Primary tabs

नियती

share on:

त्या दिवशी मी पण खडकावर बसलो होतो. समोर अथांग महासागर पसरलेला आपले अवाढव्य शरीर पसरवून, त्याच्या अक्राळविक्राळ लाटा मला घाबरवण्यासाठी सारख्या माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या.

संध्याकाळचं वातावरण कुंद झालेलं. नभात काळे ढग जमलेले, मातीचा सुगंध कुठूनसा रोमारोमात रोमांच उभे करत होता.

मी त्या उसळणाऱ्या लाटांवर तरंगून भुतकाळातील सुगंधीत आणि रम्य आठवणीत रमण्याचा प्रयत्न करत होतो.

आणि त्या सीशोरमध्ये मला कुठुनसा मोगऱ्याच्या गजऱ्याचा दरवळ लाभला. 

खरे तर थोडं आश्चर्य वाटले. मागून एक हलकासा हुंदका ऐकू आला. 

वाटलं माझा भूतकाळ रडत असेल माझ्यासवे. पण, पुन्हा तोच हुंदका हलक्या आवाजातला. आता माझी नजर त्या हुंदक्याचा वेध घेऊ लागली आणि जवळच एका खडकाआड एक आकृती मुसमुसताना आढळली.

एकटं बाईमाणूस पाहून जरासा थबकलो.. पण, मन स्वस्थ बसू देईना. अजून जरा जवळ गेलो आणि एक शहारा अंगावरून गेला, अनाहूतपणे तोंडातून शब्द बाहेर पडला आणि तिने म्हणजे कल्पनाने मागे वळून पाहिले. खरंच ती कल्पनाच होती.

डोळे पदराने पुसत तिने विचारले. "अरे तु इकडे कसा?'

मी उत्तरलो अगं तुझ्या सारखंच मन मोकळं करायला आलो सागराजवळ.

तू अशी एकटी? मी स्वप्ननगरीत रंगण्याआधीच तू जागं केलसं आणि पावलं तुझ्याकडे वळली.

काय झालं तुला? असं मुसमुसायला? मी मुद्द्यालाच हात घातला. खरं तर कल्पना माझी प्रेयसी आणि बाल मैत्रीण देखील. तिला समोर पाहिलं आणि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. आज ती पण एकाकी जीवन जगत होती आणि मीदेखील. 

अगदी शाळेत एकमेकांचा हात धरून जाणारे आम्ही. कॉलेजमध्येही तिचा हात सोडायला मी तयार नव्हतोच आणि मी सोडलाही नाही. पण, एक चूक केली. कधीच तिला माझं मनोमनच प्रेम कळलं नाही. 

पोस्ट एज्युकेशन पूर्ण झाल्यावर. ती मला सोडून गेली तिच्या बाबांच्या बदलीमुळे.

मी खरं तर तेव्हाच एकाकी झालो होतो. पण, मनात कुठे तरी वाटतं होतं ती परत येईल आयुष्यभरासाठी माझा हात पकडायला. पण, नियतीला ते मान्य नव्हतं. तब्बल ४ वर्षांनी ती आली एक वादळ घेऊन माझ्या जीवनाची नौका उदध्वस्त करायला. तिच्या लग्नाचं कार्ड घेऊन. मी पुरता हादरलो होतो. त्या परिस्थितीत माझंही १ वर्षानंतर लग्न झालं. मी संसाराचा गाडा बैलासारखा ओढत. आज एकाकी जीवन जगत होतो. 

खूप हिंमत करून आज इथे आलो होतो आणि माझं प्रेम मला इथे गवसलं. सगळा तो बालपणापासून ते कॉलेजपर्यंतचा प्रवास आठवत होतो आणि पुन्हा नियतीने खेळ खेळायला सुरुवात केली.

कल्पना एव्हाना बरीच नॉर्मल झाली होती. मला म्हणाली, 'कसा आहेस तू? मी तिचं सौंदर्य न्याहाळण्यात आणि जुन्या गोड आठवणीत गुंगून गेलो होतो. अचानक झालेल्या कोमल स्पर्शाने भानावर आलो. 

तिनेच मला विचारलं, तू कुणावर प्रेम केलसं का रे कधी? मी तर जवळजवळ उडालोच. अजूनही हिंमत होईना. पण, जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा मात्र सांगितले की हो. कल्पना जोशीवर प्रेम केलेलं. आता तिचा चेहेरा पाहण्यासारखा झालेला. रडवेला, खोलात गेलेला. आता तर ती ओक्साबोक्सी रडू लागली. म्हणाली, अरे आधी का नाही हिंमत करून सांगितलंस का हात मागायला आला नाहीस. खूप वाट पाहिली रे तुझी आणि शेवटी बाबांच्या इच्छेनुसार माझ्या मनाविरुद्ध देशपांडे न्यायधिशांशी लग्न करून मोकळी झाली.

न्यायाधीश कसला राक्षस तो. लचके तोडत कसं तरी तुझ्या आठवणीत दिवस काढले. आज आले होते खरं तर आत्मघात करायला पण, नियतीने इथेही घात केला आणि साक्षात तूच समोर ठाकलास. 

मला सांग ती कशी आहे. ती गेली मला सोडून २ वर्षांपूर्वी, बरं. तू काय करत होतास इथे. काही नाही मन रमवायला आलो होतो.

पण, याच खडकावर बसून तुला मारलेली मिठी आठवली आणि कावराबावरा झालो. तेवढयात तुझा हुंदका ऐकला आणि तुझ्यासमोर आलो.

आज तुला बघून खूप आनंद झालाय. सगळा कोंडमारा अचानक नाहीसा झाला असं वाटतं आहे.

मीच विषय काढला शेवटी. तू एकाकी मी देखील. आपण लग्न केलं तर?

थोडा वेळ भयाण शांतता पसरली. त्यात लाटांचा आवाज आता भेसूर वाटायला लागला. 

ती अचानक उठली चालु लागली. मी गडबडलो, मला समजेना काय झालं अचानक. पण, थोडं अंतर चालून गेल्यावर ती थबकली. आर्त नजरेनी माझ्याकडे बघत म्हणाली, नाही हे शक्य नाही आता. आता फक्त एखादंच वर्ष उरलं आहे माझ्या हातात. अरे, इतके वर्ष घाव सोसत काढले आणि नवरा मेल्यावर मला कॅन्सर झाला समजलं. खरं सांगायचं तर तुझी आठवण काढतं दिवस कंठले आणि आज शेवटच्या टप्प्यावर भेटलास.

हे बोलताना तिला धाप लागली होती. तिने माझा हात घट्ट पकडला होता.

मी ही हबकलो होतो, थरकापलो होतो, खूप घाबरलो होतो, अचानक थंड स्पर्शाने भानावर आलो पण, तोपर्यत खूप उशीर झाला होता. 

ती मला सोडून माझ्या मांडीवर डोकं ठेवून कायमची मला सोडून गेली होती. 

नियतीने तेव्हा मौका दिला होता, तो मी वाया घालवला होता. आज मी तो कामी आणला होता पण, आज तिने तो वाया घालवला होता.

नियती इतकी क्रुरतेनी माझ्याशी वागेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.

राजीव सहस्रबुद्धे 

No comment

Leave a Response