Primary tabs

मिसळवणाचा डबा

share on:

सर्वांच्या घरात अगदी महत्वाची जागा असलेला असा हा मिसळवणाचा डबा! तुम्ही म्हणाल आता या डब्याची काय कथा असणार? पण त्याचीही मजेशीर कथा आहे आणि ती कथा सांगत आहेत अनुजा बर्वे!चला वाचूया!

“अर्रे , असा कसा विसरलो मी डबा?”
किंवा
“काल अगदी आठवणीनं ठेवला होता अन् आज कसा बुवा मिळत नाहिये तो डबा?”
किंवा मग
“अगं डबा कसला, अगदीच “डब्बा” झालाय”
ह्यापैकी कोणताही संवाद ज्या डब्याच्या बाबतीत कधी घडत नाही तो म्हणजे “मिसळवणाचा डबा”.
मिसळवणाचा डबा अन् स्वैपाकाचं नातं म्हणजे अगदी पहिला पाऊस अन् मातीचा सुगंध यांच्यासारखं ! अगदी ‘अतूट’!!
आपल्या सगळ्यानाच वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात, त्यांची आठवण काढायला आवडते अन् आठवणीनं त्यांची रेसिपी शेअर करायलाही आवडते.
परंतु रेसिपी करताना ‘साथ’ देणारा मिसळवणाचा डबा मात्र काहीसा दुर्लक्षित  राहतो.
आज या “मिसळवणाच्या डब्याविषयी थोडंसं-
कुणी कुणी ‘मिसळी’चा डबा असंही म्हणतात. पण छे !’मिसळ’ म्हणजे “कट”वालीच ! या ‘solid डब्याला’ मिसळ हे नाव शोभत नाही असं मला ‘साॅल्लीड’ वाटून गेलं, ऐकलं तेव्हा !
आत असलेले सात बिनझाकणाचे छोटे छोटे डबे (कुणी कुणी त्यांना ‘पाळी’ म्हणतात. ‘आळीपाळीने’ वापरले जातात म्हणून म्हणत असावेत बहुतेक) वर्षानुवर्ष अगदी  गुण्यागोविंदाने एका छताखाली राहतायत.
‘युती’चं इतकं टिकाऊ उदाहरण अन्य कुठे क्वचितच सापडेल.
कुणी कुणी याला ‘मसाल्याचा डबा’ म्हणतात असं जेव्हा ऐकलं तेव्हा-
“फक्त मसाल्याला क्रेडिट दिल्यामुळे ‘मोहरी’च्या “भावना दुखावल्याने ती तडतड तर करत नसेल? किंवा ‘मेथी दाण्यांचा’ कडवटपणा वाढत तर नसेल?
असा एक मजेशीर विचार मनात येऊन गेला.
नाव काहीही असलं तरी ‘मिसळवणाचा डबा’ म्हणजे, आताशा चॅनेलचॅनेलवर जो ‘सेक्युलर’ शब्द वारंवार ऐकू येतो त्या “सेक्युलॅरिझम”चं एक उत्कृष्ठ उदाहरण आहे असं मला वाटतं.
कसं ?
मोहरी- ‘उष्ण अन् तडतडणारी’ तर जिरे-  ‘थंड अन् शांततावादी’ 
तिखट- ‘लालभडक अन् जहाल’ तर मेथीदाणे- ‘फिकटफिकट नि कडवट’
मसाला- ‘चविष्ट अन् जळजळीत’ तर हिंग- ‘खुशबूदार अन् पाचक’
सातवी हळद- ‘नरम अन् औषधीही’ हे असे सगळे भिन्नधर्मीय (गुणधर्म म्हणतेय मी)
पक्ष एकोप्यानं राहतायत अन् तेही कुणाला ‘पाडायला’ किंवा ‘हरवायला’ नाही तर खवय्यांच्या राज्यात पदार्थांचं बॅलन्सिंग करून जनहृदय ‘जिंकायला’ !!
माझ्या एका ‘व्यवस्थित’ मैत्रिणीच्या “अतिव्यवस्थित” सासूबाईंच्या म्हणण्यानुसार  (आता सासूबाई म्हणजे काहीतरी ‘say’ किंवा ‘फतवा’ असणारच रिझर्व्ह बॅंकेसारखा) मिसळवणाचा डबा हा गृहिणीच्या ‘टापटीप’पणाचा “आरसा” आहे. एका अर्थी ते खरंही आहे म्हणा!!
‘टापटीप’पणाच्या प्रतिबिंबाबरोबरच ‘संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याच्या’ गृहिणींच्या कौशल्याचं प्रतिनिधित्व करतो हा ‘मिसळवणाचा डबा’ असंही मला म्हणावंसं वाटतं .
कुटुंबातील, ‘मोहरी’सारख्या तडतडणाऱ्या, ‘तिखट’ स्वभाव जोपासणा ऱ्या, कडवट स्वभाव घट्ट धरून ठेवणाऱ्या   अशा विविध सदस्यांना घराघरातील गृहिणी  ‘मिसळवणाच्या सेंटरच्या डब्यासारखं’ (जो आकारमानानं लहान असूनही सभोवतालच्या डब्यांना हलू देत नाही) एकत्र जोडून ठेवण्याचं काम करतच असतात.
प्रसंगावशात् लघुत्व स्वीकारूनही !!
तर-
असा हा “मिसळवणाचा डबा” !!
अतिशय ‘कार्यक्षम’ अन् तरीही गृहिणीच्या ‘गृहकर्मां’सारखा काहीसा “अदखलपात्रही”!!!

- अनुजा बर्वे

No comment

Leave a Response