Primary tabs

हात्तीच्या मारी!!!

share on:

पाणीदार मराठी या लेखमालेतील हा पुढचा लेख!

हल्लीच्या इंग्रजी माध्यमातल्या पोरांना मराठी बोली भाषेतले बारकावे समजवून सांगावे लागतात. घरात मराठीच बोललं जात असलं तरी भाषेतल्या खाचाखोचा आणि धमाल आपसूक समजून त्यातली मजा उमजणं जरा अवघडच! आमच्याच घरातली गोष्ट सांगते. परवा असंच काहीतरी बोलताना मी लेकाला म्हणाले, "असा तो माणूस हातावर तुरी देऊन पसार झाला". "हातावर तुरी म्हणजे आपण आमटी करतो ते का आई?", असा मला कपाळावर हात मारायला लावणारा त्याचा प्रश्न आला. त्याला कोपरापासून हात जोडून म्हटलं, "थांबच तू आता. हातच्या काकणाला आरसा कशाला? असल्या गोष्टीत आपला हात चांगला आहे. 'हात' ह्या नुसत्या एका शब्दावरून आपण रोज वापरतो त्या क्रियांची, वाक्प्रचारांची, म्हणींची यादीच करू या". लगेच काम हाती घेतलं. असल्या गोष्टी म्हणजे आपल्या हातचा मळ! मराठीचे प्राध्यापक असलेल्या तीर्थरूपांनी डोक्यावर हात ठेवलाय ना!

पण कसला मुहूर्त लागायला! तोवर भुकेमुळे हातघाईवर येऊन लेकाने हातपाय आपटायला सुरुवात केली होती. आता त्याच्या हातातोंडाची गाठ पडणं महत्त्वाचं होतं. त्याच्याशी हातमिळवणी केली, हातचलाखी करून त्याला म्हटलं की, बाबा रे, आत्ता चहा-बिस्किटावर हात मार. पण त्याने सपशेल हात हलवले. वर लाडीगोडी लावत म्हणतो कसा, "तुझ्या हाताला चव आहे आई. मला आवडेल ते बनवण्यात तुझा हातखंडा आहे." लगेच त्याच्या हातात त्याला हवं ते ठेवलं आणि तेवढं काम हातावेगळं केलं. 'हात' या शब्दावर उत्खनन करायचं काम हाती घेतलं. 

      हत्तीच्च्या मारी पाहा बरं हातोहात केवढे शब्द, वाक्प्रचार हाताशी आले! नेहेमीसारखी यादी हातावेगळी करून टाकू या का? चांगली हातभर बनेल. काही राहून गेलेच जरी टिपायचे, तरी हातभार लावायला तुम्ही आहातच हाताशी... 

१. हात मारणे (चौर्य)

२. कपाळावर हात मारणे 

३. पाण्यावर हात मारणे (पोहताना)

४. हात हलवणे (निरोप/असमर्थता)

५. हात चोळणे 

६. हात मोडणे 

७. हात टेकणे 

८. हात तोडणे/कलम करणे 

९. हात आवरणे 

१०. हात आखडता घेणे 

११. हात फिरवणे (लेप/रंग)

१२. हात न लावणे (कामास/अन्नास)

१३. हात दाबणे/हाताला वंगण लावणे (लाच)

१४. हात टाकणे (स्त्रीवर)

१५. हाती घेणे (कार्य)

१६. हात मागणे (विवाह)

१७. हात देणे (अनुमती)

१८. हात घालणे (विषयाला)

१९. हात धरून जाणे/हात धरून पळून जाणे (सोबत)

२०. हात गुंतणे 

२१. हात चांगला असणे (कला)

२२. हात सैल सोडणे 

२३. हातचा मळ असणे 

२४. हातपाय आपटणे (संताप)

२५. हातपाय झाडणे (वेदना)

२६. हातावर पोट असणे 

२७. हात दगडाखाली असणे 

२८. हातावर तुरी देणे (निसटणे)

२९. हाताला चव/कला असणे 

३०. हाताला लागणे (सापडणे)

३१. हातपाय पसरणे (झोपणे/भीक/जम बसणे)

३२. हातपाय गुंडाळणे (आटोपते घेणे)

३३. हातवारे करणे 

३४. हातखंडा असणे 

३५. हातात कंकण बांधणे (प्रतिज्ञा)

३६. हातास/हाताशी धरणे (मदत)

३७. हातचलाखी करणे 

३८. हातोहात सापडणे 

३९. हातात हात देणे 

४०. हातमिळवणी करणे 

४१. हात जोडणे 

४२. हातघाईवर येणे 

४३. हातातोंडाची गाठ पडणे 

४४. हातातोंडाची घाई उडणे 

४५. हातात/हाती नसणे (असमर्थता/ताबा नसणे)

४६. हातापाया पडणे 

४७. हात कुणी धरू न शकणे (तुलना)

४८. हातावर हात चोळणे (चरफडणे)

४९. हातावेगळे करणे 

५०. एक हातभर (माप/प्रमाण)

५१. हात (पत्त्यांच्या डावातला)

५२. हाताखालचा माणूस 

५३. हाताची थाप 

५४. हातावर पोट 

५५. उजव्या हातास (दिशा)

५६. दोन हात करणे/दोनाचे चार हात करणे 

५७. हात दाखवून अवलक्षण 

५८. हातचे सोडून पळत्याच्या पाठी जाणे 

५९. हाती भोपळा/धोंडे देणे 

६०. हातावर शीर घेणे 

६१. खुर्चीचा हात (टेकू)

६२. उजवा हात असणे (घनिष्ठ)

६३. हात धुवून पाठी लागणे/हात धुवून घेणे 

६४. आपला हात जगन्नाथ 

६५. एका हाताची सगळी बोटे सारखी नसतात 

६६. हातच्या काकणाला आरसा कशाला 

६७. तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे 

६८. एका हाताने देणे, दुसऱ्याने घेणे 

६९. हातभर लाकूड, नऊ हात ढलपी (अतिशयोक्ती)

७०.  हात दाखवणे

७१. हात पहाणे (ज्योतिष) 

७२. या हाताचे त्या हाताला कळू न देणे

७३. मूठभर मियां हातभर दाढी

७४. एका हाताने टाळी वाजत नाही

७५. हात लावीन त्याचं सोनं/वाटोळं

७६. हातचं राखून असणे 

७७. हात शिवशिवणे 

७८.हातावेगळं करणे 

७९. आता मीच हात आवरता घेते 

 

- माधुरी घाटे -हळकुंडे

 

No comment

Leave a Response