Primary tabs

जीना हो तो मरने से नहीं डरो रे!

share on:

 

“जीना हो तो मरने से नहीं डरो रे!” असं म्हणत जगण्याची उत्कटता आपल्या कवितेतून आणि जीवनातून व्यक्त करणारे राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची आज पुण्यतिथी. २३ सप्टेंबर १९०८ रोजी बिहार मधील बेगुसराय येथे जन्मलेल्या रामधारी सिंह दिनकर यांनी इतिहास, विज्ञान आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी संपादन केली होती. अत्यंत ओजस्वी वाणी लाभेलेलं रामधारी सिंह दिनकर यांचे संस्कृत, हिंदी, बांग्ला, उर्दू आणि इंग्रजी या भाषांवर प्रचंड प्रभुत्व होते.  स्वातंत्र्यपूर्व काळात १९३४ ते  १९४७ या दरम्यान ते सरकार दरबारी सब-रजिस्टार आणि  प्रचार विभागाचे उपनिदेशक या पदांवर कार्यरत होते. रामधारी सिंह दिनकर यांच्या विद्वत्तेमुळे त्यांच्यावर प्रभावित झालेले इंग्रज शासन, रामधारी सिंह हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पुरस्कर्ते आहेत हे समजल्यावर त्यांच्यावर रुष्ट झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना बिहार विश्वविद्यालयात अध्यापनाचे कार्यही केले. यानंतर १९५२ साली त्यांची नियुक्ती राज्यसभा सदस्य म्हणूनही करण्यात आली. जवळपास एक तप ते राज्यसभा सदस्य होते. त्यानंतर भागलपूर विश्वविद्यालयाचे कुलपती आणि भारत सरकारचे हिंदीभाषा सल्लागार म्हणूनही त्यांनी कार्य केले.
अत्यंत मृदुभाषी असलेल्या दिनाकाराची काव्यरचना मात्र वीररस प्रधान आहे. छत्रपती शिवरायांची काव्यातून स्तुती करणारा उत्तर भारतातील कवी भूषण हा भारतीय काव्यपरंपरेत वीररस प्रधान काव्य रचनेत सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्या खालोखाल वीररस प्रधान कवित्वासाठी ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजे रामधारी सिंह दिनकर. "राश्मिरथी",  "परशुराम की प्रतिक्षा", ही त्यांची खंडकाव्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. वीररस प्रधान काव्य करणाऱ्या दिनकारांनी "उर्वशी" हे शृंगारिक काव्यही केलेले आहे. त्यांच्या "संस्कृति के चार अध्याय" या साहित्यकृतीला १९५९ साली साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. याचवर्षी त्यांना भारत सरकारतर्फे पद्म विभूषण पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले.
हिंदी भाषेच्या सन्मानार्थ आणि चीन विरोधी युद्धातील सरकारच्या धोरणाविरोधात थेट पंतप्रधानांना खडे बोल सुनावणारे, मृदू पण तितकेच स्पष्टवक्ते असणारे राष्ट्रकवी दिनकर यांनी २४ एप्रिल १९७४ रोजी इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या जीवनचरित्राचे वर्णन अगदी थोडक्यात करायचे झाल्यास त्यांच्याच काव्यपंक्तींचा आधार घ्यावा लागेल. त्यांच्याच शब्दांत वर्णन करायचे झाल्यास-   
छोड़ो मत अपनी आन, सीस कट जाये
मत झुको अनय पर भले व्योम फट जाये
दो बार नहीं यमराज कण्ठ धरता है
मरता है जो एक ही बार मरता है

तुम स्वयं मृत्यु के मुख पर चरण धरो रे
जीना हो तो मरने से नहीं डरो रे!
असे उत्कट जीवन जगलेल्या या राष्ट्र कवीला युवविवेक कडून शत शत नमन
-राष्ट्रप्रहरी

No comment

Leave a Response