Primary tabs

माझी परदेशवारी भाग १०

share on:

अँम्सटरडॅम कॉलिंग

नेदेरलँड्सला येऊन पाच आठवडे झाले तरी अँम्सटरडॅम बघायचा योग आला नव्हता. हे म्हणजे काशीला जाऊन विश्वेश्वराचं दर्शन न घेण्यासारखं झालं की काय? असं वाटू लागलं होतं. त्याला कारण ही तसंच आहे म्हणा, जगातील सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेलं शहर असा लौकिक आहे त्याचा. नेदेरलँड्स म्हंटलं की अँम्सटरडॅम हेच वाटतं लोकांना.
तर एका रविवारी सकाळी आमच्या स्वाऱ्या विश्वेश्वर दर्शनासाठी निघाल्या. हेग सेंट्रल स्टेशन ते अँम्सटरडॅम सेन्ट्रल असा इंटरसिटी ट्रेनचा अर्धा तास प्रवास केल्यानंतर इच्छित स्टेशनात उतरलो. हवा चांगली होती आणि रविवार होता त्यामुळे मुबलक संख्येने पर्यटक होते. ह्याला गर्दी म्हणतात तिथे! गर्दीचा रुबाब काय तो आमच्या मुंबईचाच, बाकी कोणी त्याच्या पासंगालाही पुरणार नाही!
स्टेशन बाहेर आल्यानंतर एका बाजूला रस्ता आणि ट्राम वगैरे वाहतूक व्यवस्था आहे कालव्याच्या जोडीने, तर दुसऱ्या बाजूला नुसतंच पाणी. आम्ही पहिल्या बाजूला येऊन एक तासांची बोट टूर घेतली. ह्या टूरमध्ये इथल्या कालव्याच्या दुतर्फा असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती देतात. संपूर्ण शहराला वळसा घालून मेन हार्बर मधून फिरून ही बोट तुम्हाला परत आणून सोडते. हे कालव्याचं शहर असून, सगळ्या कालव्यांची एकूण लांबी १०० किलोमीटर भरेल. हे कालवे तीन मीटर खोल असून त्यावर ठिकठिकाणी पूल आहेत. पूलांची एकूण संख्या हजार पेक्षा जास्त भरेल. इटलीच्या प्रसिद्ध व्हेनिसपेक्षा इथे जास्त कालवे आहेत. कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या निवासी आणि कार्यालयीन इमारतींची माहिती ध्वनीफित आणि कॅप्टनचं बोलणं यातून मिळते.
हे शहर समुद्रसपाटीपासून दीड मीटर खाली आहे. इथलं आंतरराष्ट्रीय Schiphol विमानतळ तर समुद्रसपाटीपासून पाच मीटर खोल आहे. इथली जमीन दलदलीची असल्याने लाकडी भराव टाकून इमारती बांधल्या आहेत. त्या एका रेषेत नसून वरखाली दिसतात त्यामुळे त्यांना नाचणारी घरे (Dancing houses) म्हंटलं जातं. इथली घरं फारच अरुंद असतात कारण जितकी जागेची रुंदी जास्त तितका कर अधिक असा इथला कायदा आहे. त्यामुळे रुंदीला कमी पण खोली जास्त अशी घरांची रचना असते. इथल्या सगळ्यात छोट्या घराची रुंदी २.०२ मीटर असून खोली पाच मीटर आहे.
ह्याच शहरात जगातील एकमेव तरंगत फूल बाजार आणि मांजरांसाठीचे अनाथालय आहे. अशा अनेक चित्रविचित्र गोष्टींसाठी हे शहर प्रख्यात आहे. इथे किनाऱ्यालगतच मोटरकार्स आणि बाइक्स ( सायकल) उभ्या केलेल्या असतात. त्या पाण्यात पडू नये यासाठी रेलिंग लावलेले असूनही दर आठवड्याला किमान एक तरी गाडी जलसमाधी घेते अशी गमतीशीर माहिती कप्तानाने दिली.
बोटीतून बाहेर येऊन रस्त्यावरच्या सो कॉल्ड गर्दीत सामील झालो. देशात इतरत्र आहे, त्याप्रमाणे इथे सुद्धा सायकल स्वारांची संख्या लक्षणीय आहे. असं ऐकलं की इथल्या लोकांच्या संख्येपेक्षा जास्त संख्येने इथे सायकल आहेत. टळटळीत दुपार होती , पोटात कावळे ओरडत होते. गूगल भाऊंनी दाखवले त्याप्रमाणे "गांधी" असे नाव असलेल्या उपहारगृहाचा आधार घेतला. मॅनेजमेंट पंजाबी आणि दाक्षिणात्य अशी मिक्स असूनही उत्तर भारतीय पद्धतीचं बरं जेवण होतं.
तिथे जाताना वाटेत एके ठिकाणी सेक्स म्युझियम अशी पाटी दिसली. म्युझियम हे ह्या शहराचं अजून एक वैशिष्ट्य. Van Gogh च्या पेंटिंग्ज म्युझियमपासून ते ड्रगज म्युझियम, डिफॉरमिटी म्युझियम, टॉर्चर म्युझियम अशी विचित्र म्युझियम आहेत इथे. वेळेअभावी आम्ही कुठल्याच ठिकाणी जाऊ शकलो नाही. चालत चालत उत्साहाने सळसळत्या Dam square कडे निघालो. सोबतीला उत्साही पर्यटकांचे जत्थे होतेच.
वातावरणात एक विचित्र वास येत होता अधूनमधून तो वीड नावाने ओळखल्या जाणाऱ्या नशील्या पदार्थाचा होता असं कळलं. ह्याचा उपयोग संधीवातावरच्या औषधी तेलात केला जातो . अनुने विचारलं ते तेल घेण्याबद्दल पण नकोच म्हंटलं. चुकून नशाबिशा झाली तर? आधीच कसं काय अप्पा आणि चेहरा पुस्तकाच्या व्यसनाच्या गर्तेत मी पूर्ण बुडालेली आहे. आणखी व्यसन नको. फिरता फिरता चीझ फॅक्टरीमध्ये गेलो. वेगवेगळ्या चवीचं चीझ चाखायला मिळालं इथे. काळ्या मिरीच्या चवीचं चीझ आवडलं म्हणून ते खरेदी केलं. तिथून पुढे इथे प्रसिद्ध असलेला चुरोज नावाचा गोड पदार्थ खायला गेलो. चुरोजची ऑर्डर देऊन आत बसायला गेलो आणि काचेआडच्या गोड पदार्थांकडे पाहून डोळे विस्फारले. इथे आल्यापासून कॅलरी वगैरेचा विचार सोडूनच दिला आहे मी. पण ह्यावेळी मात्र चुरोज तेवढे खाल्ले, बाकीचं सगळं डोळे भरून पाहिलं फक्त.
परतीच्या प्रवासाची वेळ झाली होती. अजून काही गोष्टी बघायच्या होत्या खरं तर. त्यात महत्त्वाच होतं Anne Frank house. हो तीच डायरीवाली! नाझी भस्मासुरांपासून वाचण्यासाठी तिला आपल्या कुटुंबासह आणखी चार लोकांसह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लपून राहावं लागलं होतं. तिचं ते आश्रयस्थान आज Anne Frank फौंडेशनने म्युझियममध्ये रूपांतरित केलं आहे. लपून राहण्याची जागा असल्याने अत्यंत अरुंद जिने आणि अडनिड्या प्रकारची जागा आहे . अनुने ते पाहिलं असल्याने मला जाण्यासाठी सोयीस्कर नाही असा सल्ला दिला आणि मला त्याबद्दल सगळी माहिती दिली. इतक्या भयानक वातावरणात राहून देखील कोवळ्या वयात इतकी सकारात्मक विचारसरणी ठेवल्याबद्दल कमाल वाटली मला.
हे शहर, नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे. इथले कितीतरी नाईट क्लब्स हे जगात प्रसिद्ध असलेल्या पैकी आहेत. इथली वेश्या वस्ती देखील विख्यात आहे. आज सत्तरीच्या आसपास वय असलेल्या त्यापैकी दोन जुळ्या बहिणी सध्या चक्क टुरिस्ट गाईडचं काम करतात. असंही पुनर्वसन किंवा निवृत्ती पश्चात जीवन असू शकतं याचा आदर्श घालून दिला आहे त्यांनी. हे शहर नेदेरलँड्सची राजधानी असलं तरी सगळा राज्य कारभार मात्र हेग शहरातून केला जातो नेदेरलँड्सला बरेच जण हॉलंड म्हणतात, पण नॉर्थ आणि साऊथ हॉलंड हे दोन परगणे(प्रॉव्हिन्स) असून नेदेरलँड्सचा एक भाग आहेत. नॉर्थ हॉलंड प्रॉव्हिन्सची राजधानी अँम्सटरडॅम नसून Haarlem नावाचं शहर आहे( किती तो गोंधळ !)
तर असं हे अँम्सटरडॅम युरोपियन युनियनमधलं सगळ्यात जास्त लोकसंख्या घनता असलेलं बहुढंगी बहुरंगी शहर एका भेटीत जितके जमेल तितके पादाक्रांत करून आम्ही परत निघालो , पण Amsterdam was still calling .....

- डॉ. वंदना कामत

No comment

Leave a Response