Primary tabs

फॅरेनाईट ४५१ -पुस्तक परीक्षण

share on:

You don't have burn books to destroy a culture, just get people to stop reading them.
                                                -  Ray Bradbury

वाचन हा देखील प्रत्येक संस्कृतीचाच एक भाग असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर, तसेच जडणघडणीवर पुस्तकांचा प्रचंड असा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. राजकारणाच्या आखाड्यातील डावपेचांपासून ते मनोरंजनापर्यंत, ज्या ज्या गोष्टीची माहिती आपल्याला हवी आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला पुस्तकं पुरवत असतात. इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे तो म्हणजे Today a reader, tomorrow a leader. इतकं महत्त्व असतं आपल्या जीवनात पुस्तकांचे.
    जर इतकं महत्त्व आहे आपल्या जीवनात पुस्तकांचे तर मग अशी एक कल्पना करू या की, आपण राहत आहोत त्या शहरात, त्या गावात असा एक कायदा पास झाला की, आपण आपल्याच घरात कोणत्याच प्रकारची पुस्तकं जवळ बाळगू शकत नाही. अगदी एक पुस्तक सुद्धा जवळ ठेवू शकत नाही तर काय अवस्था होईल आपली? काय करू अशा वेळी आपण?  आणि समजा चुकून-माकून जरी एक पुस्तक आपल्याजवळ सापडलेच तर ... किंवा तशी हलकीशी जरी कुणकुण कुणाला लागली की, तुम्ही पुस्तकं बाळगून आहात म्हणून तर..? तर तुमचे घर शहरातील फायरब्रिगेडचे लोक जाळून टाकायला येतील. इतकी मोलामहागाची कुठून-कुठून, काय-काय, सायास करून जमवलेली दुर्मीळ पुस्तकं आपल्याच डोळ्यादेखत, आपल्याच समोर, आपल्या अंगणात जाळून टाकली तर...? नाही ना ही कल्पना सहन होत. मलाही नाही झाली सहन. शहारलोच होतो मी या अभद्र कल्पनेने!  कुठुन हा दळभद्री विचार माझ्या मनाला शिवला कुणास ठाऊक? पण अघोरी विचाराचे बीज माझ्या मनात रोवलं गेलं, ते मागच्या आठवड्यात युट्युबवर ऐकलेल्या;  रे ब्रॅडबरीच्या 'फॅरनाईट- ४५१' ही कादंबरी ऐकताना. आपल्या घरातील सर्व पुस्तकं ही मंडळी झडती घेऊन जाळून टाकणार! या कल्पनेनेच थरकाप होतो जिवाचा. माझं साधं एक पुस्तक मी लवकर कुणाला देत नाही इथं तर अख्खीच्या अख्खी माझी जिवलग पुस्तकं जाळायची म्हणतो...! अशक्य ! अशक्य ! निव्वळ अशक्य!
     रे ब्रॅडबरी हा एक दिग्गज अमेरिकन विज्ञानकथा लेखक तसेच कादंबरीकार होय. प्लेबाॅय या मासिकाच्या मार्च १९५४ च्या अंकात रे ब्रॅडबरी यांची सर्वाधिक गाजलेली कादंबरी ‘फॅरनाईट- ४५१’ पहिल्या भागासह दाखल झालेली दिसते. ब्रॅडबरींचे विज्ञान कथालेखक म्हणून खूप मोठे नाव प्राप्त झालेले असताना देखील तीन भागांची ही मालिका प्लेबॉयच्या साहित्यिक आघाडीची नांदी होती. या कादंबरीचे भाग प्लेबाॅयमध्ये छापले गेल्यामुळे प्लेबाॅयचा खप देखील खूप वाढला होता असे आजही कित्येक दाखले सापडतात. रे ब्रॅडबरींना प्लेबाॅयसाठी लिहायला फार आवडायचं. प्लेबाॅयच्या जानेवारी १९५५ च्या अंकात ब्रॅडबरींसोबत जॉन स्टाइनबॅक यांचीदेखील कथा आहे.
     'फॅरेनहीट ४५१' हे एक असं तापमान आहे, ज्या तापमानाला पुस्तकाची पाने पेट घेतात. या कादंबरीचे मुख्य पात्र आहे 'गे माॅन्टॅग' हा एक फायरब्रिगेडच्या दलातील फारयमन आहे. माॅन्टॅगवर विक्षिप्त वागण्याने त्याचा मेंटाॅर 'कॅप्टन बेट्टी' याला माॅन्टॅगवर संशय येतो की त्याने पुस्तकांचा संग्रह केला आहे म्हणून. शहरात जर असं कुणीही आढळलं की, जो आपल्याजवळ पुस्तक बाळगून आहे; तर त्यांच्या घरावर छापा घालून पुस्तके राॅकेल टाकून जाळून टाकण्याची कामगिरी या फायरब्रिगेडच्या टीमला दिलेली असते. या फायरब्रिगेडच्या टीममध्ये काम करणाऱ्या माॅन्टॅगलाच एक दिवस पुस्तक वाचण्याचा मोह उत्पन्न झाला तर मग..! इथेच तर खरी मेख आहे. तोच पुस्तकांच्या प्रेमात पडला तर! या कादंबरीचा नायक माॅन्टॅग म्हणतो तसं Books makes you unhappy, antisocial. Books are dangerous. अर्थात याचा प्रतिवाद होऊ शकतो. ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे. ही कादंबरी ब्रॅडबरींनी १९५० मध्ये लिहिलेली आहे नुकतेच दुसरे महायुद्ध संपून उणीपुरी पाच वर्षही झालेली नव्हती. याच महायुद्धाचा या कादंबरीवर प्रभाव आहे. नाझी पक्षाची मंडळी मित्रराष्ट्रांचा जिंकलेल्या भागातील त्यांचं साहित्य नष्ट करत असत. त्यांची पुस्तके जाळून टाकत असत. या पार्श्वभूमीवर ही कादंबरी उभी आहे. आजकाळच्या टॅब्लेट, किंडल, विकिपिडीयाच्या काळात प्रत्यक्ष पुस्तकं कोण हातात धरून वाचतं? तंत्रज्ञान क्रांतीच्या या काळात पुस्तकं जाळून टाकणे हे तसं हास्यास्पद वाटेल. कारण हार्ड काॅपी बाळगणे याला आता काही फार बरे दिवस राहिले नाही. पण कादंबरी वाचताना त्याचा ती कादंबरी कोणत्या काळाचे प्रतिनिधित्व करते आहे हे लक्षात घेऊन वाचावी लागेल. त्यामुळे प्रफुल्ल शिलेदार यांची पुस्तकांवरची कविता उद्‌घृत करतो आणि थांबतो.  

पुस्तकं अचानक कडेलोटपर्यंत नेतात चाकूपेक्षा धारदार होतात.
थंड डोक्याने माथे फिरवतात
हल्यांमध्ये दगडकाठ्या
साखळ्यासाखळी होतात भोसक्याभोसकीत सुऱ्याचं काम करतात.
दिवसाउजेडी बाजारात गाठून कपाळावर रोखलं जाणारं रिव्हॉल्व्हर होतात.
अपरात्री फोन करून दम भरतात रंगमंच उधळवून लावणारे बेभान प्रेक्षागार होतात.
- अजिंक्य कुलकर्णी

No comment

Leave a Response