Primary tabs

टप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २

share on:

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊनची घोषणा केली आणि सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली.

 बापरे! काय करायचे इतके दिवस घरात बसून? एक मोठाच यक्षप्रश्न उभा राहिला सगळ्यांसमोर.

फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर अनेकांनी अनेक उपाय सुचवले. ते वाचत असताना, मला जपान देशाचे उदाहरण डोळ्यासमोर आले.

हा देश अनेक वेळा भयंकर संकटात सापडला. त्या संकटापासून पळून जाण्याऐवजी उलट त्याच्याकडे त्यांनी  सुधारणेची एक संधी म्हणूनच पाहिले. हिरोशिमा, नागासाकी अणुस्फोट असो की काही वर्षांपूर्वीची औद्योगिक महामंदी. या प्रत्येक अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रलयातून जपान अधिकच प्रगत होत गेला.

जपानच्या उदाहरणातून माझ्या मनात आले की, या एकविस दिवसांची सुट्टीही संकट न मानता, संधीच मानायला हवी. यानिमित्ताने युवकांच्या मनात  व्यायाम, योगाभ्यासाची आवड  निर्माण झाली तर या संधीचे त्यांना सोने करता येईल.

सध्याच्या अतिवेगवान झालेल्या विज्ञान-संगणकीय युगामध्ये, कॉलेजवयीन विद्यार्थ्यांपासून ते पस्तीस-चाळीशीपर्यंतचा युवावर्ग प्रचंड गडबडीत, धावपळीत आणि ताणात असलेला आपण पाहत आहोत.

स्पर्धापरीक्षा, नोकरी-व्यवसायाची निवड, त्यातल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकणे, पुढे जाणे, स्थिर होणे... कधीही न संपणारी ही शर्यत युवकांना दमवते. ऐन उमेदीच्या वयातच थकवते.

अशा वेळी, उत्तम आरोग्य, संतुलित मन राखण्यासाठी योगाभ्यासाची फार मोठी मदत मिळते. या युवावर्गाला, योगाभ्यासाची गरज लक्षात येते, महत्त्व कळते. पण सगळ्यात मोठी समस्या असते ती वेळेची, आणि सवयीची.

ही योगसाधना करायची कधी, कशी आणि केव्हा... हे तीन मोठ्ठे प्रश्न आ वासून उभे असतात.

या एकवीस दिवसांच्या सक्तीच्या सुट्टीत या तिन्ही प्रश्नांचे एकत्रित उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करू या.

सध्या अनेक विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तो आपल्याला व्हायला नको असेल तर आपली इम्युनिटी - प्रतिकारशक्ती उत्तम राखणे, मन शांत, संतुलित ठेवणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

नियमित, सातत्यपूर्ण योगाभ्यासाने ही प्रतिकारशक्ती चांगली राहते, वाढते असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

योगाभ्यासाचे स्वरूप हे प्रत्येक व्यक्तीचे वय, प्रकॄती, स्वभाव अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पण अठरा ते चाळीस वर्षे असा युवावर्ग डोळ्यांसमोर ठेवून, त्यांना दररोज साधारण तीस ते चाळीस  मिनिटे करता येईल असा योगाभ्यास या लेखात देत आहे.

योगाभ्यास सुरू करताना, हे लक्षात घ्यायला हवे, की पहिल्याच दिवशी एकदम बारा नमस्कार, सगळी आसने सुरू करणे अपेक्षित नाही.

पहिल्या दिवशी चारच सूर्यनमस्कार घालावेत. तेही अगदी सावकाश, हळूहळू, प्रत्येक स्थितीची आदर्श अवस्था घेण्याचा प्रयत्न करत. मग सूर्यनमस्कारांची संख्या प्रत्येक आठवड्यागणिक वाढवत न्यावी. पहिल्या आठवड्यात चार, दुसऱ्या आठवड्यात आठ, तिसऱ्या  आठवड्यात बारा. अशा प्रकारे एकविसाव्या दिवशी आपण बारा सूर्यनमस्कार घातले, तर पुढे दररोज नियमितपणे घातले जातील.

हीच पद्धत आसनांच्या अभ्यासाच्या बाबतीतही पाळायला हवी. जी आसने खाली दिली आहेत, त्यातील प्रत्येक आसनाची ताणरहित, सुलभ स्थिती पहिल्या आठवड्यात पंधरा सेकंद टिकवावी. दुसऱ्या आठवड्यात या सगळ्या आसनांच्या स्थितीत प्रत्येकी अर्धा मिनिट रहावे. तिसऱ्या आठवड्यात, एकविसाव्या दिवसांपर्यंत आसने एक मिनिटापर्यंत टिकवता यायला लागतील.

ध्यान करणे आपल्याला आवडते. पण ते करणे, जमणे अवघड वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे, डोळे मिटून,  काहीही न करता शांतपणे बसणे ही संकल्पनाच आपल्याला फारशी माहिती नसते. म्हणून ध्यान करतानाही, पहिल्या आठवड्यात फक्त दोनच मिनिटे, दुसऱ्या आठवड्यात तीन मिनिटे ध्यान केले तर तिसऱ्या आठवड्यात सहजतेने पाच मिनिटे ध्यानानंद घेता येऊ लागेल.

वर केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे, आपण सातत्य राखले, तर तिसऱ्या आठवड्यात, एकविसाव्या दिवसांपर्यंत, आपल्याला खाली दिलेला अभ्यास विनासायास करता येईल.

सूर्यनमस्कार -
बारा सूर्यनमस्कार
5 मिनिटे

योगासने -
भुजंगासन, धनुरासन, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासन, हलासन, सर्वांगासन, मत्स्यासन, शिर्षासन अशी मोजकीच पण प्रभावी आसने
15 मिनिटे

शवासन 2 मिनिटे

प्राणायाम -
भस्त्रिका, कपालभाती,  अनुलोम विलोम
8 मिनिटे

ओंकार, भ्रामरी (मन: शांती, एकाग्रता, स्मरणशक्ती) अकरा वेळा
5 मिनिटे

सर्वात शेवटी शांतता अनुभवत ध्यान
5 मिनिटे

एकूण - चाळीस मिनिटे

सध्या महाविद्यालये, कॉलेज, सरकारी कार्यालये यांना पूर्ण सुट्टी आहे. खाजगी, आयटी कंपन्याना 'वर्क फ्रॉम होम' सुविधा मिळाली आहे. त्यामुळे हा अभ्यास रोज होत राहील. दररोज केल्यामुळे त्याचे उत्तम फायदेही अनुभवता येतील.

एका शास्त्रोक्त अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की, कोणताही सराव, अभ्यास सातत्याने एकवीस दिवस केला तर त्याची शरीर आणि मनाला सहज सवय होते.

भारताने जगाला भेट दिलेली ही अनमोल योगपद्धती, आपण या सुट्टीच्या निमित्ताने आचरणात आणली तर आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंद, उत्साह, प्रसन्नतेने जगता येईल.

 मनोज पटवर्धन

No comment

Leave a Response