Primary tabs

कर्फ्यु

share on:

रात्रीच ठरवले होते... मस्तच गाढ झोप घ्यायची...निवांत उठायचे...दिवसभर हवे ते खायचे ,प्यायचे! एकूण काय तर देशभरात लागू झालेल्या "कर्फ्यु"चे दणक्यात स्वागत करून आपलाही हातभार लावायचा... असा साधा विषय होता.

पण ठरल्याप्रमाणे घडणे हे जणू दुर्मीळच हो ना..........? रोज घड्याळाचा व त्याआधीच मनाचा गजर होतो ना! त्याचे काय करू? सकाळी सहाला नेहमीप्रमाणेच जाग आली. पण खूप झोपायचा निश्चय होता ना....! मग हळूच डोळ्यांच्या कडामधून आजूबाजूच्या गोष्टींचा कानोसा घेतला....! डोळे गच्च बंद करून पुन्हा पांघरुणात घुसले.इतक्यातच...................!
बेडरुमच्या खिडकीबाहेर कसलीशी हालचाल जाणवली...! अन् डोळ्यांच्या दुर्बीणीचा आकार मोठा झाला. कानांनी साथ दिलीच होती...! मग काय हातांनी अंगावरील पांघरुण सरकवले आणि पाय अलवार खिडकीकडे चालू लागले....!
अलगद चाहूल घेत खिडकीची काच सरकवली अन् काय सांगू......अहाहा....! ! वाऱ्याची मंद ,शीतल झुळुक मला वेढून साऱ्या बेडरूममध्ये पसरली. माझा चेहरा व हात तर केव्हाचे खिडकीला बिलगले होते. मोकळ्या केसांच्या बटा वाऱ्याशी गुज करू लागल्या.....!
तन-मन समोरच्या दृश्याचा मनमुराद आस्वाद घेऊ लागले...! जणू एका वेगळ्याच जगात मी प्रवेश केला होता. खिडकीलगतच बाहेरच्या लॉनवर रविराजा मस्त तेजस्वी किरणांची पखरण करण्यात मश्गुल होता. समोरून त्याची लालिमा दर्शन देत होती तर आजूबाजूला त्याचे नवचैतन्य भरून वाहत होते. इतक्यातच खिडकी बाहेरील पिवळ्या गुलाबावर "श्याम श्वेत" फुलपाखरांची जोडी भिरभिरून गेली. असे वाटले जणू... त्या गुलाबाच्या पाकळीवरील दवरुपी आरशात स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळण्यासाठी ती जोडी आली होती....!
एका कोपऱ्यात जास्वंद आपल्या अंगा-खांद्यावर टपोऱ्या गडद लाल सुमनांना घेऊन डोलत होती. तिला बघून असे भासले जणू..... एवढयातच लंबोदर प्रकटतील आणि ही वेडी जास्वंद त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करेल...! का कोण जाणे..? पण आता खिडकीत उभे राहावेसे वाटेनाच...! मग काय...? केस नीट करतच एका "क्लच"मध्ये अडकवले व टिपॉयवरील ओढणी अंगाभोवती वेढून घेतच पायात चपला अडकवून मी बाहेर पडले.
घर फार मोठे नाही व सभोवतालची बागही तशी आटोपशीरच...! पण आज त्या छोट्याशा जागेतही नंदनवन फुलल्याचा भास मला होत राहिला. रोज घाईघाईने घरकाम उरकून अॉफिसच्या दिशेने धूम ठोकत असल्याने स्वतःपाशी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या सुखाची मला कल्पनाच नव्हती. घराबाहेर पसरलेल्या हिरवळीची संपदा मी विसरूनच गेले होते. ते सारे वैभव आज नव्याने पाहिले आणि पायातल्या चपलांनी हळूच साथ सोडली. मी जमिनीवर म्हणजेच निसर्गाच्या भानावर आले. अंगावर पांघरलेल्या ओढणीला हवेतील गारवाही खुणावू लागला अन् ती ही अलगद एका खांद्यावर विसावली.
गेटजवळच आंबा आपल्या अदमुऱ्या मोहोरास सावरत उभा होता. सभोवतालच्या वातावरणात मोहोराचा सुगंध विखुरला होता..! झाडाखाली जाऊन उभी राहिले तर वरती पानांमध्ये सळसळ झाली. पाहिले तर कोकीळ स्वतःची ऐट सांभाळत डौलाने आंब्याच्या मोहोरावर आपले वर्चस्व सांगत होती...! बघतच रहावेसे वाटले..! कोकीळेच्या दर्शनाने मन तृप्त होते न होते तोच माझा लाडका भारद्वाज तिथे धावत आला....! पंखांची फडफड करतच तो आंब्याच्या पर्णसंपत्तीत लपला..! पण काही का असेना...! "सकाळी सकाळी याचे दर्शन झालेय म्हणजे आता पूर्ण दिवस छान जाणार" अशी माझी मीच गोड , संस्कारीत समजूत करून घेत स्वतःशीच हसले.
पलीकडच्या बंगल्याच्या आवारात छान हिरव्या पोपटी पेरूनी झाड बहरले होते. तिकडचा पाहूणचार आटोपून राघूशेट हलकेच माझ्या घराच्या आवारात घुसले होते. न जाणो इकडेही काहीतरी शोध सुरूच होते त्याचे....! ते ही सुरेल "मिठुगिरी" करतच बरं का ! !
आज कितीतरी दिवसांनी मी या साऱ्या गोष्टींची जवळून अनुभुती घेत होते. झोपेतून जागी झाले की स्मार्टफोनला कवेत घेणारी मी आज फोनलाच विसरले होते. झाडाफुलांना, पानांना मायेने गोंजारत होते. तिथे जवळच पडलेल्या पाण्याच्या पाईपमधून मी सर्वांना "जलसंजीवनी" ही देण्याची हौस भागवून घेतली. रोज उठता बसता सॕनिटायझर व टिशू पेपरच्या माध्यमातून स्वच्छतेचे नियम पाळताना आज मी चक्क पाण्यात मनसोक्त भिजले. खळखळून वाहणाऱ्या पाण्याच्या पाटात स्वतःला न्याहाळले. काय अन् किती सुखसमाधान मिळाले कसे सांगू.....? त्याची गणती केवळ अशक्यच हो ना......?
पण हे सारे सुख वैभव लाभले ते कशामुळे...?
तर कोरोनामुळे...! रोज फक्त काम.....काम आणि कामच....! आज शासनाने कंपल्सरी सुट्टी जाहीर केली अन् मी आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहण्यास प्रवृत्त झाले. मीच माझ्या घराभोवती रचलेल्या निसर्गावर साधी नजर टाकायलाही वेळ मिळत नव्हता तो आज मिळाला......! सतत घड्याळातील आकड्यांच्या मागे धावणारे आपण काय मिळविण्यासाठी घराबाहेर पडतोय हा प्रश्न मला खूप सतावत राहिला.
याचे उत्तर अर्थातच प्रत्येकाकडे वेगवेगळे असणार पण मला एकच सापडले......!
काहीही गरज नसताना माणसाने स्वतःच्या अपेक्षांचे ओझे इतके बोजड करून ठेवलेय की ते सावरत अथकपणे धावताना आजकाल माणूस "स्वत्व" कुठेतरी हरवत चाललाय....! त्याच अनुषंगाने प्रत्येकजण नैसर्गिक आनंद बाजूला सारून कृत्रिम [so called modern] संस्कृती अंगिकारत आहे. पण याचे दुष्परिणाम म्हणून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या परिस्थितीकडे ही डोळेझाक करून चालणार नाही इतकेच मला सांगायचे आहे. तेव्हापासून मी तरी एक निश्चय केला आहे. रोज अर्धा तास लवकर उठून या विस्मृतीत ढकलून दिलेल्या संपदेची काळजीपूर्वक देखभाल करायची व मंद शांत संगीताच्या सहवासात, निसर्गाशी दररोज जवळीक साधायची.....! या निसर्गावर भरभरून माया करायची आणि आपले घर अंगण व पर्यायाने संपूर्ण पृथ्वीवर नवचैतन्य फुलवायचे. 
       मला तरी समर्पक "कर्फ्यु" लागला आहे. चुकीच्या सवयींवर.....! कृत्रिम गोष्टींपासून शक्य तितके दूर राहण्यावर.....! चांगल्या सवयी लावून, रोज फुललेल्या फुलांना फक्त "WOW" म्हणत गाडीवर बसण्यावर.....! निसर्गाची एकरूप होण्याचे भाग्य मी कायम मिळवेन आणि खऱ्या अर्थाने सुखी संपन्न होईन यात शंकाच नाही.
माझे तर ठरलेय....! स्वतःमध्ये असणाऱ्या आळसाला कर्फ्यु लावायचा. २१ दिवसांच्या या सक्तीच्या सुट्टीने माझ्यात सकारात्मक बदल घडवलाय त्याचा पुरेपूर पालन करत वृक्ष संवर्धन करायचे. घराच्या आवारात तर फुले, फळे फुलवायचीच पण त्याहीपुढे जाऊन शक्य त्या रिकाम्या जागेत झाडे लावायची व ती असोशीने जपायची. कारण जर आपल्या आजूबाजूला ही झाडे हसली ,बहरली तरच संपूर्ण चराचर हसरे होईल व आपले चेहरेही सुखसमाधानाने फुलतील.
शुभांगी दळवी

No comment

Leave a Response