Primary tabs

टप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग ३

share on:

लॉकडाऊन' आणि 'कलासाधना'

मित्रमैत्रिणींनो आत्ताचे हे  दिवस सगळ्यांसाठीच फार अवघड आहेत. त्यातूनही आपल्या युवकांसाठी जास्तच. केवळ झोपायला घरी येणारे आपण सारे आता घरात अडकून पडलो आहोत. हा 'लॉकडाऊन' आपल्यासाठी त्रासदायक आहे हे मान्य पण या 'क्वारंटाईन' डेजमध्ये करायचं तरी काय? खाणं-पिणं, पिक्चर बघणं, वेबसीरिज बघणं हे सारं तर आपण करतच असतो. कधी झोपणार नाही एवढे आपण सध्या झोपतही असू. पण खरंच हे सगळं चाललंय ते छान आहे का हो?
कामाच्या इतर दिवसांमध्ये मला कामामुळे हे करता येत नाही, ते करता येत नाही अशा तक्रारी आपण करत असतो, पण मग आता वेळ मिळाला आहे तर आपण आपल्या इच्छा का पूर्ण करू नयेत? आपले छंद का जोपासू नयेत? विचार करा.
प्रत्येकामध्ये काही ना काही कलागुण दडलेले असतात, त्यांना फक्त 'एक्सप्लोअर' करण्याची आवश्यकता असते. स्वसंवाद साधलात तर तुमच्याच लक्षात येईल की आपण काय काय करू शकतो. कोणाची चित्रकला चांगली असते, कोणाचा आवाज चांगला असतो, कोणी स्वयंपाक उत्तम बनवत असतं, कोणाकडे लेखनाचं कौशल्य असतं तर कोणी उत्तम नर्तक असतं.
आपली कला, आपले छंद जोपासण्याकडे जर आपण लक्ष दिलं ना तर हे २१ दिवस कसे निघून जातील तुम्हाला कळणारदेखील नाही. तर, आपल्या रोजच्या दिवसाचं एक 'रुटीन' ठरवा. यात घरच्या कामांमध्ये आईला मदत करायला देखील विसरू नका हं! माझा आजचाच अनुभव सांगते, आज मी संपूर्ण घराची साफसफाई करण्याची जबाबदारी घेतली होती. घराचा कानाकोपरा अगदी झाडून, पुसून स्वच्छ केला. ४ दिवसात आलेली मरगळ चुटकीसरशी निघून गेली आणि खूप प्रसन्न वाटायला लागलं.
आपोआपच इच्छा झाली की आपण नृत्य करावं. मी 'कथक' हे शास्त्रीय नृत्य शिकत असल्यामुळे माझं मन शास्त्रीय नृत्याकडे पटकन वळतं. पण मित्रमैत्रिणींनो 'नाच' हे मानवाचं आनंद व्यक्त करण्याचं एक उत्तम साधन आहे. पाहा ना सगळे शास्त्रीय नृत्यप्रकार निर्माण होण्यापूर्वी आदिवासी लोक आनंद झाला की नाच करत. त्यात उड्या मारणे आणि हातापायाच्या विशिष्ट हालचाली ते करत. त्यांना हे कोणी शिकवलं होतं का? नाही. आनंद झाल्यावर उत्स्फूर्तपणे त्यांच्याकडून ते केलं जायचं.
आता 'गणपती डान्स'! कोणी शिकवलेला असतो का हो आपल्याला? पण तो ढोल-ताशाचा नाद सुरू झाला की आपोआपच आपले पाय ठेका धरतात. बेधुंद होऊन आपण नाचत असतो. तसंच लग्नाच्या वरातीतही.
तुम्ही म्हणाल इथे 'करोना' आणि 'क्वारंटाईन'मुळे आम्ही भंजाळलो आहोत आणि ही काय नृत्य आणि नाच सांगते आहे. असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे, पण प्रचंड कंटाळा आल्यावर एखादं गाणं लावा आणि नाचायला सुरुवात करा, पुढच्या ५ मिनिटात तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल, अनुभवून बघा.
'नाच' आणि 'नृत्य' ऊर्जावर्धक, तणाव नाहीसा करणारे आहेत. नाचाला नियमबद्ध केलं गेलं की ते 'नृत्य' होतं. त्यामुळे त्यात गल्लत करू नका. तुम्हाला एक किस्सा सांगते. माझे आई-बाबा २ वर्षांपूर्वी युरोपला गेले होते. तिकडून येताना त्यांनी तिकडची खासियत असणारं जे 'पोल्का' म्युझिक आहे, त्याची सीडी आणली होती. त्यात शब्द नसतातच, असतं फक्त उडतं संगीत. माऊथ ऑर्गन, गिटार, ट्रंपेट असं एकत्र. एक दिवस आम्ही ते लावलं आणि अगदी मनमुरादपणे नाचलो ते नृत्य नव्हतं, पण तरी पुढचा अख्खा आठवडा आम्ही फ्रेश होतो.
संगीत आणि नृत्य हे मनावरचा ताण कमी करतात. त्याच जोडीने त्याच्या लहरी या आजूबाजूचं वातावरणही प्रसन्न करतात. कोणताही 'नाद' हा वातावरण शुद्ध आणि प्रसन्न करायला मदत करतो. म्हणून तर परवा कर्फ्यूच्या दिवशी टाळ्यांच्या कडकडाटाच्या जोडीनेच बरेच ठिकाणी थाळीनाद, शंखनाद, घंटानाद एवढंच नव्हेे तर घुंगरुनादही झाला.
नाचामुळे, नृत्यामुळे शारीरिक ऊर्जा वाढणं, लवचिकता निर्माण होणं, प्रतिकारशक्ती वाढणं, मनःशक्ती वाढणं आणि मुख्य म्हणजे स्वतःला आनंदी आणि प्रसन्न वाटणं या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे या २१ दिवसात नाच करणं हे देखील आपल्याला शक्य आहे, भले तो 'गणपती डान्स' का असेना!
तुम्ही या 'लॉकडाऊन'चा जेवढा बाऊ कराल ना तेवढा तो तुम्हाला पार करणं जड जाईल. हा 'लॉकडाऊन' आपल्या सगळ्यांच्या स्वास्थ्यासाठी गरजेचा आहे. याचे खूप सारे फायदे आहेत. आपल्याला नव्या गोष्टी शिकता येतील, आपण घरच्यांसोबत जास्त वेळ घालवू, त्यामुळे त्यांचं महत्त्व आपल्याला कळेल. कमी 'फॅसिलिटीज'मध्येही आनंद मिळवता येतो हे कळेल. 'गृहिणी' आईचं महत्त्व कळेल. कदाचित हा काळ गेल्यावर आपल्यात बदल घडलेला असेल. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आपल्याला कळलेलं असेल . मुख्य म्हणजे 'स्वच्छतेचं महत्त्व' आपल्याला कळेल.
मित्रांनो, ग्लास अर्धा भरलेेला आहे हे बघा आणि 'करोना'वर चिडचिड आणि जोक्स करत बसण्यापेक्षा आपला देश यातून लवकरात लवकर कसा बाहेर पडेल हे पाहा. आपण नियम पाळले तर इतर पाळतील. सुरुवात ही कायम स्वतःपासून होत असते हे लक्षात ठेवा. घराबाहेर पडू नका,  स्वतःची काळजी घ्या आणि आपला वेळ 'कलासाधनेेत' घालवा.

शर्वरी पर्वते, पुणे

No comment

Leave a Response