Primary tabs

कोरोनाच्या संकटातील एका देवाच्या भोळ्याभाबड्या भक्ताची आर्त साद

share on:

 

एका जत्रेनी देव, काय म्हातारा होत नाय...!

बारा मासाचा शेवटचा फाल्गुन मास यंदा भलताच कोपून आला होता की काय जणू? असाच वाटला. जसा त्यो सुरू झाला तसं ते टि.व्ही.वर एका महामारीचं सारखच दिसायला लागलं म्हणे तो "कोरोना". चीन देशात आधी म्हणे लय लोकं मेल्याती असं सारख दाखवली जाई. तव्हा मातर इतकं काही याच सुखदूख वाटल नाही, जसं की ते माझ्या भारतात घुसलं तव्हा मात्र धाकधूक जी वाढलीय ती काय जाईनाच हो...!

होळी पुनवला पेटवलेल्या होळीची लाहीही औंदा जरा हलकीच जाणवली हो, होळीच्या कडंनी आवाज करणारी डफडीही कमीच वाजली की. धुलवडीच्या रंगानं माखणारी पोरंही या महामारीनं रस्त्यावं जास्त फिरकलीच नाही...काय आलय हे कळायच्या आत माझी जनता घाबरूनच गेली की, अशातच लय देशांनी मरणारी माणसं टीव्हीवर पाहता पाहता माझ्या देशातही मराया लागली कळालचं नाय. तव्हा मातर मनात धडकी खरच भरली. मग देशाच्या प्रधानमंत्री सायबांनी म्हणे देश "शटडाऊन" केला. हे तर कव्हा जन्मात ऐकलंही नव्हतं की पाहिलं नव्हतं हो... मात्र थोडं ऐकल्यावं कळाल की, हे सगळ्यास्नी चांगलं आहे. घरात बसून राहिलो की ही महामारी पसरणार नाही व आपला अन बाकीच्यांचाही जीव वाचल. तव्हापास्न बरीच जनता घरातच आहे.

प्रधानमंत्री सायब बोललं तव्हा वरीस संपत आलत आणि चैत्राला अवघं चार दिवस बाकी होतं. पाडवाही घरातच गेला औंदा.....बा विठ्ठला...एकसाल कायबी होत नाही घरातूनच गुढी उभी केल्यानी, असच केलं जणू औंदा.
चैत्र सुरू झाला तसं मात्र सगळी देवळही शासनाला बंद करावी लागली..बरं झालं ते एकाअर्थी गर्दी थांबली म्हणे..!

नवीन साल सुरू झालं की माझ्या गावगावच्या जत्रा सुरू व्हतात ना....औंदा जरा मन चलबिचलीतच होत.
देवाधर्माचं निवद, नवस व भोळी भाबडी भक्ताची माया एवढचं काय ते जत्रला असतं हो.....!
देव म्हणं देऊळ बंद करून बसला आणि भक्त संकटात सोडला...अरं भल्या माणसा देणारा भी त्यो... अन् घेणारा भी त्योच... तू तुझ्या कर्माचा दोष त्या दगडाच्या देवाला का देतुस....?
 
रामाच्या नवमीचा पाळणा औंदा हलकाच हलवला की काय...? मारूतीरायाचा जन्मालाही देवळात कमीचं लोक होती गर्दी नको असूदे मणून,
असु बा रामराया, मारूतीराया दोघांचीही किरपा तेवढीच असावी एवढचं मागणं...औंदा मात्र घरूनच मागतो. का तर बाहेर पडायचं नाही ना..! पंढरीच्या चैतीवारीला तर पंढरी सुनी, सुनीच होती असही टिव्हीवं पाहिलं हो. चंद्रभागच्या पाण्यात तर  चिटपाखरूही नजरला नाही पडलं.
बा.... विठ्ठला चैती वारी पुढलं सालबी येईल. तव्हा नक्की येइल रं.... मात्र औंदा नको रं !
शिखर शिंगणापुरला जाणार्‍या कावडीही औंदा वाजल्या नाहीत ना नाचल्या नाहीत. गाड्यांनी कावडी नेऊन महादेवास्नी धार घातली.... बा महादेवा औंदा तेवढं समजून घे.... घरातनचं तुला दंडवत..
कोल्हापूरच्या डोंगरावरच्या जोतिबाचं टी.व्ही.वर पाहतास्नी मात्र मन लय भरून आलं राव. लाखास्नी भक्तानी भरणारा त्यो हिरवा डोंगर कोरडाच भासत व्हता.
लाल लाल गुलालानी व्हळखू न येणारी माणसं औंदा घरीच बसली होती जणू. कधीही न दिसणारी भक्ताच्या गराड्यातली पालखी औंदा दहा गुरवांच्या खांद्यावरचं होती. जोतिबाचा निघणारा लवाजमा, डामडौल औंदा निघूच नाही दिला हो.
भक्ताच्या भावाचा भुकेला जोतिबा औंदा नाराजच वाटला की काय.. ? एक भोळा भाबडा जोतिबाच्या वढीनं चालत डोंगूर चढून आला व्हता, मातर पोलिसांनी त्याला माघारी लावलं... माझा जोतिबाचा डोंगर मी पायलाय जणू, आता तुम्ही मला मारून बी टाकलं तरीबी मी सुखानं मरीलं.. अशी बी असतयं जणू भाबडी सेवा भक्तगणाची..

बा पांडूरंगा तूबी डोळं मिटून हे सगळं बघतोयास..
रामराया तुजी दरसाल नवमी आमी करतो. मातर अशा नवीन सालाच्या या सुरुवातीलाच काय रं ही पीडा आणलीया..?
 तुम्हा देवांच्या जत्रा दरसाल येतीलबी. औंदा आमी तुमच्या दर्शनाशिवाय सोसु बी सगळं ह्यं. घरास्नीच बसू आम्ही, घरातुनच जोडू तुमच्या देवळाच्या बाजूस्नी दोन हात. "एका जत्रंनी देव काय म्हातारा होत नाय" हे भी खरं हाय.
ह्यो कोरोना संपला की येतू तुझ्या दर्शनाला. मातर आता हे थांबवा की हो...
पुना सुरु होऊ देत देवळं आणि दिसु दे माणसं बाहेर, जावू दे ही महामारी ...तव्हा कुठं बा ....विठ्ठला मनाला बरं वाटल रे ..तोवर घासबी गोड लागायचा नाय....
                                             

तुजाच,

भोळा भाबडा भक्त

अमित कदम,

No comment

Leave a Response