म्हणून काम करतात, मुलं-सुना अन नातवंडे अस भरलेल घर, घरात खाणारी तोंड जास्त म्हणून ती ही मुलाच्या प्रपंचाला हातभार होईल म्हणून एक दोन घरी घरकामाला जाते.  
डोक्यावरील केस पांढरे शुभ्र, पिंजलेल्या कापसासारखा, चेहऱ्यावर चहूबाजूंनी पसरलेल्या रेषा वार्धक्याची खुण पटवून देतात, कपाळावरच जुने गोंदकाम त्या रेशामध्ये दडून अधूनमधून डोकावून पाहतंय, कंबरेतुन आलेला थोडासा बाक यामुळे चालताना ती थोडेसे वाकून चालतेय , बसलेले उठताना गुडघ्यांना त्रास होतोय, मुलही सांगतात काम करु नको म्हणून, तरी ती एकत नाही. आयुष्य कष्टात घालवलेला तो जीव असा थोडाच थांबणार??
"यात २३ किलो तांदूळ आहेत", कोपऱ्यातील एका पिशवीकडे बोट करत ती बोलली.
"माझ्याकडून त्या उपाशी तापाशी लोकांच्या मुखात घाल, मला म्हातारीला तेवढेच पुण्य ...!"
दुसऱ्याच्या घरी घरकाम करणारी ही ज्येष्ठ महिला ज्या चांगल्या भावनेने आपल्याला बोलावून घेऊन आपल्याकडे हे धान्य देतेय, हे पाहून माझे मन प्रचंड भावविभोर झाले. समाजातील एक आगळे वेगळे मूर्तीमंत चैतन्य अश्या माणसातुन पहायला मिळत जाते. दुसऱ्याच्या घरी घरकाम करणारी ही ज्येष्ठ महिला, या लॉकडाऊन काळात रस्त्यावरील अंध अपंग बेघरांच्या मुखात दोन घास घालायला सांगतेय.  मला त्याप्रसंगी काय वाटले, माझ्या मनात भावनांचा काय गोंधळ चालला होता, चांगुलपणा हा नेहमी गरीबांच्या घरीच कसा जोपासला जातो, माझ्या घासातील घास मी कुणाच्या तरी मुखात भरवावा, कुणाची तरी पोटाची आग थांबवावी ..
माझी त्यावेळीची मनस्थिती मला आज शब्दात योग्य बांधता येत नाही ...
"लक्ष्मण एकदा चहा सांगतो का अजून?"
यथावकाश इकडेचे तिकडचे बोलणे चालू होते, वेळेला खात पीत जा, तुझी पण काळजी घेत जा असं बरंच ती पुन्हा पुन्हा सांगत होती, पुन्हा तो चहा पुढ्यात आला होता ...
तो दुसरा चहा मला बराच गोड वाटला, आज पाहिलेल्या निर्मोही दातृत्व अन निरपेक्ष माया यांच्या प्रेमाची माझ्या मनात चाललेली घुसळण याचं  ते रूप असावं.  
मी भाभीशी थोडे बोलून ते तांदूळ घेउन बाहेर पडलो होतो, एका बाजूला विविध वस्तीभागात धान्य बाहेरून येत असतांना मी मात्र वस्तीतुन धान्य घेउन बाहेर पडत होतो ...
ही घटना मला बरच काही शिकवून गेली.
कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीने संबंध देश थाबंलाय. लॉकडाऊनने माणसे थबकलीत.  जगातील मानवी समूहाचे जगणेच धोक्यात आलंय.  विविध आर्थिक बलाढ्य देश या संकटाने उध्वस्त झालेत. मृत्यूचे आकडे पाहून मन भयभीत होत आहे. महासत्तावान देशातील सुशिक्षित नागरिक या स्थितीत आपले मानसिक संतुलन मोठ्या प्रमाणात हरवू लागले असतांना, भारतीय मात्र या आपत्तीचा यशस्वी मुकाबला करतांना दिसत आहेत.  येथील सर्वसामान्य नागरिक ही गरजूंना खुप सारी मदत करत आहेत, आधार देत आहेत हे आश्वासक चित्र आहे.
केशरबाई चिलवंत ही सत्तरीपार ज्येष्ठ वयाची माऊली दुसऱ्याच्या घरी घरकाम करून मिळालेल्या अल्प रकमेतुन २३ किलो तांदूळ दातृत्वाच्या भावनेने  कुणा उपाशीपोटी गरजूच्या मुखात घालायला देते.  
अत्यंत प्रतिकूल स्थितीत आयुष्यभर कष्ट करत जगलेल्या त्या माय माऊलीच्या मनात ही अलौकिक दातृत्वाची भावना येते, हीच आपल्या दातृत्ववान महान संस्कृतीची प्रेरणा आहे , प्रत्येकाला बळ देणारी उर्जा आहे ...
#सलाम #दातृत्वाला !!!
( सदरील छायाचित्र प्रबोधन फाऊंडेशनच्या श्रमिक महिलांच्या गौरव सोहळ्यात आदरणीय भाभीचा गतवर्षी प्रबोधनने गौरव केला होता त्यावेळीचे आहे , व्यासपीठावर मा . रघुनाथ कुचिक , मार्गदर्शिका , शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादिका अर्चना कुडतरकर , प्राचार्य डॉ. खुशाल मुंडे , सामाजिक कार्यकर्त्या अनिता दीक्षित )

सचिन पाटील
९८६०४९९२७२
तरुण मित्र मैत्रिणींनो बोलूयात !

 

No comment

Leave a Response