Primary tabs

माझी परदेशवारी भाग ११

share on:

 

अखेरचा हा तुला दंडवत.........
 
आलो आलो म्हणता म्हणता हेग नेदेरलँड्समधून परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. कधी ना कधी ही वेळ येणारच होती, पण प्रत्यक्षात जवळ आल्यावर हुरहूर लागली.
आले त्या वेळी इथे आपला वेळ कसा जाईल, इथल्या वातावरणाशी जुळवून घेता येईल का अशा अनेक शंका मनात होत्या. कसं कोण जाणे पण मी इथे चांगलीच रुळले हे खरं. तसा स्वभाव जुळवून घेण्याचा आहेच म्हणा, तरीही इथल्या वातावरणाने मला आपलंसं केलं हे नक्की.
आजूबाजूची झाडं, इमारती, रस्ते, चर्चची ठराविक वेळी होणारी घंटा हे जणू माझे सगे सोयरे झाले आणि ह्या घराची बाल्कनी तर माझी जिवलग सखीच झाली होती. जरा मनाला मरगळ येतेय असं वाटलं की पटकन बाहेर जायचं की तरतरीत वाटलंच पाहिजे. तिला पण मी खूप मिस करणार आहे नक्कीच.
सुरुवातीला जाणवणारा बुजरेपणा हळूहळू कमी व्हायला लागला आणि एकट्याने शहरात प्रवास करण्याइतपत आत्मविश्वास येऊ लागला तोच परतीची वेळ येऊन ठेपली.
ह्या वेळी इतकं का बरं मन गुंतलं इथे ह्याचा विचार करू लागले. अर्थातच सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अनुश्रीचा इतका दीर्घ काळ मिळालेला सहवास. गेली पाच वर्षे शिक्षण, नोकरी ह्या निमित्ताने आमची ताटातूट झाली होती. ह्या आधी ती अमेरिकेत असताना भेटी झाल्या तरी अगदी थोडा काळ आणि कधी कुणा नातेवाईकांच्या घरी किंवा कधी हॉटेलमध्ये आम्ही सोबत राहिलो. एकत्र राहण्याचं सुख त्यामुळे फारसं अनुभवता आलं नाही. हा भाग मान्य केला तरी इथल्या वातावरणात अशी काहीतरी जादू होती की, मी रमलेच इथे.
इथे आलो त्या दिवशीच इथल्या हिरवाईने माझं मन मोहून घेतलं होतं. म्हटलं तर शहर, म्हटलं तर गाव असं काहीसं रूप आहे ह्या शहराचं. रस्त्यावर झाडी मुबलक, माणसं तुरळक. वाहतुकीची शिस्त वाखाणण्याजोगी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय उत्तम आणि आरामदायी आहे. स्वच्छता , शांतता मनात भरण्याजोगी. आपण सुखावतोच अगदी. बरं इथली स्थानिक जनता खूप जवळीक दाखवणारी नसली तरी परक्या देशातील म्हणून तुम्हाला कमी लेखत नाही. ह्याचं एक कारण असू शकेल की इथे स्थलांतरितांचे प्रमाण लक्षणीय आहे. काही का असेना आपल्याला उपरेपणाची जाणीव होत नाही हे खरं. हवा बहुतांश काळ सुखद गारव्याची अनुभुती देणारी. इतकं सगळं एका मुंबईकराला पुरेसे आहे नाही का रमायला!
एकंदरीतच संपूर्ण युरोपला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. पण हा देश मला जास्तच सुंदर वाटला. गावं, शहरे कशी टुमदार. त्यात कालवे जागोजागी त्यामुळे पाण्याची सोबत अगदी ट्रेनमधून प्रवास करताना पण असते.  त्यामुळे नजरेला थंडावा असतो कायम.
इथल्या लोकांची शिस्त म्हणाल तर नजर लागेल अशी. बस, ट्रेनमध्ये चढताना आधी उतरणाऱ्याला उतरू द्यावे हे कटाक्षाने पाळतात इथे. बसमध्ये वृद्ध आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी जागा राखीव असतात आणि त्या रिकाम्या असल्या तरी तेवढा वेळसुद्धा इतर लोक त्यावर बसत नाहीत. Ovi चिप कार्डचा वापर चढता उतरताना केलाच जातो. चढताना बसच्या ड्रायव्हरला हॅलो म्हणायची सवय अंगवळणी पडलीय आता. आपल्याकडे पण असा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. पण तिथे जो तो घाईत. इथे पण रेल्वे स्टेशनवर एकदा ऑफिस सुटण्याच्या वेळी गेलो असता आपल्याकडच्या सी. एस.टी. किंवा चर्चगेट स्टेशनवर दिसतात तशी लोकं धावताना दिसली.
इथे कोणीही, कधीही, कुठेही घुसताना मला तरी दिसलेलं नाही. मुळात जनसंख्या इतकी कमी आहे की तशी वेळच येत नसावी. पण तशी वृत्ती देखील दिसली नाही.
पर्यावरण दक्षतेच्या बाबतीत यांचा हात कोणी धरणार नाही. प्रवासासाठी सायकलचा वापर करतात. घरात वातानुकूलित यंत्रणा किंवा पंखे नसतात. (इथल्या हवेला त्याची जरुरी भासत नव्हती एवढे दिवस. पण यंदाचा इथला समर भारी कडक आहे म्हणतात इथले स्थानिक. तरीही बिचारे ते एन्जॉय करतात कारण नंतर फॉल आणि विंटरमध्ये सूर्य दर्शन होतच नाही ना.)
सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये, उपहारगृहांमध्ये कागदी रुमाल (टिश्यूज) वापरत नाहीत. एक मोठा रोलर ड्रम असतो त्याला कापडी टॉवेल गुंडाळलेला असतो. तुम्ही तो तुमच्या पुरता खेचायचा, हात पुसले आणि तो सोडला कि तेवढा भाग वळला जातो. पुढच्या माणसाला  पुन्हा कोरडा भाग ओढून बाहेर काढायचा असतो. अशा छोट्या छोट्या गोष्टीत पर्यावरणाचा विचार केला जातो. इथली माणसं कुटुंबप्रिय असतात. कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतं त्यांना. जुलै-ऑगस्ट हा सुट्ट्यांचा हंगाम. वर्ष वर्ष आधी इथले कर्मचारी आपल्या सुट्ट्या आरक्षित करतात. मग आयत्या वेळी प्रोजेक्ट पूर्ण व्हायला वेळ लागतो आहे असं झालं तरी सुट्टी रद्द होत नाही सहसा, कारण सुट्टीची गरज मान्यच केली आहे इथे. खाणं, पिणं पण प्रमाणात असतं ह्यांचं. दुपारच्या जेवणाला एखादं सँडविच खाल्लं की झालं.( ही माहिती अर्थात अनुकडून मिळाली. मी काही इथल्या ऑफिसमध्ये काम केलं नाही) पण एकंदरीत अमेरिकेत लोकं एकसारखे काही ना काही खाताना दिसतात तसे इथे दिसत नाहीत. शिवाय मैलोन मैल सायकल हाणतात. सहसा इमारतींना लिफ्ट नसतात अगदी चार पाच मजल्यापर्यंत सुद्धा. स्टेशनवर पण सरकते जिने असूनही जिने चढून जाताना पाहिलं मी अनेकांना. त्यामुळे सगळ्यांची शरीर यष्टी प्रमाणबद्ध. जाडी माणसं अभावानेच दिसतात. त्यातून शुद्ध हवा आणि पाणी याचा मुबलक पुरवठा, मग आरोग्य चांगलं न राहील तरच नवल. त्यामुळे जीवनशैली जन्य आजारांना फारसा थारा नसावा इथे असं मला वाटतं. इथली आणि एकूण युरोपमधली एक गोष्ट मात्र आवडली नाही, ती म्हणजे इथे सार्वजनिक ठिकाणी राजरोस धूम्रपान करायला मिळतं. त्याचा मात्र कधी कधी खूप त्रास होतो. अशा शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी इथल्या वास्तव्यात मिळाल्या. निवांत वेळेचा सदुपयोग करून लिखाण सुरू केलं आणि तुम्हा सर्वांपर्यंत मला भावलेला हा प्रवास मांडता आला. कधी आकाशाचे रंग नीटसे पाहिले नव्हते तिकडे लक्ष गेलं आणि मुंबईत राहत असताना आपण छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाला मुकलो होतो याची जाणीव झाली. पण आता मनाला ती सवय लागली आहे. आनंद आपल्या आसपासच असतो. रोजच्या जगण्यातले अगदी छोटे छोटे क्षण देखील आपल्याला आनंद निर्भर (आत्म निर्भर सारखं) करू शकतात. त्यांना शोधायची सवय मात्र लागली पाहिजे. इथल्या वास्तव्यात मला ती लागली आहे. त्यामुळे मुंबईत परतल्यानंतर देखील अशा छोट्या क्षणांतून मला गवसलेला आनंद तुमच्याबरोबर नक्कीच वाटून घेईन.
इथून निघताना अनुच्या विरहाने हृदयात कालवाकालव झाली तरी अंतरात अमाप ऊर्जा अनुभवते आहे जी मला पुढच्या भेटीपर्यंत आनंदी  आणि उत्साही ठेवेल यात शंका नाही.

डॉ.वंदना कामत

No comment

Leave a Response