Primary tabs

प्रेरणादायी जीवनप्रवास

share on:

पुस्तक – योद्धा संन्यासी
लेखक – वसंत पोतदार
प्रकाशन – राजहंस

भारतवर्ष ही संतांची भूमी आहे. जगाला अद्वैत तत्त्वज्ञान अत्यंत सुलभ करून सांगणाऱ्या शंकराचार्यांपासून ते स्वच्छता, ग्रामविकास, एकात्मता शिकवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत ही परंपरा अव्याहतपणे चालत राहिली आहे. या संतपरंपरेने वेळोवेळी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शन केले आहे. याच परंपरेत आधुनिक युगातील एक ध्रुव तारा म्हणजे स्वामी विवेकानंद. भारतीय सनातन परंपरेची थोरवी सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या या संन्याशाचं चरित्र मोठं अलौकिक आहे. ते अलौकिकत्व जपत त्यांचा जीवन प्रवास तितक्याच ताकदीने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न, प्रसिद्ध वक्ते आणि सिद्धहस्त लेखक वसंत पोतदार यांनी आपल्या “योद्धा संन्यासी” या पुस्तकात केला आहे.
अगदी पहिल्या प्रकरणापासूनच वाचकाला, ‘आपण स्वामी विवेकानंदांच्या दिव्य जीवनाचे प्रत्यक्ष साक्षीदार होत आहोत’ अशी अनुभूती देणारं लेखन, पुस्तक हातातून खाली ठेवू देत नाही. एकूण सहा विभागात विवेकानंदांच्या जीवन चरित्राला उलगडून दाखवणाऱ्या या पुस्तकाची सुरुवात होते ती, विवेकानंदाचं बालपण आणि स्वामी विवेकानंद या हिऱ्याला पैलू पडणाऱ्या, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, त्यांना घडवणाऱ्या श्रीरामकृष्ण परमहंसांच्या त्यांच्या जीवनातल्या प्रवेशाने. पहिल्याने देवाच्या अस्तिवावर शंका घेणारा नोरेन अर्थात स्वामी विवेकानंद हे श्री रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात येऊन कसे आमूलाग्र बदलतात आणि ईश्वराचा साक्षात्कार करून घेऊन संन्यासी होऊन संपूर्ण जगाला त्याचा साक्षात्कार करून देण्यासाठी कसे सिद्ध होतात याचं अत्यंत सुरेख आणि वास्तवाला धरून लेखन लेखकाने केलेलं आहे.
आपल्या गुरूंच्या आज्ञेनं अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत सहभाग घ्यायला निघालेल्या स्वामी विवेकानंदांना, अमेरिकेत पोहोचण्यासाठी आलेल्या अनंत अडचणी वाचून व्याकूळ व्हायला होतं पण त्यावर त्यांनी केलेली मात आणि जगाच्या पटलावर भारत आणि भारतीय संस्कृती यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारा हा संन्यासी पाहून उर अभिमानाने भरून येतं. हा विभाग वाचल्यावर पुस्तकाचं नाव योद्धा संन्यासी का योजलं असावं याचा उलगडा होतो. पश्चिमी राष्ट्रांत मान्यता मिळवलेला हा संन्यासी पुन्हा आपल्या जन्मभूमीत, भारतात परततो आणि शून्यातून रामकृष्ण मिशन उभं करतो. त्याची रोचक कहाणी आणि त्या मिशनचा हेतू आपल्याला चौथा भाग उलगडून सांगतो.  
जवळजवळ संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेणाऱ्या आणि त्यावर प्रभाव पाडणाऱ्या महात्म्याचे अखेरचे दिवस कसे होते याचं वर्णन पाचवा विभाग करतो. महापुरूषांचं आयुष्य कधीच सरळ, सोप्प नसतं किंबहुना तुमच्या आमच्यापेक्षा जास्त संकटांनी, कष्टांनी, सुखदु:खाच्या पराकोटीच्या प्रसंगांनी भरलेलं असतं, पण ज्या व्यक्ती यावर मात करत आणि काही दिव्य करून जातात त्यांचीच नोंद, इतिहासत महापुरुष म्हणून होते याची जाणीव हा पाचवा विभाग करून देतो.
विवेकानंदांना देवत्व बहाल करत त्यांना सर्वसामान्यांपासून न तोडता त्यांच्या आणि आपल्या स्वभावातले काही समान दुवे, त्यांच्यातलं हळवेपण, माणूसपण हे पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत दाखवत राहतं. अथक आणि अचूक प्रयत्नांनी नराचा नारायण होऊ शकतो अशी सकारात्मक उर्जा हे पुस्तक आपल्याला देत. या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे याचं परिशिष्ट. यात पुन्हा संक्षिप्तपणे विवेकानंदांचे विशेष गुण अधोरेखित केले आहेत. ज्यामुळे विवेकानंदांचं व्यक्तिमत्व अधिक स्पष्ट व्हायला मदत होते.
आयुष्याला सकारात्मक उर्जा देणारं, आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी उपयुक्त असणारं आणि आपल्याला वाचनाची आवड असेल तर आणि नसेल तर ती निर्माण होण्यसाठी आवर्जून वाचायला हवं असं हे पुस्तक आहे.
-    रोहित वाळिंबे

No comment

Leave a Response