Primary tabs

माझी परदेशवारी भाग ७

share on:

 

सध्या इथे युरोपियन समर नावाखाली हवामानाचा जो उच्छाद चालू आहे ना, त्यामुळे ती प्रतिभा की काय म्हणतात ती पार कोमेजली की हो. उष्ण कटिबंधात राहण्याऱ्या आमच्यासारख्या लोकांनी गारवा अनुभवायला दूर देशी यावं आणि इथेही त्याच तप्त सूर्य नारायणाने डोळे वटारावे हे काय बरोबर नाय बघा. तर मुद्दा एवढाच आहे राव की मागल्या शनिवारी फिरायला गेलो त्या Leiden नामक सुंदर गावाबद्दल लिहिणं राहूनच गेलं बघा.
तसा या गावाशी माझा ऐकून बराच परिचय झालेला आहे. अभयच्या कंपनीचं नेदेरलँड्स ऑफिस ह्याच शहरात होतं. आधी त्यामुळे गेली काही वर्षे तो तीन तीन महिने इथे मुक्काम ठोकून असायचा. गडी नेहमी खुश असायचा तिथे राहायला.
मला आपला भाबडा प्रश्न पडायचा तेव्हा बायको आणि मुलीला सोडून तीन महिने ( इथे कुठल्याही कारणासाठी जास्तीत जास्त तीन महिन्यांचाच व्हिसा देतात) राहायला हा एवढ्या आनंदाने कसा (आणि का) बरं तयार होतो.
पण मी जेव्हा तिथे गेले तेव्हा तिथल्या इतकी प्रेमात पडले की त्याला सपशेल कबुलीच दिली "आता मला कळतंय तुला इथे यायचे वेध का लागायचे ते.." आणि त्याची काय कळी खुललीय विचारता!
शनिवारी ह्या सुंदर शहरात आठवडे बाजार भरतो, तो पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. जाताना निसर्ग सौंदर्य बघायला मिळावे म्हणून अभयच्या लाडक्या ४५ नंबरच्या बसने पाऊण तास प्रवास केला. वेळ सार्थकी लागला बघा. रस्त्याच्या दुतर्फा घरांच्या रचनेचे इतके विविध नमुने बघायला मिळाले की हे बघू का ते बघू , का ते पुढचं यापेक्षा जास्त सुंदर आहे असं खुळावल्यागत झालं होतं बघा…

अखेर मुक्कामी पोहोचलो आणि थेट बाजाराची वाट चालू लागलो. इथल्या बाजारात येण्याचा प्रमुख उद्देश होता तो म्हणजे सुक्यामेव्याची खरेदी. इथे भाज्या , फळं, फुलं, मासे, कपडे, पर्सेस इत्यादी इत्यादीच्या जोडीने सुक्यामेव्याचे ठेले असतात. अनुश्री पूर्वी एकदा तिथे जाऊन आली असली तरी ह्या बारी सूत्र अनुभवी वाटाड्याकडे होती. त्यामुळे आम्ही दोघी गुमान चाललो होतो त्याच्या मागून.
एका ठिकाणी वाटाड्या म्हणाला ह्या गल्लीत असतात बरं का चणे शेंगदाण्याच्या गाड्या आणि आम्ही दोघी फुटलो. त्याचा हेतू सफल, तर वाट काढत काढत निघालो. बऱ्यापैकी गर्दी होती (इथे खरंच गर्दी होती) रस्ते तसे अरुंद. हे शहर कालव्याच्या आजूबाजूने वसलं आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूला मार्केट भरलेलं. भाज्या, फळ, फुलं सगळं मुबलक आणि स्वस्त. आपल्याकडे आठवडे बाजारात असतं तसंच. एरवी सुपर मार्केटमध्ये सहा टोमॅटोच्या पॅकसाठी दीड दोन युरो तरी मोजावे लागतात. इथे ९९ सेन्ट्सला एक किलो होते, पण आम्हाला फिरायचं असल्याने आणि चणे शेंगदाणे घ्यायचे असल्याने मनाला आवर घातला.

फोटो काढायची या बारी जरा पंचाईतच झाली. हे ठेले एका बाजूला , मध्ये गिर्हाईकांची गर्दी आणि पलीकडे उपहार गृहाच्या दारात टेबलं टाकून खाण्या पिण्याचा आस्वाद घेणारी मंडळी निवांत बसलेली. कोणालाही धक्का न देता जमेल तेवढे फोटो काढायचे म्हणजे काय खायचं काम नव्हे राव. पण तरी मी ते केलंच! मग सोडते की काय
तर अशा तऱ्हेने एकदाचे सुक्या मेव्याच्या ठेल्यापाशी आलो. अहाहा काजू , बदाम , अक्रोड , मिक्स नट्स, ड्राय फ्रुटस यांच्या विविध तऱ्हा ! खारवलेले , बिन मिठाचे , मिक्स नट्स अशा विविध तऱ्हा होत्या. हेल्थ कॉन्शस लेकीने अक्रोड आणि बदामाची खरेदी केली . तिथेही पाव किलो मागितल्यावर अर्धा किलो घेतलं तर तुम्हाला स्वस्त पडेल अशी मखलाशी विक्रेत्याने केलीच आणि आम्ही बळी पडलोच त्याला. विक्रेत्यांचं कसब सगळीकडे सारखंच , इथे काय तिथे काय त्यानंतर रमत गमत चालू लागलो. जागो जागी कालव्यावर पूल बांधलेले. त्याला टेकून तुम्ही बोटीतून प्रवास करणारे प्रवासी न्याहाळत उभे राहू शकता . तिथे बोटीच्या धक्क्याच्या बाजूने पण हॉटेल्स आणि तिथे मज्जा करणारी लोकं होती. अशाच एका पुलावरून आम्ही जात असताना एक दहा बारा जणांचा ग्रुप ( वयोगट 20 ते35) एका पाठी एक अशी आगगाडी करत( एकमेकांचे shirt किंवा टॉप पाठी पकडलेले, बालवाडीत करायचो ना तसं) धावत पुलाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत गेला. त्यांचा त्या आनंदाची लागण आमच्या सारख्या बघ्याना पण झाली सगळीकडे चंगळ होती नुसती! खाओ पीओ ऐश करो असा मूड होता सगळीकडे कन्येने stroop wafle खाण्याचा आग्रह धरला , इथे ठेल्यावर तो मस्त गरम करून देतात . दोन waffle
Sheets च्या मध्ये कॅरॅमल filling. आपल्या पुरणपोळी सारखंच वाटलं मला गरम गरम खाताना. आकार असा की तिघात एक घेतला

मग पुनश्च भ्रमंती ,फोटो काढणे सुरू झाले. पोट पूजेसाठी मॅकडोनाल्ड चा आश्रय घेतला .तसे इथे रस्त्यावर मासे विक्रेत्यांकडे ताजा तळलेला फिश खाण्याची सोय असते. काही जण तर कच्चा हेरिंग फिश ,वर कांदा टाकून खाताना बघितलं आम्ही. तो फोटो नाही काढता आला कारण रेटारेट गर्दी, पण दुकानाचा मात्र काढला. ह्या सगळ्या खाण्यात मी निरुपयोगी ,अभय सावध, त्यामुळे अनुश्री ला उभं राहून फ्राईड फिश खायचा विचार सोडून द्यावा लागला
भोजनोत्तर अनुच्या खरेदी साठी H and M नामक दुकानात शिरलो. भरपूर पायपीट करून दोन कपडे खरेदी केले आणि थकलेले जीव बाहेर पडले. आता परतीचा प्रवास 43 नंबर च्या बसने करवायचा होता साहेबांना! मग काय निघालो तंगड्या तोडत . त्या इथे भरपूर तुटल्या माझ्या. मग वाटेत पुन्हा एका कालव्याच्या काठी विसावले मी . तशी बसण्याची व्यवस्था इथे मध्ये मध्ये केलेली असते त्यामुळे माझ्या सारखीची मोठी सोय होते. इथल्या ice cream ची महती खूपच ऐकली होती त्यामुळे नवरोबाला ते आणायला सांगून मी विसावले. मग हेझल नट फ्लेवरचं ice cream खाऊन गारेगार केलेला जीव गोळा करून पुन्हा चाल चाल माते करत बस स्टेशन गाठलं .तर 43 बस शनिवारी धावत नाही हे कळलं . त्यामुळे एका अर्थी बरंच झालं इतकं दमल्यावर निसर्ग काय बघणार होते मी त्यामुळे ट्रेन चा झटपट प्रवास करून आम्ही घरी येऊन विसावलो.

© डॉ वंदना कामत

No comment

Leave a Response