Primary tabs

साहित्य अकादमी पारितोषिक विजेते चिंतामणराव कोल्हटकर यांचा आज जन्मदिन!

share on:

 

चिंतामण गणेश कोल्हटकर यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाल्यामुळे चिंतामणरावांच्या शिक्षणाची परवड झाली. त्यांनी १९११ साली महाराष्ट्र नाटक मंडळीत प्रवेश केला आणि पुढे मा. दीनानाथ मंगेशकरांच्या समवेत बलवंत नाटक मंडळीची स्थापना केली. १९३१ सालात चित्रपट बोलू लागला आणि नाटक मंडळे धंदा गमावून बसली. बलवंत नाटक मंडळीने कात टाकून बलवंत पिक्चर्सची स्थापना केली. सांगली येथे स्टुडिओ उभा करून ‘कृष्णार्जुन युद्ध’ हा बोलपट तयार केला. त्यांनी विश्राम बेडेकरांच्या मदतीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

भालजी पेंढारकरांनी १९३६ मध्ये ‘कान्होपात्रा’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्या प्रसंगी खलनायकाच्या भूमिकेसाठी चिंतामणरावांना बोलवून घेतले. प्रेक्षकांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्याच वर्षात बेडेकरांनी ‘अंधेरी दुनिया’ हा हिंदी चित्रपट काढला. त्यात चिंतामणरावांनी कैद्याची भूमिका रंगवली होती.

‘सूनबाई’ (१९४२) हा भालजींचा अत्यंत गाजलेला बोलपट. चिंतामणरावांचे काम आणि भालजींचा पहिला सामाजिक चित्रपट असल्यामुळे हा चित्रपट भरपूर चालला. ‘वसंतसेना’ ही आचार्य अत्रे यांची भव्य चित्रकृती. शूद्रकांच्या ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकावरती ती बेतली होती. त्यातील खलनायक - शकाराची भूमिका चिंतामणरावांनी विनोदी पद्धतीने केली. त्यांच्या तोंडी एक गाणे होते ‘वसंतसेना राणी माझी सौंदर्याची गोणी’. पडद्यावर हे गाणे व दृश्य दिसताच प्रेक्षकांतून हास्याचा व टाळ्यांचा कडकडाट होत असे.

भालजींनी ‘सूनबाई’चा उत्तरार्ध म्हणून ‘सासुरवास’ काढला. त्यातही चिंतामणरावांनी सासर्‍यांची भूमिका सजवली होती. ‘सासुरवास’ची भट्टी जमली नव्हती. पण अच्युत रानडे यांच्या ‘जागा भाड्याने देणे आहे’ या विनोदी चित्रपटातील त्यांची घरमालकाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस आली. ‘मानाचे पान’, ‘माझा राम’, ‘मोठी माणसं’, ‘वासुदेव बळवंत’, ‘मी दारू सोडली’, ‘स्वराज्याचा शिलेदार’ अशा चित्रपटातही चिंतामणराव यांनी कामे केली.

चिंतामणराव यांनी केलेल्या रंगभूमीच्या सेवेसाठी त्यांना राष्ट्रपतींकडून सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. चिंतामणराव यांनी लिहिलेल्या ‘बहुरूपी’ या आत्मचरित्रास साहित्य अकादमीने १९५८ साली पारितोषिक देऊन गौरवले.

द.भा. सामंत

(साभार-महाराष्ट्रानायक)

No comment

Leave a Response