Primary tabs

"तेंडुलकर" नावाचा ब्रॅंड!!

share on:

सचिन तेंडुलकर, हे एक नाव नाही, हा एक ब्रॅंड आहे. माझ्या लहानपणी एखाद्याचे नाव सचिन असेल आणि त्याला क्रिकेटची आवड असेल तर त्याला आमच्या एरियाचा सचिन तेंडुलकर ह्या नावाने गौरवले जायचे. योगायोगाने माझं आडनावसुद्धा तेंडुलकर असल्याने शाळेत असो वा कॉलेजमध्ये सगळीकडे सेंटर ऑफ अट्रेक्शनचा विषय असायचा. मग सचिन तुझा कोण रे? नातेवाईक का? असे अनेक प्रश्न विचारले जायचे. त्याची एक सवयच लागली नंतर मला. किंबहुना सचिनशी माझं नाव कोणत्यातरी कारणाने जोडलं जातंय या विचारानेच आपली "कॉलर टाईट" असायची.

असं म्हणतात की, "भारतात क्रिकेट हा जर धर्म असेल तर सचिन हा त्या धर्माचा देव आहे." माझे आई-वडील सुनील गावस्कर, कपिल देव, चेतन शर्मा, दिलीप वेँगसरकर ह्यांना आम्ही खेळताना पाहिले असं अभिमानाने सांगतात पण आम्ही गर्वाने सांगतो की, "आम्ही सचिनला खेळताना पाहिलं आहे."जेव्हापासून क्रिकेट हा खेळ समजायला लागला, तेव्हापासून मी सचिनला खेळताना पाहिलंय. परिस्थिती कुठलीही असो, भारत जिंकणार याची एकमेव आशा म्हणजे सचिन होता. सचिन आउट झाला की असं वाटायचं, "गेली मॅच आता." सचिन बाद झाला की मग टी.व्ही. पटापट बंद व्हायचे, कारण आता कोणाचा खेळ बघायचा? बघण्यासाठी उरलंच काय? हा प्रश्न नेहमी पडायचा. काय जादू होती ह्या माणसात काय माहीत पण त्याचा खेळ बघताना मजा यायची. सचिन आउट झाला की वाटायचं आपणच हरलोय. सचिनने शतक केलं की वाटायचं आपणच काहीतरी मोठ केलंय. त्याच्या बॅटमधून निघालेला प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार म्हणजे आम्हा सचिनवेड्या लोकांसाठी पर्वणीच असायची. सचिनची प्रत्येक खेळी ही प्रत्येक क्रिकेट रसिकासाठी पर्वणी होती. एकदा वसीम अक्रमने एका मुलाखतीत म्हटलं की, "सचिनचं मैदानावरचं असणं हेच विरोधी संघाला भीतीदायक वाटायचं." सचिन शेवटपर्यंत मैदानावर असेल तर आपण नक्की जिंकू अशी आशा असायची. कधीकधी एखादा आजारी माणूस जर मरणासन्न अवस्थेत असेल तर डॉक्टरसुद्धा बोलतात की हे आता देवाच्या हाती आहे तसंच आमची मॅच हरायला आली की यातून फक्त सचिनच मॅच वाचवू शकतो, अशी काही प्रमाणात वेडी आशा आम्हांला असायची.

सचिनचा फक्त खेळच उत्कृष्ट होता असं नाही. त्याचं वागणं, बोलणं, त्याच्या नम्र आणि शांत स्वभावाने त्याने त्याच्या विरोधकांनासुद्धा जिंकलं होतं. आपण अनेकदा बघितलं आहे की अनेक दिग्गज पंचांच्या चुकीच्या निर्णयावर भर मैदानात चिडले आहेत. कोहलीपासून ते कॅप्टन कूल धोनीसुद्धा पंचांसोबत भिडला. पण चुकीच्या निर्णयांचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो सचिनला. तब्बल ३९ वेळा सचिनला चुकीच्या निर्णयांचा फटका बसला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना जेव्हा एखादा चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला माघारी यावं लागतं हे एखादा मनापासून क्रिकेट खेळणाराच सांगू शकतो. पण अनेकदा असं होऊनसुद्धा पंचांच्या निर्णयाचा आदर करत सचिनने ते सर्व निर्णय मान्य केले. यावरूनच कळतं की सचिन किती शांत असेल. एकदा ब्रेट लीच्या (ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज) गोलंदाजीवर ब्रेट लीकडून चुकून एक बॉल हातातून निसटून जोरात सचिनच्या खांद्यावर आदळला. चूक सचिनची नव्हती, चुकून तो बॉल निसटून सचिनला लागला. असं वाटलं की सचिन आता ब्रेट लीला रागात बोलतो की काय, पण पुढच्याच क्षणाला सचिनने ब्रेटली सोबत हात मिळवला आणि खेळ पुन्हा सुरू झाला. त्याच्या शांत असण्याचं यापेक्षा वेगळं उदाहरण नको सांगायला.

माणूस म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीला देवपण सहज मिळत नाही, ते मिळवावं लागतं. सचिनने ते आपल्या कर्तुत्वाने मिळवले आहे आणि ही काही सामान्य गोष्ट नव्हे. मैदानावर संघ अडचणीत असताना मदतीला धावून जाणारा सचिन वैयक्तिक आयुष्यातसुद्धा अनेक गरजूंच्या मदतीला धावून गेला आहे. गरीब मुलांच्या शिक्षणापासून ते एखाद्या गावात वीज नेण्यासाठी सचिन नेहमीच प्रयत्नशील राहिलाय. पण हे देवपण मिळताना अनेक कठीण प्रसंगांतून सचिन जाऊन आलाय. स्वतःचे वडील वारले असताना सुद्धा जो व्यक्ती वर्ल्डकपमध्ये सेंचुरी करून भारताला पुढे नेऊ शकतो ह्यातून त्याची त्याच्या खेळाविषयीची श्रद्धा दिसते. कुठल्याच आलोचकाला तोंडाने उत्तर न देता आपल्या खेळाने उत्तर देणाऱ्या सचिनचा आदर्श सर्वांनी घ्यावा असा आहे. स्वभावात नम्रता आणि खेळातील प्रामाणिकपणा ह्या सचिनच्या जमेच्या बाजू. आणि कोणत्याही प्रसंगात चेहऱ्यावर स्मितहास्य ही तर सचिनची खासियत. कुठलाही गाजावाजा न करता अनेक गरिबांना मदत करणारा, सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणारा सचिन हा प्रत्येकासाठी आदर्शच म्हणावा असा आहे.

करोडो लोकांच्या अपेक्षा खांद्यावर घेऊन देशासाठी खेळत राहणं, त्यात प्रत्येकाला सेंच्युरीने आनंद द्यायचा आणि त्याचं प्रत्येक आउट होणं करोडो लोकांच्या मनाला चटका लावून जायचं. आजकाल लोक स्वतःच स्वतःला अनेक उपाधी लावून घेतात पण लोकांनी देवपण बहाल केलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेटच्या देवाचा आज वाढदिवस, वाढदिवसाच्या सचिनला खूप शुभेच्छा.

प्रथमेश श. तेंडुलकर

No comment

Leave a Response