Primary tabs

रात्र आणि तू

share on:
    घड्याळ पहाटेचे चार वाजलेत असं सांगतंय मला. त्याचा प्रत्येक ठोका ऐकू येतोय या रात्रीच्या नीरव शांततेत. पेन, वही घेऊन, खिडकीत बसून लिहिण्याचं काम सुरू आहे.
 
    मी खूश आहे आज. हसतोय मघापासून. का ते कशाला शोधत बसू. हसण्याचा आनंद तर घेऊ देत पूर्ण. आज ही रात्रसुद्धा हसतेय बहुतेक मला हसताना पाहून. बघ ना... ही गार वाऱ्याची झुळुक चेहऱ्यावरून फिरताच तुझा स्पर्श आठवून जातो. या चांदण्या कपाळीच्या चंद्रकोरीच्या परिघातून लुकलुकणाऱ्या तुझ्या त्या डोळ्यांची आठवण करून देतात. ती पानांची अलवार होणारी सळसळ तर तुझ्या हसण्याची एक छबीच वाटते आता. रात्र सुरू झाली की सगळं शांत होत जातं, कुठेतरी मनालाही आराम मिळायला लागतो. अशा वेळी विचारांचा समतोल राखता येतो. तुझा आवाज या रात्रीसारखाच... ऐकू येताच मनाला शांत, हलकं करणारा. दिवसभराचा ताण क्षणात गायब करणारा...
    म्हणून तर रात्र मला आवडते. दिवस अख्खा त्या माणसांच्या गर्दीत कसाबसा श्वास घेत निघून जातो. पण रात्र उतरताच तुझं ही अस्तित्व आसपासच्या गोष्टींमधून जाणवायला लागतंच. या लोकांना वाटतं हा वेडा उगाच जागत राहतो रात्रभर...
    खरं तर या सगळ्यांशी तुझ्यासंगे केलेली शब्द जुळवणी म्हणजे एक फसलेला प्रयत्नच आहे... कारण तुला शब्दांमध्ये बांधणं केवळ अशक्य आहे गं...
प्रसाद चव्हाण

No comment

Leave a Response