Primary tabs

घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरं! : भाग – ४

share on:

कंपनीने ‘२:१’ या प्रमाणात बक्षीस समभाग (Bonus Shares) जाहीर केला तर याचा अर्थ असा की, प्रत्येकी १ शेअरमागे २ बोनस शेअर्स मिळतील. या ‘२:१’ अशा गुणोत्तरातला पहिला आकडा हा नेहमी बक्षीस समभागाचा असतो आणि गुणोत्तराप्रमाणे शेअरचा मार्केटमधील भावही बदलतो. त्यामुळे सहसा केवळ बक्षीस समभाग (Bonus shares) मिळतो आहे, म्हणून कधीही शेअर खरेदी करू नये. बक्षीस समभाग (Bonus shares) ही केवळ ‘अकाउंटिंग एन्ट्री’ असते..

या भागात आपण शेअर बाजारातील काही मूलभूत आणि महतत्वाच्या संकल्पनांची थोडक्यात माहिती करून घेऊ. अर्थात, शेअर बाजारामध्ये तुम्ही जितकी प्रत्यक्ष काही गुंतवणूक वा खरेदी-विक्री करत जाल, तेवढ्या या संकल्पना अधिक सखोल कळत जातात.

१. खरेदी भाव / मूल्य (Buy Rate ) : ट्रेडिंग स्क्रीनवर आपल्याला Buy Rate असा रकाना येतो, तो म्हणजे त्या शेअरचा खरेदी भाव.

२. विक्री भाव / मूल्य (Sell Rate) : ट्रेडिंग स्क्रीनवर तुम्हाला Sell Rate असा रकाना येतो, तो म्हणजे शेअरचा विक्री भाव.

आता आपल्याला अंदाज येईलच की जो भाव कमी असतो तो खरेदीचा भाव असतो व जो भाव जास्त असतो तो विक्रीचा भाव असतो. म्हणजे ज्याला शेअर विकायचा आहे, तो जास्त भाव सांगणार व ज्याला शेअर खरेदी करायचा आहे तो कमी भाव सांगणार. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे ट्रेडिंग स्क्रीनवर आपल्याला शेअर्स दिसतात, परंतु त्याची कोण खरेदी करतं आहे, हे मात्र दिसत नाही.

३. ट्रेडिंग व्हॉल्यूम : आजच्या दिवसात एखाद्या शेअरमध्ये किती शेअर्स ट्रेड (खरेदी–विक्री) झाले, त्याचा आकडा म्हणजे म्हणजे ‘ट्रेडिंग व्हॉल्यूम’.

४. जास्त भाव / मूल्य (High Rate) : एखाद्या शेअरच्या त्या दिवसातील खरेदी–विक्रीचा सर्वोच्च भाव/ मूल्य.

५. कमी भाव / मूल्य (Low Rate) : एखाद्या शेअरचा त्या दिवसातील खरेदी–विक्रीचा सर्वांत कमी भाव/ मूल्य.

६. ५२ सप्ताही सर्वोच्च भाव / मूल्य ( 52 Week High ) : एखाद्या शेअरचा मागील ५२ सप्ताहांतील सर्वोच्च भाव / मूल्य.

७. ५२ सप्ताही नीचतम भाव / मूल्य ( 52 Week Low ) : एखाद्या शेअरचा मागील ५२ सप्ताहांतील सर्वांत कमी भाव / मूल्य.

८. लास्ट ट्रेडेड प्राइस (Last Traded Price) : एखाद्या शेअरचा शेवटचा सौदा (Trade) किती किंमतीत झाला, तो भाव / मूल्य. हा भाव मार्केट चालू असताना अर्थातच सतत बदलत असतो.

९. ओपन (Open) : शेअर मार्केट चालू झाल्यावर ज्या किंमतीत सगळ्यात पहिला सौदा होतो, तो भाव / मूल्य.

१०. क्लोज (Close) : शेअर मार्केट बंद झाल्यावर दुपारी ३.४० वाजता, दुपारी ३.०० ते ३.३० या वेळेतील शेअरच्या भावातील झालेल्या चढ-उताराचे गणिती पद्धत वापरून जो भाव काढण्यात येतो, तो म्हणजे ‘क्लोज’. त्यामुळे हा भाव दुपारी ३.३० वाजता जी ‘लास्ट ट्रेडेड प्राइस’ असते, त्यापेक्षा थोडा वेगळा असू शकतो.

११. फेस व्हॅल्यू (Face Value) : एखादी कंपनी जेव्हा आपले शेअर्स शेअर मार्केटमध्ये विक्रीला काढते, तेव्हा ती त्याची एक मूळ किंमत ठरवते. तिला त्या शेअरची ‘फेस व्हॅल्यू’ म्हणतात. भारतात बहुतांश शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपये इतकी असते. ही किंमत Accounts साठी आणि जेव्हा भागधारकांना (Shareholders) ‘डिव्हिडंड’ देण्याची वेळ येते, तेव्हा उपयोगात येते. उदाहरणार्थ, जर कंपनीचा शेअर बाजारातील एका शेअरचा भाव १०० रुपये असेल आणि ‘फेस व्हॅल्यू’ १० रुपये असेल आणि त्या कंपनीने १०% इतका डिव्हिडंड घोषित केला, तर तो डिव्हिडंड त्या फेस व्हॅल्यूनुसार मोजला जाईल. म्हणजेच प्रत्येक एका शेअरवर मिळणारा डिव्हिडंड ‘१ रुपया’ इतका असेल. याच हिशोबाने समजा त्या कंपनीचे असे एकूण १०० शेअर्स आपल्याकडे असल्यास आपल्याला ‘१०० रुपये’ डिव्हिडंड म्हणून मिळतील.

१२. बक्षीस समभाग (Bonus shares) : ‘बक्षीस समभाग’ देण्यापूर्वी कंपनी एक विशिष्ट तारीख घोषित करते आणि त्या तारखेपर्यंतच्या काळात ज्यांचाकडे त्यांचे शेअर्स असतील ते भागधारक (Shareholders) त्या कंपनीच्या बक्षीस समभागासाठी पात्र ठरतात. म्हणजे, कंपनीने २:१ ह्या प्रमाणात बक्षीस समभाग जाहीर केला, तर याचा अर्थ असा की, प्रत्येकी १ शेअरमागे २ बोनस शेअर्स मिळतील. या ‘२:१’ अशा गुणोत्तरातला पहिला आकडा नेहमी बक्षीस समभागाचा असतो आणि गुणोत्तराप्रमाणे शेअरचा मार्केटमधील भावही बदलतो. त्यामुळे सहसा केवळ बक्षीस समभाग (Bonus shares) मिळतो आहे, म्हणून कधीही शेअर खरेदी करू नये. बक्षीस समभाग (Bonus shares) ही केवळ ‘अकाउंटिंग एन्ट्री’ असते. एखाद्या कंपनीचे शेअर्स ती कंपनी पुढील काळात किती नफा कमावेल, याच्या अंदाजावरूनच घ्यायचे असतात. बक्षीस समभागासाठी नाही.

१३. लिमिट प्राइस ऑर्डर (Limit Price Order) : जेव्हा आपल्याला एखाद्या ठरावीक किमतीलाच शेअरची खरेदी किंवा विक्री करायची असते, तेव्हा ही ऑर्डर दिली जाते.

१४. मार्केट प्राइस ऑर्डर (Market Price Order) : जेव्हा आपल्याला मार्केटमधील त्या त्या वेळच्या चालू भावानुसार शेअरची खरेदी किंवा विक्री करायची असते, तेव्हा ही ऑर्डर दिली जाते.

१५. स्टॉप लॉस ऑर्डर (Stop Loss Order) : जेव्हा आपल्याला त्या शेअरमधील तोटा ठरावीक मर्यादेपर्यंतच मर्यादित ठेवायचा असेल, तेव्हा ही ऑर्डर दिली जाते. ही ऑर्डर बहुतेक करून ‘इंट्रा-डे ट्रेडिंग’मध्ये वापरतात.

या अशा काही प्रमुख संकल्पना शेअर मार्केटच्या उलाढालीत वापरण्यात येतात. अशा प्रकारे मागील आतापर्यंतच्या या चार भागांत शेअर मार्केटच्या दुनियेचा पाया समजून घेतला असं म्हणायला हरकत नाही. आता या पायावर नेमकं काय आणि कसं बांधकाम करायचं, हे आपण या लेखमालिकेच्या पुढील भागांतून समजून घेऊ.

- अमित पेंढारकर

(लेखक शेअर मार्केटचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)

No comment

Leave a Response