Primary tabs

सामूहिक मन:शक्ति

share on:

हम साथ साथ है..

दूरदर्शनच्या समोर बसून लहानपणी पाहिलेली ती फिल्म आठवते?

"एक तितली अनेक तितलीयाँ,

एक चिडीया अनेक चिडीयाँ.." पारधी आणि कबुतरांच्या अॅनिमेशनमधून व्यक्त केलेली संघ भावना. एक म्हातारे अनुभवी कबूतर सांगते आणि सारी पाखरे इवल्याश्या पंखांवर पारध्याचे जाळे घेऊन उडून जात दूरच्या उंदिरांच्या समूहाकडून क्षणात जाळे तोडून घेताना किती सहज एकतेचे महत्व समजावून गेली होती. समूहातील उच्च मनोबलाचे यथार्थ चित्रण करणारी छोटीशी गोष्ट..पण त्या म्हाता-या शहाण्या पक्ष्याचा सल्ला ऐकून ते सगळे एकत्र उडालेच नसते तर....

मनुष्य हा समाजाप्रिय प्राणी आहे.त्याला कळपात राहणे आवडते आणि त्या कळपात आपले अस्तित्व टिकवणे आणि सिद्ध करणेही क्रमप्राप्त गरजेचे ठरते. पण हा कळप अर्थात समूह तयार होणे,टिकणे आणि यशस्वी होणे हे समूहाच्या सामुहिक ध्येयावर अवलंबून असते.

काही समूह फक्त विशिष्ट ध्येयापुरते एकत्र येतात, ध्येय साध्य करतात आणि विलग होतात. पण काही समूह जगण्याचा अनिवार्य घटक असतात आणि त्यांची तत्कालिन ध्येय  जरी बदलली तरी ते सोबत चालत राहतात. आपले कुटुंब, आपला समाज आणि आपले राष्ट्र.

हे समूह संघटित असणे अनिवार्य आहे, कारण त्यांचे संघटित असणे हे समूह आणि व्यक्ती ह्या दोहोंच्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करत राहते. हे संघटन टिकण्यासाठी सामूहिक मनोबल ही मूलभूत गरज असते.

समूहाचे मनोबल हे समुहाच्या अंतर्गत संवादावर आणि समूहाचे सूर एकमेकाशी किती जुळले आहेत ह्यावर अवलंबून आहे.

Group morale is a product of the interaction of the organic and feeling tones of all group members.(Emory S Bogardus)

संस्कृत सुभाषितांमध्येही लिहिले गेले आहे.

"मृगाः मृगैः संगमुपवृजन्ति  गावश्च  गोभिस्तुरगस्तुरङ्गैः |

मूर्खश्च  मूर्खैः  सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु  सख्यं ||"

अर्थात हरीण स्वतःच हरणांच्या कळपात सम्मिलित होते,त्याच प्रकारे गाय अन्य गायींसोबत, घोडे अन्य घोड्यांसोबत एका कळपात राहतात. तसेच मूर्ख व्यक्ती अन्य मूर्खांसोबत तथा सज्जन आणि गुणी व्यक्ति अन्य सज्जनांसोबत एकत्र येतात. ह्याचा निष्कर्ष हाच की समान चरित्र, व्यवहार आणि ध्येय असेलल्या प्राणिमात्रांमध्ये स्वाभाविकपणे आपसांत मित्रता होते. स्वराज्याची शपथ घेण्यासाठी पारतंत्र्याची जाणीव असलेले सवंगडी एकत्र आले आणि शतकानुशतके पारतंत्र्यात असलेल्या  महाराष्ट्रा चे  स्वातंत्र्याचे स्वप्न सत्य ठरले.

कुठल्याही समूहाचे मनोबल हे समूहाची अव्यक्त सामुहिक भावना असतेच. पण जेव्हा जेव्हा एखादे सामुहिक कार्य करावे लागते त्यावेळेस एकत्र वाटचाल करताना ती भावना समूहात ख-या अर्थाने ढवळून जागृत होताना दिसते. समूहातील एखाद्यावर आलेले व्यक्तिगत संकट किंवा समूहावर आलेले संकट ह्या मनोबलास जागृत होण्यास उद्युक्त करते.

Morale is the underlying psychic tone of will assertion; it comes nearest to the surface in times of personal crisis and in the case of the group, in times of conflict and warfare.

(Ref-EmoryS.Bogardus Social Psychology)

समूहाचे मनोबल कायम राखणे वाढवणे हे जरी सगळ्या सदस्यांच्या सहभागाशिवाय शक्य नाही तरी हे समूह मनोबल टिकवून ठेवणे हे समूहप्रमुखाचे मुख्य ध्येय ठरते.

इसापनीतीमधली एक गोष्ट भित्र्या सश्याची. एक ससा पाठीवर पान पडते आणि घाबरुन धावत सुटतो. वाटेत भेटलेल्या हरीण, अस्वल, कोल्हा सर्वांना सांगत सुटतो,"पाठीवर आभाळ पडले.पळा,पळा" आणि सगळे ह्या मूर्खाला समूहप्रमुख समजून त्यामागे धावत सुटले. वाटेत खरा जंगलप्रमुख सिंह भेटला आणि त्याने सर्वांना भानावर आणले. संकटसमयी स्वतःच गांगरुन जाणारा समूहप्रमुख समुहाचे मनोधैर्य खच्ची करतो.

ह्या उलट उत्तम समूहप्रमुख संकटकाळी आपल्या बुद्धीचातुर्याचा वापर करुन त्या म्हाता-या कबु तराप्रमाणे बंधनातही पंखाचा वापर करण्यासाठी वातावरण निर्मिती करतो. पण ह्यासाठी समूह विस्कळीत असून चालत नाही... समूहातील प्रत्येक सदस्याचे केंन्द्रिकरण समूहप्रमुखाशी असणे हे समूहाचे मनोधैर्य आणि अंतिम यश दोन्हीसाठी उपयुक्त ठरते. नाहीतर अनेक भित्रे ससे समूहाला खच्ची करत राहतात.

समूहप्रमुखाचे यश हे त्याचे ज्ञान, त्याचे समूहातील प्रत्येक व्यक्तीशी असेलेले,जोडलेले नाते ह्यामुळे नक्की होते.

कधीकधी समस्येचे स्वरुप प्रत्येक सदस्याला सांगणे किंवा कळणे अवघड असते, परंतु समूहप्रमुखाकडे ह्या समस्येकडे पाहण्याचा त्रिमिती दृष्टीकोन असेल तर काळजीचे कारण नाही, फक्त अश्यावेळी समूहाबद्दल निष्ठा आणि समूहप्रमुखाबद्दल विश्वास असल्यास यशप्राप्तीसाठी उपयुक्त ठरते.

एखाद्या खेळाच्या स्पर्धेत कोचला टिमला समोरच्या टिमला हरवण्याचे उद्दीष्ट,  लागणारे डावपेच यहया संगल्याचे विश्लेषण करता येते. पण ह्या उलट लष्करीयुद्धामध्ये लढायला गेलेल्या प्रत्येक सैनिकाला उद्या काय होणार आहे, ह्याची पूर्ण जाणीव देणे शक्य नसते,पण इथे प्रत्येक सैनिक समूहाचे अंतिम लक्ष्य जाणतो, उच्चाधिका-याने दिलेली आज्ञा प्रमाण मानून लढायला उभा राहतो. एखाद्या पोलिस अधिका-यापुढे एखादा आप्त जरी गुन्हेगार म्हणून आला तरी त्याचा हात कचरत नाही कारण समूहाचे लक्ष्य ठरलेले असते"सद् रक्षणांय, खलं निग्रहाणंय"

जागतिक युद्ध, महामारी अश्या आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्र म्हणून एकत्र येऊन लढताना समोर शत्रू दाखवता येत नाही, रणनीती समजावता येत नाही. पण संकटकाळात समूह बांधणीसाठी खालील तंत्रे वापरली जातात.

१•संवाद साधणे-समूहातील कोणतीही व्यक्ती एकटी पडू नये, निराश होऊ नये म्हणून मनोधैर्य वाढवावे लागते

२•उत्साह कायम राखणे-एखाद्या मृत्युने, नुकसानीने, अपयशाने निराशा येऊ नये म्हणून उत्साह कायम राखणे. आपण नुकताच केलेला टाळ्या वाजवणे  थाळी महोत्सव ह्यातीलच एक भाग होता.

३•समूह सदस्यांचे समाधान करणे-आपत्कालीन परिस्थितीतही जमेल तितक्या गरजा पूर्ण करुन मनोबल कायम राखावे लागते.

४•क्षण साजरा करणे-भीतीचे सावट, आपत्ती ह्यांना सामोरे जाताशा आपण एक आहोत आणि आपले एक असणे आणि एकत्र लढा देणे पुढे येणा-या मोठ्या संकटातही आपले मनोधैर्ये बळकट करते.कदाचित आज देशाचे नेते आपल्याकडून आज तेच करुन घेत आहेत.

दीप प्रज्वलनाने करोना दूर होणार नाही, पण कितीही अंधार सभोवती साचला तरी आपण एक कुंटुंब म्हणून सारे भारतीय मनात प्रज्वल देशभक्तीचा प्रकाश घेऊन लढत राहू..

विश्वातील सगळ्यात मोठे लोकतंत्र असलेले राष्ट्र म्हणून आज सगळ्यात जास्त धोका आपल्याला निर्माण झाला आहे. तरीही गेल्या काही दिवसात ह्या राष्ट्राने राखलेले उच्च मनोबल हे मानसशास्त्राच्या अभ्यासात पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श ठरेल.

 

नूतन योगेश शेटे

बालमानस-समुपदेशक

No comment

Leave a Response