Primary tabs

कोरोनाचा धडा

share on:

 

पळवलेस तू पाणी तोंडचे
जीवनाचा खचला पाया
अवघ्या आमच्या प्रगतीला

या क्षणात तू घालवले वाया

मनुष्य श्रेष्ठ की नियती
प्रश्न न उरला आता
कोरोनाने दाखवले रे
कोणी न उरला त्राता

अतिरेक हा वाईट ठरतो
मानवा तू समजून घे
जागतिकीकरणा मागे
उगा धावणे सोडून दे

ओरबाडलीही अवघी पृथ्वी
परिणाम मग दिसतील ना
सारे काही मिळवूनही मग
एकटाच तू उरशील ना

भेद निर्मिले अनंत तू रे
आता उरला भेद न रे
माणूस हा ही उरतो का बघ
सारे काही व्यर्थ ठरे

उत्तुंग यशाच्या शिखराहून 
कडेलोट तो व्हावा जसा
जगण्यासाठी काय हवे रे
श्वास ही न मिळे पुरेसा

क्षणात होई गर्व नाहीसा
क्षणात डोळे येती भरुनी
विचार कुंठित काप जरासा
चेकमेट जणू आता हरुनी

दे स्वतःला वेळ आता तू
निमित्त क्वारंटाईनचे
गरजांना या करूनी कमी तू
जाण मर्म हे जगण्याचे

ठेव दूरावा शरीरात परी
मनात दूरी ठेवू नको
कोरोनाही जाईल परी
माणूसपण तू विसरू नको

संकटात घे ध्यास नवा तू
पाढे तेच गिरवू नको
जाईल ना कोरोना जेव्हा
धडा आजचा विसरू नको

- सुवर्णा सातपुते

No comment

Leave a Response