Primary tabs

मैत्रीची नवीन व्याख्या!

share on:

आज काल मैत्रीची व्याख्या म्हणजे फक्त सोशल नेट्वर्किंग वर संपर्कात राहणे, अशी झालीये! थोडक्यात आभासी दुनियेत आज काल सगळेच जास्त रमायला लागलेत. पण याचमुळे माणसांपासून दूर गेलेत का? याच उत्तर नक्कीच हो असे आहे! आभासी दुनियेशिवायही दुसरे एक जग आहे याची स्वत: ला झालेली जाणीव करून देत आहे शर्वरी पर्वते आपल्या या लेखामधून! 

आज सकाळीच मी माझ्या आत्याला फोनवर कोणाशीतरी खूप बोलताना ऐकलं. खूप हसत होती, जुन्या काही गोष्टींच्या आठवणी सांगत होती; ऐकून वाटलं नक्कीच कुठलीतरी जुनी मैत्रीण असणार जिच्याशी या गप्पा चालल्या आहेत.
फोन झाला आणि मी तिला विचारलं, "किती हसत होतीस गं, कोणाशी बोलत होतीस?"  ती म्हणाली, "माझ्या प्राथमिक शाळेतल्या मैत्रिणीचा आज खूप वर्षांनी फोन आला होता, माझा एक लेख तिच्या वाचनात आला, तिला तो आवडला आणि नंबर मिळवून तिने मला फोन केला."

मी म्हणाले, "कसं गं एवढं लक्षात राहतं तुमच्या?" आत्या हसून म्हणाली, "आम्ही ते क्षण जगलो होतो; त्यांचा आनंद घेतला होता. तुमच्यासारखं नाही; भेटलो की सेल्फी काढला!"  मी म्हटलं "प्लीजच हं आत्या! आम्ही आमचा आनंद फोटोजमध्ये कायमसाठी ठेवून देतो." आत्या हसली आणि म्हणाली, "हो ठेवूनच देता...अनुभवता थोडीच? कधी पाहता का गं पुन्हा ते फोटो? आणि हो भेटलात तरी सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये गुंग आणि त्यातही हद्द म्हणजे समोरासमोर बसून चॅटिंग करता! मला तर बाई हे तुमचं समीकरण काही कळतच नाही".... आत्या बोलतंच होती....
"आता तर काय व्हॅलेंटाईन्स का काय चाललाय ना?" आत्याच्या प्रश्नाने मी चमकून होकारार्थी मान हालवली. "मग झाले का पाठवून गुलाब...  व्हॉट्सॲपवर  ?" मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, "आत्या तुला माहिती आहेत हे दिवस!" आत्या पुन्हा हसली आणि म्हणाली, "आमच्यावेळी हे असले डेज वगैरे नव्हते, पण कोणीतरी कोणाच्यातरी बेंचवर फूल, चॉकलेट ठेवत असायचं. मग तुला दिला की नाही गुलाब कोणी?" मी आ वासून आत्याकडे पाहत होते. "काय ग अशी काय बघतेस? नाही दिला का?" मी म्हटलं, "नाही,  व्हॉट्सॲपवर   रोझ डेच्या शुभेच्छा आल्या." आत्याने कपाळाला हात लावला आणि म्हणाली "अरे देवा! हेही व्हर्चुअलच का? आणि आता मग पुढचे डेज?" म्हटलं "माहीत नाही."

आत्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. "किती ग ग्रुप्स आहेत व्हॉट्सॲपवर?" म्हटलं, "असतील दहा-एक तरी." "कितींना ओळखतेस?" म्हटलं, "काही जणांना." "मग नुसतं काय टाक-टाक, टुक-टुक?", मी हळू आवाजातच हो म्हटलं.
"तुझ्या जुन्या मित्र-मैत्रिणींची नावं आठवतात का गं तुला?" पुन्हा हळू आवाजातच, "हो काही काही." कॉलेजमध्ये प्रत्यक्ष मित्रमैत्रिणी किती होते की जे कायम तुला भेटतात? आता जरा गंभीर आवाजातच मी उत्तर दिलं, "शून्य." आत्याने पुन्हा कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली, "या व्हर्चुअल विश्वामुळे जग जवळ (?) आलंय खरं पण तितकंच किंवा त्याहूनही जास्त ते लांब गेलं आहे." तेवढ्यात आत्याचा फोन वाजला आणि पुन्हा एकदा संवादात ती गर्क होऊन गेली.

मी मात्र निःशब्द होऊन विचारात पडले. कितीदा आपण ग्रुपवर ठरवतो की भेटू या पण ते प्रत्यक्षात क्वचितच येतं. व्हॉट्सॲपवर LOL आणि Hahaha सारखे मेसेज पाठवून आणि इमोजीज पाठवून खरंच आपण मनमुरादपणे हसत असतो का? मुळात त्यावर आपण जे बोलतो ते समोरच्या व्यक्तीपर्यंत योग्य तऱ्हेने, जसं आपल्याला म्हणायचं आहे तसं पोहोचत असेल का? का आपल्या बोलण्याचा काही वेगळाच अर्थ निघत असेल? असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात घोंगावत असताना मला माझ्या एका Bff म्हणजे बेस्ट फ्रेंड फॉरेव्हरचीही आठवण येत होती आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. नंबर unknown होता पण तरीही तो मी उचलला. समोरचा स्वर ऐकला आणि मी एक क्षण चकित झाले. ४ वर्षापूर्वी माझं ज्या माझ्या मित्राशी (Bff) चॅटिंग करत असताना भांडण झालं होतं आणि त्यानंतर आमचा संपर्कही तुटला होता त्याचा आवाज.... याला योगायोग म्हणावं? की काय? काय बोलावं काही कळेना. आनंदही होत होता आणि आश्चर्यही वाटत होतं.

आमच्या ग्रुपला कायम एकत्र आणणारे आम्ही दोघं! टपरीवरचा चहा, फिरायला जाणं, एकमेकांच्या घरी जाणं,‌ ग्रुपने मिळून काही खोड्या करणं... अक्षरशः सगळं असं एका क्षणात डोळ्यासमोर तरळून गेलं. समोरून "Sorry" असे शब्द ऐकू आले त्या वेळी माझ्या डोळ्यांत पाणी आलेलं होतं. "I am sorry" आपोआपच शब्द बाहेर पडले आणि सुरू झालं; गप्पांचं रियुनियन! असंख्य विषय जे बोलायचे राहिले होते, असंख्य घटना ज्या मधल्या काळात घडल्या होत्या. प्रत्येकवेळी कटिंग पिताना झालेली आठवण आणि माझ्या नाटकातल्या डायलॉगवरून त्याने माझं 'धनी' हे पाडलेलं नाव किती बोलावं आणि किती नाही प्रश्नच पडला होता.... फोन ठेवला आणि लक्षात आलं, 'अरे! आपण काय मिस करत होतो'..... आनंदाने रडू येत होतं. मेसेजिंगमुळे झालेल्या गैरसमजाने हे भांडण इतकं ताणलं गेलं होतं. मेसेज मागचा भाव कळला नव्हता. केवढा मोठा तोटा या मेसेजिंगमुळे झाला होता. ताणलेलं तुटल्यातच जमा झालं होतं. आज तो फोन आला नसता तर हे असंच व्हर्चुअल जगात मी स्वतःला खोटं खोटं रमवलं असतं. डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं.
तेवढ्यात आत्या आली आणि विचारलं, "काय ग काय झालं?" मी म्हटलं, "आत्या मी 'गप्पा' मारल्या आज ४ वर्षांनी! त्या भांडणानंतर मैत्रीसारख्या सगळ्या झूट वाटणाऱ्या गोष्टींनी मला जे सपक केलं होतं ना, त्यात आज पुन्हा मीठ घातलं गेलं आणि माझ्यातल्या मैत्रीला चव आली. गप्पांचा, संवादाचा खरा अर्थ मला कळला." आमचा जुना ग्रुप तुला आठवतोय? "आम्ही पुन्हा भेटणार आहोत 'गप्पा' मारायला. या वर्षीच्या 'व्हॅलेंटाईन्स डे' ला गप्पांचं इंद्रधनुष्य दिसणार आहे बरं का....आणि तेही प्रत्यक्ष!"

-शर्वरी श्रीहरी पर्वते, पुणे

No comment

Leave a Response