Primary tabs

प्रशासनाला देऊन मदतीचा हात.. चला करू कोरोनावर मात

share on:

नमस्कार! सगळे, घरातच आहात ना? हो, असंच विचारावं लागणार.

याला कारण, सध्या देशात उद्भवलेली भयानक संकटकालीन परिस्थितीच काही असेच सांगते आहे. आपल्याच घरात राहणे हेच आपल्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक होऊन बसलं आहे. कोरोना विषाणू हे त्या भयंकर संकटाचे नाव आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या घरात क्वारंटाईन व्हावं लागले आहे. सर्व देशभरात लॉकडाऊन केले असल्याने सगळीकडे कलम १४४ लागू झाला आहे. त्यामुळे संचारबंदी, जमावबंदी केली गेली आहे. १५ एप्रिलपर्यंत हे असेच राहणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी म्हणूनच नागरिकांना घरातून बाहेर फिरता येणार आहे.
शासनाची अशी आहे सज्जता - यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री नेटाने या सर्वांचा सामना करण्यासाठी झटत आहे. अन्नधान्याचा पुरेसा साठा शासनाने केल्याचे ते सांगत आहेत. अन, नागरिकांना सहकार्य करण्यास सांगितले आहे. बरं, सहकार्य करायचे म्हणजे काय, तर जी व्यक्ती जिथे आहे तिथेच त्या व्यक्तीने राहणे होय. जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठीचीच फक्त जसे, दूध, किराणा सामान, औषधे, भाजीपाला यांसाठी बाहेर पडता येणार आहे. मात्र, असे असले तरीही कोणत्याच भागात गर्दी, जमाव म्हणजेच ५ पेक्षा अधिक व्यक्तींना जमता येणार नाही. तरी, नागरिक मात्र शासन पोटतिडकीने सांगूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांना अजूनही घराबाहेर पडावेसे वाटते आहे. त्यामुळे मग पोलीस यंत्रणेवरही सध्या खूप ताण येतो आहे. याच समस्येवर एक सामूहिक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून २१ दिवसांत हा कोरोना भारतातून कायमचा नष्ट करण्यास मदत होऊ शकणार आहे.
बघा, पटतंय का? – हा उपाय करण्यासाठी महाराष्ट्र शासन, सामान्य जनता, पोलीस, प्रशासन, भारत सरकार या सगळ्यांनीच एकमेकांशी पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे. हा अगदी शेवटचा उपाय आहे, असे नाहीच. यात अनेक सुधारणा, नव्या संकल्पनांचा उगम दडलेला असू शकतो. मात्र, ज्याप्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यानी त्यांच्या संवादातून आपल्याला आवाहन केले आहे. ते लक्षात घेता आपण त्यांना आपापल्या विचार कुवतीनुसार जे जे उपाय सुचवता येणे शक्य आहे ते करायला हवं. त्याकरिता म्हणून एक आराखडा मला यानिमित्ताने सुचवावासा वाटतोय.
असं, केलं तर – मुंबई-पुणे शहरांत सर्वात जास्त कोरोनाबाधित, क्वारंटाईन रूग्ण आहेत. तसेच, दुर्दैवाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही या शहरांत वाढतेय हे वास्तव आहे. राज्यांतील इतर जिल्ह्यातही रूग्ण वाढू लागले आहेत. सध्या जिल्हा सीमा बंद असल्या तरी इतर जिल्ह्यातील रूग्णांना आपण मुंबई व पुण्यात शिफ्ट करायला हवे. मुंबई पुण्यात जे लोक निरोगी आहेत त्यांची सगळ्यीं व्यवस्था राज्यात कुठेही करता यावी. मुंबई अन पुण्यात फक्त बाधित-क्वारंटाईन लोक राहायला पाहिजेत. म्हणजे मुंबई-पुण्यात अगदी अत्यावश्यक सेवांकरिताही कोणी सामान्यजन बाहेर पडणार नाही. राज्यांतील उर्वरित जिल्ह्यांत असणारे निरोगी लोकांकरिता त्या त्या शहरांत रोज काही काळ जीवनावश्यक गोष्टींना घेण्यासाठीच बाहेर पडण्याची मुभा त्यांना मिळावी. त्याचसोबत रोगाचा प्रसार या निरोगी लोकांना ठेवलेल्या शहरांत होणार नाही याची काळजी लोक-प्रशासन या दोन्हींना अगदी काटेकोरपणे घेतली जायला हवी. पाहिजे तर त्यासाठी राज्यात लष्करी बळाचीही मदत घेता यायला हवी. इतर जिल्ह्यांतून रूग्णांना मुंबई-पुण्यात आणण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरचा वापर करता येईल.
मुंबई-पुणेच का? -  इतर जिल्ह्यांत, शहरांत, गावांत कोरोनावरील उपचार मिळण्यास विलंब लागू शकतो. सर्व रूग्णांना तिथे मुंबई पुण्याइतक्याच जलद आरोग्य सुविधा जलद मिळतीलच असे नाही. याशिवाय छोट्या प्रदेशांत सुविधा पुरवण्यावर पोलीस, आरोग्य विभाग यांना येणारा अतिरिक्त ताण जाणवणार नाही. त्यामुळे मुंबई-पुण्यावर पूर्णतः लक्ष केंद्रित केले जाईल. मुंबई पुण्यात जे निरोगी लोक आहेत, त्यांना मास्क लावून सुरक्षितपणे इतरत्र हलवण्यात यावे. मुंबईतच जवळपास दोन कोटी लोक आहेत. त्यामुळे इतके सगळे लोक राज्यात विस्थापित करणे खूप अवघड आहे. पण, असे निर्धाराने केल्यास कोरोनाशी युद्ध जिंकण्याला चालना मिळणार आहे. युद्ध असे सहजच जिंकणे याशिवाय शक्य आहे का?
यामुळे काय? – आपणच आपल्या राज्याला वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा. फक्त घरात बसूनही आपल्याकडून देशसेवा ही घडणार आहेच पण, त्याहीपलीकडे जाऊन हे संकट पिटाळून लावण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तेही जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य नाही का? देशातूनचं एकवेळ राहू देऊ. मात्र, आपल्या महाराष्ट्रावर आलेल्या संकटाला पळवून लावायला आपण शासनाला सहकार्य करायला हवे. यासाठी आपण आपली योग्य काळजी घ्यायला हवी. साबणाने वारंवार हात स्वच्छ धुतले पाहिजे. शिंकताना, खोकताना नाकावर धरण्यासाठी रूमालाचा वापर केले गेला पाहिजे.
घरामध्येच स्वस्थ राहू, कोरोनाला दूर ठेवू -  याशिवाय एक आणि एकमेव उपाय म्हणजेच आपल्या घरात आपण सुरक्षित राहणे होय. घरच्याघरी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेणे. लाखो लोक शासानाने दिलेल्या या निर्देशाचे पालन करताना दिसून येत आहे. अशा वेळी ते पूर्णतः आपल्या कुटुंबाच्या निकट राहू लागले आहेत. जी जीवनशैली माणसाने अंगिकारली होती. त्यामुळे बराचसा वेळ घराबाहेर जात असे, घरात असले तरी मग सोशल मीडियावर अनेक जण पडीक बनत. त्यामुळे कुटुंबातील लोक एकमेकांना अगदी क्वचितच म्हणजे जेवणाच्या टेबलवर भेटू शकत होते. कुटुंबापुढे करता न येणाऱ्या सर्वच गोष्टी ते बाहेर राहून करत. ज्यांमुळे कदाचित इतरांना व त्यांना स्वतःलादेखील नुकसान घडत होते.
व्यायाम करण्यावरही अनेकांनी आता भर दिला आहे. महाभयंकर कोरोना संकट ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल अशा लोकांना जास्त हानी पोहोचवतो वा जीवघेणा ठरतो. असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने दिल्यावर अनेकांनी आपल्या रोजच्या जीवनशैलीत व्यायामाचा समावेश केला आहे. यामुळे साहजिकच त्यांची प्रतिकारशक्ती वाढीस लागली आहे. अन, कोरोनाची भीती कमी ठरते आहे.  अनेकांनी नवनवीन पुस्तके वाचण्यावर भर दिला. त्यांच्याकडील असलेलीच पुस्तकांचा त्यांनी अभ्यास सुरू केला आहे. तर, राज्यसेवा परीक्षांच्या अभ्यासाकरिता भावी अधिकाऱ्यांनीही या कोरोना बोनसचा उपयोग करून घ्यायचे ठरवले आहे.
माणुसकीला जागवू सामाजिक दायित्व दाखवू – कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी मनुष्यबळ, तसेच मुबलक अन्नधान्य, औषधे यांची गरज पडत असते. तेव्हा ते उपलब्ध करून देण्यासाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती कोल्हापूर-सांगलीला आल्या महापुरात धावून आले होते. तसेच, आताही या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याचसोबत, रूग्णांच्यासाठी रक्ताचीही कमतरता भासते. तेव्हा मोठ्या संख्येने रक्तदान केले गेले पाहिजे. याचसह अजून एक वेगळीच समस्या या क्वारंटाईन काळात उद्भवू पाहत आहे. ती म्हणजे लोकांचे मानसिक स्वास्थही बिघडण्याची शक्यता. सध्या २१ दिवस पूर्ण लॉकडाऊन आहे. आपल्याच शहरात, गावात आपल्याला फिरता येत नाहीये. अनेक जण अशा ठिकाणी असतात, जिथे ते पूर्णतः एकटेच असतात. त्यांना कुणीच नसते वा ते फार दूरतरी असतात. अशा वेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेणारं तरी कुणी हवे असते. याही गोष्टीचा यानिमित्ताने विचार व्हायला हवा.
प्रशासनाला देऊन साथ, कोरोनाला मारू या लाथ – यानिमित्ताने पुन्हा एकदा मला आवाहन करायला आवडेल. ज्याप्रमाणे अजूनही अनेक लोक घरातून बाहेर पडत आहेत. कोरोनाबाबत निष्काळजीपणा दाखवत आहे, ते त्यांनी टाळायाला हवे. केवळ शासनावर दबाव येतो म्हणून नाही. तर, घराबाहेर पडल्याने आपल्याला सर्दी होऊ शकते. जरी कोरोनासंबंधित शहरातले आपण नसू तरी सर्दी होणेही आरोग्याला चांगली बाब नाही. त्यामुळे जे डॉक्टर्स कोरोनावर उपचार करत आहेत त्यांच्यावर यामुळे अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कोरोनाचा नायनाट करण्यासाठी आणखीनच अडचणी येऊ शकतात.
- विशाल लोणारी

No comment

Leave a Response