Primary tabs

अस्तित्वाच्या पाऊलखुणा...

share on:

कवितासंग्रह - अस्तित्वाच्या पाऊलखुणा
कवयित्री - आरती देवगांवकर
बुकगंगा पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या - ११२
मूल्य - १४९/-

कवयित्री 'आरती देवगांवकर' यांचा संग्रह हाती आला तेव्हा, या संग्रहाच्या मुखपृष्ठाने आधीच लक्ष वेधून घेतले होते. लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा जाणवलं, हे सहज सोपं चित्र नक्कीच नाही. आपले बाईपण मनातून जपत, अर्धवट उघडलेल्या ओठातून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणारी, सभोवतालच्या गर्दीतून, कोलाहलातून, अस्तित्वाची पाऊलवाट तयार करून दूर स्वतःची एक स्पष्ट जागा तयार करणारी 'ही' आजची स्त्री आहे! 'ती' स्त्री आपल्याला या संग्रहात सहज भेटत राहते. या संग्रहाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रसिद्ध लेखिका, कवयित्री 'आसावरी काकडे' यांनी मलपृष्ठावर नोंदवलेली संग्रहाबद्दलची ठळक वैशिष्ट्ये आहेतच, तसेच प्रस्तावना 'अंजली कुलकर्णी' यांच्या लेखणीतून उतरली आहे. ज्यामध्ये, 'सत्त्वगुणाची कविता' हे शीर्षकच खूप बोलके वाटते. 'डॉ. अनघा लवळेकर' यांच्यासारख्या विदुषींनी याला 'आत्मस्वराची कविता' असे संबोधले आहे. आपल्या या छोट्या, पण समर्पक निवेदनातून आपल्याला संग्रह वाचण्याची उत्सुकता त्यांनी वाढवली आहे. 'आरती देवगावकर' यांनी मनोगतात त्यांच्या कवितांचा प्रवास सहज आपल्यासमोर मांडला आहे. ज्यात कवितेची ऋणी असल्याचे त्या नमूद करतात.

आता प्रत्यक्ष संग्रह आणि कवितांबद्दल :  या कवितांमध्ये एकूणच एक संवेदनशील, भावुक, हळवी, प्रेमळ तरीही तटस्थ भूमिका मांडणारी एक स्त्री आहे. जीवनात होणाऱ्या सर्व चढ-उतार यांना सामोरं जात असताना पहिल्याच 'जोनाथन' कवितेत कवियत्री म्हणते.. “शोध घे तुझ्यात दडलेल्या अमर्याद क्षमतांचा, बाळगू नकोस धास्ती क्षितिजाचीही..” अन् या कवितेत शेवटाकडे येताना कवयित्री म्हणते.. “लक्षात ठेव, "पूर्णत्वाला नसते कोणतीच मर्यादा!" असे सकारात्मक ऊर्जा देणारे शब्द जेव्हा कवितेत येतात, तेव्हा नक्कीच इतर नाऊमेदांना काहीतरी उमेदीचा किरण यातून नक्की मिळेल अशी आशा वाटत जाते. पुढच्या कविता जसे 'सूर्य, स्थलांतर', यामध्ये ही ऊर्जा कायम पुढे पुढे वाहत राहते. 'सावली' या एका छोट्या, पण आशयघन कवितेत कवयित्री म्हणते.. “निदान तू तरी राहशील ना माझ्याबरोबर, मी अगतिकतेने विचारलं तिला, माझ्या सावलीला..” ती उत्तरली, "हो तर! मी आहे तोपर्यंतच.. जोपर्यंत तू गुरफटून घेत नाही, स्वतःला अंधारात.." लख्ख प्रकाश पडून एक ऊर्जेचा स्त्रोत आपल्यात यावा तशी प्रकाशमान करते ही कविता. 'जमायला हवं', यामध्ये "आयुष्यात कधीतरी आरशासारखं निर्लेप होणं जमायला हवं." या पहिल्याच वाक्यात कवितेनं मन जिंकलेलं आहे, कवी मनाच्या माणसाला सहजपणे हे साध्य होत नाही, याचा प्रत्यय यामध्ये येतो. संग्रहातील पुढची प्रत्येक कविता साधारण एक विचार देत जाते अथवा प्रश्न निर्माण करत राहते आणि अनेकवेळा आपण त्यातल्या विचाराशी सहमत होत, आपल्या अनुभवांची उजळणी करून घेत पुढे जात राहतो. अभंगछंदातील कवितेतील या ओळी पाहा. “माझ्यामध्ये एक । ब्रम्हांडाचा अंश । जाणिवेचा दंश, साहवेना ।।“ असे शब्द येतात तेव्हा, तो दंशही सहन होत नाही, अशी भावनाप्रधान मनाची जाणीव तीव्र होत जाते. स्व-संवाद यातील मांडणी बघा.. “शब्दांना द्यावी विश्रांती, स्वरांना द्यावा आराम, बसावं कधीतरी शांत बघावं स्वतःच्या आत” किती सोप्या शब्दात संदेश मांडलाय पाहा. याच अभंगछंदात पुढे 'लिफाफा' कवितेत देहाचा लिफाफा बघण्याचे आवाहन कवयित्री करते.

'आत्मस्वर' यामधलीही अष्टाक्षरीत कवयित्रीची शब्दगुंफण आवडून जाते.. “जाया हवे खोलवर, हवे उपसाया पाणी, आत तेव्हाच शिरेल, ज्ञाना तुकयाची वाणी !!” आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंद व्हाव्यात, क्षितिज विस्तारावे अशी एक अपेक्षा कवितेत व्यक्त होते आहे. 'तहान' कवितेतील युगांची तहान ही उपमा फारच चपखल वाटते त्याचे शब्द असे आहेत. “आली उफाळून माझी, किती युगांची तहान, आत कोंदल्या अंधारा, मिळो प्रकाशाचे दान!” ही तहान कविता वाचत जाता तसतशी कमी न होता वाढत जाते. त्यानंतरच्या कविता शस्त्र, नभापारचे विश्व, एक मौनाचा कोपरा, साद या तर खास जमून आल्या आहेत. 'जाणीव परीघ' यातला विचारांचा परीघ खरंच किती रुंद आहे याची साक्ष पुढील ओळींतून येते. त्या ओळी अशा.. “कधी जागते करुणा, कधी ममत्व वाटते, नात्यागोत्याचा ना कुणी, तरी डोळा पाणी येते..” किती सहजभाव एखाद्या अनोळख्यासाठी लिहून जाते, हे संवेदनशील मन!! यापुढे 'माझ्यानंतर' या शीर्षक असणार्‍या कवितेत, कवयित्रीला तिच्या कविता लेकीसारख्या माया लावून मागे उरलेल्या दिसतात आणि त्यांच्यामध्ये तुटल्या जिवाचे धागे अडकलेले आहेत त्याने ती भावूक झालेली दिसते. 'कलाटणी' कशी काय मिळाली हे सांगताना कोंडलेल्या शब्दांची गाणी झाली ही कबुली आपल्याला मिळते. किती सोप्या, सहज शब्दांत कविता निर्मितीचे सार सांगितले इथे. संग्रहात यानंतर 'शब्द' या शब्दावरच काही रचलेल्या अष्टाक्षरी आपली दाद मिळवतात, त्यातील एक वानगीदाखल.. “शब्द संवादाचा पूल, पांघरितो माया झूल, कोणा बेसावध क्षणी, शब्द देतो कधी हूल..” वाह, क्या बात है! नकळत ही आपलीच भावना मानली जाते आणि त्या आनंदात पुढे आपण वाचत राहतो.

एका आकर्षक चित्रावर थोड्या जाडसर फॉन्टमधे एक कविता समोर येते, 'वर्षा' नावानं.. त्याच्या शेवटच्या कडव्यात अष्टाक्षरीत असे बोल आहेत.. “माझी मीच ठरवावी, माझ्या क्षितिजाची रेघ, बरसेला हवा तेव्हा, तिथे माझा मनमेघ” इतर अनेक सुंदर कवितांनी अव्यक्ताच्या काठावरून आपणही छान फिरत राहतो. भ्रम, अद्वैत, झाक, पाझर, सयसुगंध यांसारख्या शब्दवैभवातून कवयित्री स्वतःला उलगडते. खपली, ओठांवरले गाणे, अबोल नाते यांसारख्या समृद्ध कविता आपलीही वाचनतृप्ती करत राहतात. 'जिंदा रहनेसे सबकुछ संभव है!' हे स्वतःला बजावत कवियत्री आपल्याला वास्तवाच्या जगात आणते. यातील 'सदाफुली' ही कविता “सदाफुली सुद्धा एक बाई आहे”, असा समान धागा जोडते आणि बाईपण अधोरेखित करते. कविता वाचताना काही स्टार मार्क करून ठेवले आहेत, पुन्हा वाचताना त्यातील आवडत्या ओळी हे अधोरेखित करत गेले आहे. 'गोधडी' या शब्दासाठीचा खास इंग्रजी शब्द 'क्विल्ट' हा शीर्षक म्हणून खूप परफेक्ट वाटतो, बाईच्या जगण्याचा आयाम दाखवतानाचे शब्द तर काय सुरेख पाहा.. “जन्मजात सोशिकतेच्या धाग्याने नि आशेच्या चिवट सुईने, विणतच राहते ती.. जोडून घेत राहते सगळी आपली.. परकी.. कवेत घेऊ पाहते सारा भवताल..” या ओळींची आपण पुनरावृत्ती करूनच पुढची कविता सोडवत जातो.

संग्रहाच्या शेवटाकडे येताना काहीसे खोलात जाऊन आपण पुन्हा पुन्हा कविता वाचत राहतो. 'रजस्वला, क्षमा, दुःख' या काही वानगीदाखल कविता आपल्या लेखनाची दखल घ्यायलाच लावतात. या संग्रहातील बऱ्याच कविता अष्टाक्षरी आहेत, काही अभंग वृत्तात आहेत आणि अनेक मुक्तछंद आहेत जे सहज मनाला भिडतात. 'आरती देवगावकर' यांच्या अनुभवसंपन्न, भावनिक नात्यांच्या शब्द गुंफणातून तुम्ही इतक्या सहज नाही सुटून जाऊ शकत.. बरं का!! काही कविता यावर नक्कीच काही अभ्यासपूर्ण विचाराअंती लेखणी झरली आहे, त्या नावांमध्ये इतिहासातील स्त्रिया येतात 'अहल्या, गांधारी, शूर्पणखा' आपल्याला नव्याने भेटत राहतात. 'स्त्री' या नात्याने पाहिलेला नवीन आलेख खूप काहीतरी देऊन जातो हे निश्चित. 'अस्तित्वाच्या पाऊलखुणा' या संग्रहाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. 'बुकगंगा पब्लिकेशन्स' यांचा हा उत्तम कवितासंग्रह प्रत्येक रसिकाने आपल्या संग्रही ठेवावा असाच आहे, असं मी म्हणेन. पुढील वाटचालीसाठी आरतीला भरपूर शुभेच्छा देऊन, यानंतरच्या संग्रहाच्या प्रतिक्षेत वाचक आहेत, याची ग्वाही देऊन मी थांबते.

चिन्मयी चिटणीस
 

No comment

Leave a Response