Primary tabs

म्हादू लवासाला खाईल काय...

share on:

कोरोना - चायना व्हायरसच्या संकटाने संबंध जग बिथरून गेलंय, रात्री झोपताना उद्याचा येणारा दिवस पुढे काय घेउन येईल या भयाने माणसे चिंतातूर आहेत, लॉकडाऊन हा काल परवापर्यंत माहिती नसलेला शब्द आज परवलीचा झालाय ...

पण खरा त्रास श्रमिकांना सुरू झालाय, छोट्या छोट्या गावातून मोठ्या शहरात येऊन पडेल ती कामे करणारा वर्ग यात खरा भरडून निघालाय. कंत्राटी कामगारवर्ग काम बंद असल्याने हाताशी येणारा पगार नसल्याने उपासमारीच्या सावटाखाली आहे  ... अंध, अपंग, बेघर यांच्या अन्नान दशेला तर शब्दच नाहीत... गावाकडून जगण्यासाठी शहराची वाट धरलेल्या कुटुंबाना शहरातील काम बंद असल्याने पुन्हा गावाची वाट धरावी लागलीय ...
लॉकडाऊनमुळे गावी जायला ही काही व्यवस्था नाही म्हणून सरळ चालत गावाची वाट या कुटुंबानी धरलीय, काल असाच एक फोटो ब्लेडवरून चालत असलेल्या कुटुंबाचा एका मित्राने पाठवला,   डोक्यावर असलेलं नसलेलं संसाराचं ओझे घेऊन निघालेल्या श्रमिकांचा रक्तबंबाळ झालेल्या पायाचा प्रतीकात्मक फोटो पाहिला अन डोकेच बधीर झाले ...
अन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रख्यात लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेतादेवी यांच्या म्हादू : एक मिथक  या कथेची आठवण झाली ... कथेचा नायक असणारा आदिवासी कोरकू समाजातील म्हादू जगण्याचं स्वप्न बाळगत शहरात येतो आणि उपासमारीचा शिकार कसा होतो, उपासमार होऊन तो मरतो, हे जीवघेणे वास्तव त्यांनी मांडलंय. अंगावर शहारे येतील, असंच त्यांनी लिहिलंय
शेवट करताना त्या लिहितात मग "म्हादू उठून उभा राहिला, त्याची उंची वाढत वाढत गेली. आपले दोन्ही पाय मुंबईवर रोवून तो उभा राहिला. प्रथम त्याने खाल्ली उषाकिरण बिल्डिंग, मग खाल्ले सीएसटी स्टेशन, मग खाल्ले ताजमहाल हॉटेल. मुंबईतल्या इमारती त्यांने खाऊन टाकल्या. आणि तो ओरडत राहिला, 'मला भूक लागलीय, मला खायला द्या, मला भूक लागलीय मला खायला द्या!"
प्रशासन म्हणत आहे घराबाहेर पडू नका - फिरू नका, पोलीस रस्त्यावर दिसले की काठीने बेधडक मारत सुटलेत, कोरोना रोग झाला तर बरं होईल निदान दवाखान्यात दोन वेळेला खायला तरी मिळेल, एका पालात राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेने माझ्या तोंडावर हे वाक्य फेकले आणि मी विचारमग्न झालो. लॉकडाऊन
नंतर समाजजीवन उद्ध्वस्त होत आहे... श्रीमंतानी आपल्या बंगल्यासोबतच मनाचीही दारे बंद केलीत, व्हिडीओच्या आधारे ते घरात राहण्याचं आवाहन करत आहेत, बाबांनो मरण्याची भीती असेल तर ते मास्क लाऊन या पण त्या पालातील रिकामी भांडी पाहा... आम्ही मध्यमवर्गीय तर  आपापल्या कोशात गेलोय, तेथूनच समाज माध्यमातूनच  आपण टिंगलटवाळी करतो आहोत, समाजातील एका मोठ्या वर्गास तर याचे देणेघेणे नसल्यासारखेच झुंडशाहीचं दर्शन घडवत आहेत, गांभीर्य नसल्याने गर्दी करत आहेत...
अंध, अपंग, बेघर या आपत्तीनंतर कुठे कुठे उपासमारीने मरून पडतील की काय अशी भीती मला  वाटतेय...
कोरोनाच्या संकटाने घाबरलेला इथला श्रमिक, लॉकडाऊनने रोजगार गेलेला इथला कामगार तरूण उपाशीपोटी चालत  गावाची वाट धरतोय ...

म्हादू या महाश्वेतादेवी यांच्या कथेतील नायकाप्रमाणे  उपासमारीने त्रस्त झालेला एखादा  म्हादू .... कोरोनानंतरच्या जगात लवासा - सहाराला आपल्या पावलानी गिळंकृत करेल काय..!

- सचिन पाटील

No comment

Leave a Response