Primary tabs

घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरं !

share on:

कोरोनाच्या संकटामुळे आज जवळपास सारं जग ठप्प झालंय. अत्यावश्यक सेवा वगळता आपण सारेच ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये आहोत. थोडक्यात, ‘घरी बसलोय’! आपला वेळ जात नाहीये, म्हणून कुणी फेसबुकवर मिम्स करत बसलंय, तर कुणी मित्र-मैत्रिणींचे जुने फोटो शोधून त्यावर कमेंट टाकत बसलंय. तरीही, शेवटी या रिकामपणाचं करायचं काय हा प्रश्न उरतोच. तर मित्रांनो, ही रिकामी वेळच ‘योग्य वेळ’ आहे ‘शेअर मार्केट’ समजून घेण्याची, त्यात गुंतवणूक करून आपल्याच भविष्यासाठी काही तरतूद करण्याची.

आतापर्यंत आपल्या मित्रपरिवारात, नातेवाइकांत अनेक जण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असल्याचं पाहिलं असेल. बातम्यांमध्ये सेन्सेक्स, निफ्टीची उसळी किंवा घसरण वगैरे गोष्टी पाहिल्या असतील. पण ही सगळी नेमकी काय भानगड आहे आणि आपल्याला त्याचा फायदा कसा, हे आजही आपल्यापैकी अनेकांना समजत नाही. लोकहो, हे शेअर मार्केट म्हणजे काही अवघड ‘रॉकेट सायन्स’ नव्हे. हे समजायला अत्यंत साधं–सोपं आणि तरीही आपल्या अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असणारं विश्व आहे. म्हणूनच मग आपण सर्वांनी या ‘क्वारंटाइन’च्या काळात, या वेळेचा सदुपयोग करून ही शेअर मार्केटची उलाढाल, त्यातील आपल्याला असलेल्या संधी समजून घ्यायला हव्यात. याचसाठी ही विशेष लेखमालिका आजपासून आम्ही सुरू करत आहोत, ‘घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरं!’.. आणि ही शिकवणी घेणार आहेत शेअर मार्केटचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार - अमित पेंढारकर.

‘शेअर बाजार’ हा शब्द अनेकदा आपल्या कानावर पडला असेल. आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळीसुद्धा शेअर बाजारात पैसे गुंतवत असल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर असतील. अनेक वेळा ‘तुम्हीही गुंतवणूक करता का?’ अशी विचारणासुद्धा आपल्याला केली गेली असेल. परंतु मित्रांनो, जर आपल्याला याबद्दल पुरेशी माहिती नसताना आपण शेअर बाजारात पैसे गुंतवले, तर अनेकदा त्यात धोका पत्करावा लागू शकतो. दुसरीकडे, ज्यांना या विषयातील माहिती आहे, ते मात्र शेअर बाजारात आपली गुंतवणूक करतात व नफाही कमवितात. ज्यांना यातून काही नफा होत नाही, ते मात्र शेअर बाजाराला नावं ठेवतात. म्हणूनच आपण या लेखमालेतून शेअर मार्केटबद्दल (शेअर बाजाराबद्दल) थोडं अधिक खोलात जाऊन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

शेअर मार्केट म्हणजे काय ? : शेअर मार्केट म्हणजे सोप्या शब्दांत, कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री करण्याचं मार्केट. हे मार्केट संपूर्णपणे ऑनलाईन चालतं. यामध्ये तुम्हाला Buy Rate आणि Sell Rate दोन्ही दिसतात. आताच्या घडीला अतिशय पारदर्शक पद्धतीने शेअर मार्केटमध्ये व्यवहार होतात. शेअर मार्केट हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा मानला जातो. देशाची अर्थव्यवस्था उत्तम जीडीपी दर दाखवत असेल, तर शेअर मार्केट तेजीत असतं, असंही बऱ्याच वेळेला पाहण्यात आलं आहे.

आपण कंपनीचे शेअर्स खरेदी करतो म्हणजे काय? तर, काही अंशी आपण त्या कंपनीचे मालक असतो, ज्याला आपण Passive Owner असंही म्हणू शकतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की, मग यात आपला काय फायदा? तर फायदा हाच की जर कंपनीने प्रत्येक वर्षी नफा कमावला तर त्या कंपनीचा शेअर मार्केटमधील शेअरचा भाव वाढतो व आपल्याला फायदा मिळतो. तसंच कंपनी मिळालेल्या फायद्यातून काही विशिष्ट रक्कमही आपल्या शेअर होल्डर्सना देते, ज्याला ‘डिव्हिडंड’ असं म्हटलं जातं. परंतुं एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे शेअर मार्केटमध्ये Dividend साठी गुंतवणूक करू नये, तर त्या कंपनीच्या शेअरचा भाव वाढेल यासाठी गुंतवणूक करावी. Dividend हा त्यावरील एक ‘बोनस’ असतो.

आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वा शेअर्सची खरेदी–विक्री करण्यासाठी आपण सर्वप्रथम सेबीची मान्यता प्राप्त असलेल्या दलाली पेढीमध्ये (Broking Firmमध्ये) ट्रेडिंग आणि डिमॅट खातं उघडायला हवं. जर त्या दलाली पेढीची शाखा आपल्या शहरात असेल, तर ती शाखा कोण चालवत आहे व त्यांना यातील किती अनुभव आहे, याचीही आधी चौकशी करून घ्यावी.

आता आपण पुढील गोष्टीकडे वळू, ते म्हणजे ‘एक्स्चेंज’ आणि ‘इंडेक्स’.

भारतामध्ये बरीच क्षेत्रीय Exchanges आहेत. परंतु राष्ट्रीय स्तरावरील दोन Exchanges बहुतांश सर्व लोकांना ठाऊक असतात, ती म्हणजे :

१) बी.एस.ई. – बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, आणि

२) एन.एस.ई. - नॅशनल स्टॉक एक्स्चेंज.

बीएसईच्या निर्देशांकाला / इंडेक्सला सेन्सेक्स (SENSEX) असं म्हणतात, तर एनएसईच्या निर्देशांकाला ‘निफ्टी’ (NIFTY) असं म्हणतात. सेन्सेक्समध्ये ३० प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचा अंतर्भाव असतो, तर निफ्टीमध्ये ५० कंपन्यांच्या शेअर्सचा अंतर्भाव असतो. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की हे सगळं नक्की काय असतं? या ३० आणि ५० कंपन्या कोणत्या? त्यांचा इंडेक्स किंवा निर्देशांक म्हणजे काय? ते कशा प्रकारे चालतात.. वगैरे वगैरे. या सर्व मुद्द्यांबद्दल आपण या लेखमालिकेच्या पुढील भागात जाणून घेऊ..

- अमित पेंढारकर

(लेखक गुंतवणूक सल्लागार व शेअर मार्केटचे अभ्यासक आहेत.)

No comment

Leave a Response