Primary tabs

ऐकणे ही एक कला!

share on:

ज्याला करियर करायचे आहे त्याने प्रथम ऐकायला शिकले पाहिजे असे मला नेहमीच वाटत आले आहे.

आपण खरच ऐकतो का?

विचारा हा प्रश्न स्वतःला...

समोरचा आपल्याला काही सांगत असतो...

“सर...मला उद्या सुट्टी हवी आहे”

“मी खूप कामात आहे”

“सर...उद्या...घरी..”

“ते दिलेलं काम पूर्ण केलं का?”

“सर..उद्या मुलाची....”

“फाईल पूर्ण करा..माझा वेळ खाऊ नका”

“पण सर ऐकून तर घ्या”

“मघा पासून ऐकतोच आहे न? दुसरं काय करतोय”

मला सांगा हा संवाद तुमच्या परिचयाचा असेल न? मग तो आपल्या कचेरीतला असेल किंवा आपल्या घरात घडणारासुद्धा असेल... समोरची व्यक्ती काय सांगायचा प्रयत्न करते आहे हे आम्ही “ऐकूच” शकत नाही.

“ऐकणे आणि समजणे” ह्यातील फरक समजून घ्यायला हवा.

दोन कानांचा उपयोग एकाने ऐकणे आणि दुसऱ्या बाहेर पसार करणे हा नसतो. ह्या दोन्हीच्या मध्ये स्मृती असते, मन असते, बुद्धी असते. ह्या तिघांच्या मदतीने आपण समोरच्याचे बोलणे समजून घेऊ शकतो. त्याच्याशी “समरस”

होऊ शकतो. एकदा का “समरस” झालो की सहअनुभूतीचा अनुभव घेऊ शकतो. त्याची अडचण मग आपली होते किंवा त्याची काळजी आपली होते. त्याची गरज आपली होते आणि मग आपण त्याला मार्ग सुचवू शकतो.

सगळे जिंकणे हे खूप महत्वाचे असते....

एक जिंकतो आणि दुसरा हरतो तेंव्हा एक विजेता आणि एक पराजित तयार होतात. पाराजित व्यक्ती आपल्यासाठी काही करू शकत नाही. हे कधीही विसरू नका.

व्यवस्थापनात एक तत्व खूप महत्वाचे असते “Never stand over a dead body, dead body never responds” “मृत व्यक्तीच्या शरीरावर उभे राहू नका, मृत व्यक्ती प्रतिसाद देत नाही. हे कधीही विसरायचं नाही. मृत व्यक्ती प्रतिसाद देत नाही. आपल्या ऐकण्यातून समोरच्या व्यक्तीला आपण जिवंत ठेवतो आहोत की नाही ह्याची काळजी घेणे आवश्य्क असते.

ऐकणे म्हणजे मान्य करणे असे होत नाही. मतभेद आवश्यक असतात. जरुरी असतात.

ऐकणे म्हणजे समजून घेणे. समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेता तेंव्हा त्याचे हेतू लक्षात येतात. हेतू कळले की काय केले असता त्याला आपला सहकारी बनवता येईल हे कळते. एक सहकारी मिळाला की आपण किती बळकट होतो हे कळणे महत्वाचे असते.

मग....

ऐकताना काय कराल?

1. समोरच्याची नजर सोडायची नाही.

2. तो कुठले शब्द वापरतो आहे ते ध्यानात घ्यायचे.

3. त्याच्या आवाजाचा स्तर काय आहे हे लक्षात घ्यायचे.

4. त्याची निश्चित गरज काय आहे हे ओळखले की त्याला समजून घेणे खूप सोप्प आहे.

5. बोलण्याचा मतितार्थ चटकन ओळखणे.

6. त्याला बोलू देणे. त्याला बोलताना तोडू नये.

7. आपल्या मनगटावरील घड्याळाकडे बघू नये. It’s a killing reaction.

8. मोबाईल फोन सतत घेणे टाळायला हवे.

9. समोरचे कागद चाळणे वाईट.

10. चेहऱ्यावर कंटाळा दर्शवणे समोरच्याचा अपमान करण्यासारखेच.

11. हम...हो...हो...ऐकतोय...असे प्रतिसाद देणे. समोरच्याला असे वाटू नये की तो एखाद्या भिंतीशी बोलतोय.

हे जरका तुम्हाला साध्य झाले तर तुम्ही एक चांगले ऐकणारे होऊ शकता.

जो ऐकू शकतो त्याचे खूप मित्र होतात.

ज्याला जितके जास्त मित्र..तितके कमी शत्रू असतात.

 

अजात शत्रू होणे दुरापास्त नसते.

मग....

ऐकायला सुरुवात कराल न?

विक्रम भागवत 

No comment

Leave a Response