Primary tabs

सामूहिक हल्ल्यात बळी कुणाचा आणि का?

share on:

 

गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२० रोजी मध्यरात्री आपल्या गुरूंच्या अन्त्यसंस्कारासाठी गुजराथ येथे जाणाऱ्या दोघा संन्याशांवर आणि त्यांच्या चालकावर पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात सामुहिक हल्ला झाला. या हल्ल्यात पंचदशनामी आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी, सुशील गिरी आणि त्यांच्या गाडीचे चालक निलेश तेलगडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चोर असल्याचा संशय आल्याने गडचिंचले येथील वन रक्षकाने या तिघांना हटकले आणि तो त्यांना कार्यालयात घेऊन गेला. त्याने पोलिसांनाही लगेचच कळवले. मात्र काही वेळातच तिथे मोठ्या प्रमाणात माणसांचा जमाव जमला. पोलीस आले असतानाही त्या जमावाने काठ्या सळयांच्या माऱ्याने या तिघांचीही निर्घृणपणे हत्या केली. हा सर्व घटनाक्रम थोड्या फार फरकाने सर्व माध्यमात प्रसारित झाला आहे मात्र या घटनेबाबतचे काही प्रश्न अनुत्तरीत आहेत :
इतक्या कमी कालावधीत एवढा मोठा जमाव जमतोच कसा?
जरी मान्य केलं की ते चोर असावेत तरी गावात चोर निघाले असता अशा हिंस्त्रतेने त्यांची थेट हत्या करण्याची पद्धत गावात आहे का? असल्यास त्याची नोंद पोलीस रेकोर्डला असायला हवी; नसल्यास या तिघांच्याच बाबतीत केवळ संशयावरून थेट जीवे मारण्याचा प्रकार घडण्याचे कारण काय? असे पहिल्यांदाच घडले आहे का? आणि जर पहिल्यांदा घडले नसेल, तर याआधीच्या सगळ्या घटना उघडकीस कशा आल्या नाहीत? त्या दाबून ठेवण्याचं कारण काय असेल?
समान्य माणूस अथवा सामान्य माणसांचा समूह अशापद्धतीने चोर पकडले असता त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन मोकळा होतो, परंतु ज्या पद्धतीने या दोघा संन्याशांना आणि त्यांच्या चालकाला मारण्यात आले, त्याचे चित्रण पाहिले असता हल्लेखोरांचा आवेश आणि उद्देश या संतांची हत्या करणे हाच होता हे सहज निदर्शित होत नाही का? पोलिसांच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालय पालघर यांनी शनिवार १८ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये हा सर्व कट असल्याचे म्हणण्यात आलेले आहे.

पोलिसांच्या अहवालाच्या विरुद्ध, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असणारे सरकार म्हणत आहे, की ही हत्या केवळ गैरसमाजातून झालेली आहे.  सरकारचे हे म्हणणे मान्य केले तरी, गृहखाते आणि पोलीस यांना राज्यातील संवेदनशील क्षेत्र माहीत असतात. केवळ संशयावरून समूह एकत्र येऊन हत्या होत असल्यास हे क्षेत्र नक्कीच संवेदनशील मानायला हवे. मग अशा ठिकाणी ४०० -५०० जणांच्या समूहाला नियंत्रणात आणेल इतका फौज फाटा नको होता का? तो ठेवण्याची जबाबदारी शासनाची नव्हती का?
केवळ संशय आला म्हणून दोन साधू आणि त्यांच्या चालकाला पकडण्यात येते आणि इतक्या रात्री अत्यंत कमी वेळात, ४०० ते ५०० लोकांपर्यंत ही बातमी पोहोचू शकते इतकी हल्लेखोरांची संपर्क यंत्रणा जबरदस्त असेल तर पोलिसांची गुप्तचर यंत्रणा या कालावधीत, इतका जमाव जमत असताना काय करत होती? म्हणजे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे मानायला हवे का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे.
सध्या सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेच्या मनात हे चित्रण पाहून भय आणि असुरक्षितता निर्माण झालेली आहे. चित्रणात दिसणारी पोलिसांची हतबलता आणि तटस्थता सामान्य जनतेला अस्वस्थ करत आहे.
भारतीय परंपरेत संन्यास परंपरेला सर्वोच्च स्थान दिले गेलेले आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतानाच भेदभावरहित मानाने संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी झटण्याची संन्यासी लोकांची परंपरा आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात या परंपरेबद्दल कमालीचा आदर आहे. पालघर येथील हत्याकांडाने ही मनं संतप्त झालेली आहेत. निरपराध आणि निशस्त्र संन्याश्यांवर हल्ला करणाऱ्या दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि या साऱ्या घटनेच्या खऱ्या सूत्रधारांचे पितळ उघडे पाडून त्यांचे चेहरे जनतेसमोर आणावेत आणि त्यांनाही शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आता सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
-राष्ट्रप्रहरी

No comment

Leave a Response