Primary tabs

वाटेवरचे कुणी - भाग ३

share on:

वाटेवरचे कुणी या लेखमालेतील हा पुढचा लेख!

आपल्या आयुष्यात मैत्र जीवाचे मिळणं हा खरोखरच नशिबाचा भाग असतो.  मी मात्र या बाबतीत भाग्यवान आहे हे मी माझ्या याआधीच्या लेखात  म्हटलंच आहे. आता चांगले याचा अर्थ, जीवाला जीव देणारे, नाकासमोर चालणारे, रूढार्थाने सभ्य असणारे असा अजिबात नाही;  तर चांगल्या वाईटाची जाण असणारे, स्वतःच्या आयुष्याचं ध्येय जाणणारे, चांगल्या वाईट परिस्थितीत आपल्या मित्राला सांभाळणारे तसंच आपल्या घरी खाण्याचा काही विशेष पदार्थ बनला की आठवणीने माझ्यासाठी काढून ठेवणारे, कंपुतील मित्र घरी एकटा आहे हे कळताच रात्री त्याच्या घरी धाड घालून, मस्त स्वयंपाकाचा बेत आखून आणि त्याचा यथेच्छ फडशा पाडून शिवाय घरातले (त्याच्या) खाण्याचे डबे फस्त करणारे खवैये. संस्कार, सभ्यता, सदाचार यांना अगदीच गुंडाळून न ठेवणारे, सुशिक्षित, एक दोघं स्वतःचा व्यवसाय करणारे.  त्या वेळी सगळेच अविवाहित आणि जबाबदारी नसलेले. काही शिकत होते. मिळवते आम्ही दोघं तिघेच होतो. त्यामुळे अड्ड्यावर भजी कटिंग चापल्यावर मागच्या खिशात हात घालण्याचं काम आळीपाळीने आमच्या तिघातच विभागलं जायचं.  अर्थात या गोष्टीचं कधीच काही विशेष वाटलं नाही. आमच्या कंपूत शास्त्रीय - सुगम संगीताची आवड अनेकांना होती, काहींना शास्त्रीय संगीताचं ज्ञानही होतं.  त्यातूनच आम्ही अनेक शास्त्रीय सुगम संगीत मैफिलींचा एकत्रित आनंद घेतला. 

ठाण्यात आमची "नाटयछंदी" ही हौशी नाट्यसंस्था होती. ज्याबद्दल मी आज या लेखातून बोलणार आहे. संस्थेशी माझं नातं साधारणपणे १९८३ - ८४ साली जुळलं.  अभिनयाची मनापासून खाज हे एक यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं आणि दुसरं चकाट्या पिटत बसण्यापेक्षा एकत्र येऊन काही क्रिएटिव्ह करण्याचा आनंद होता.

यामध्ये दरवर्षी आंतरशालेय अभिनय स्पर्धा भरवणं, तीन अंकी बालनाट्य बसवून त्याचे मुंबईतील नाट्यगृहात प्रयोग करणं. बालनाट्याचे प्रयोग करणं म्हणजे खर्चच जास्त असायचा. जाहिरात, नाटकातील मुलांची जबाबदारीने ने आण, नाट्यगृहाचं भाडं, प्रयोगाचा खर्च आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे तिकीट दरही कमी ठेवायला लागायचे. आम्ही हा सगळा खर्च वैयक्तिक पदरमोड करूनच भागवत होतो, कारण संस्थेच्या खात्यात काहीच शिल्लक नसायची; पण खाज ना या सगळ्याची, त्याला कोण काय करणार? सगळेच नाट्यकंडू.  नाट्यछंदीच्या वर्धापनदिनी आम्ही एखाद्या लोकप्रिय नाटकाचा प्रयोग ठेवायचो. चांगली तिकीट विक्री झाली तर निर्मात्याचे पैसे  देऊन राहिलेले संस्थेच्या गंगाजळीत साठतील एव्हढाच उद्देश असायचा. परंतू काही वेळा हे गणित चुकायचं आणि पैसे मिळण्याऐवजी आमच्याच खिशातून जायचे. त्या ऐनवेळी होणाऱ्या धावपळीला संस्थेच्या अनेक सुहृदांची साथ मिळायची. आणि मनावरचा ताण हलका व्हायचा.  हे विश्वासाचं ऋण कसं फेडणार होतो आम्ही?

राज्य नाट्य स्पर्धांपासून अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये आम्ही उत्साहाने भाग घ्यायचो; पण या सगळ्या मध्ये दर वर्षी महत्त्वाचा उपक्रम होता तीन अंकी (वेळी बहुतेक नाटकं तीन अंकाची असायची) नाटक बसवून त्याचे विविध सार्वजनिक गणेशोत्सवातील कार्यक्रमात प्रयोग करणं. आर्थिक बाजू कायमच कमकुवत असायची. नाटकाच्या तालमी आमच्या शाळेच्या हॉलमध्ये करायचो कारण भाडं फारच कमी असायचं. सामाजिक नाटकं निवडायचं म्हणजे कपडेपटावर खर्च कमी व्हायचा. नाटकाच्या दिवशी संपूर्ण सेट आणि सगळ्या कलाकारांना एकत्र करून ठिकाणावर वेळेच्या तासभर आधी तरी पोहोचावं लागायचं. यामध्ये अनेक गंमती व्हायच्या. एका ठिकाणी सेट वगैरे लावून सगळी तयारी झाली, कलाकार तयार झाले, कार्यक्रमाची वेळ झाली तरी समोर प्रेक्षक कुणीच दिसेनात. आम्हाला काहीच कळेना. शेवटी एकाला कारण विचारल्यावर म्हणाला 'आता पाणी येतं ना, सगळे पाणी भरतायत. दहा वाजेपर्यंत सगळे येतील. दहा वाजता मैदान पूर्ण भरलं आणि प्रयोग मस्त रंगला. एकदा मुंबई बाहेर आमच्या नाटकाचा प्रयोग होता. नाटकात एक मुलगी नवीनच होती. काम चांगलं करायची परंतू नाटकात काम करण्याची पहिलीच वेळ होती. नाटकं सुरू झाल्यावर समोरचा एवढा मोठा जनसमुदाय पाहून थोडी हबकली आणि तिला काहीच संवाद आठवेना. मग तिच्या वाक्याचा कलू देऊन तिला बोलतं करावं लागलं. नाटयछंदीच्या माध्यमातून आम्ही अनेक कार्यक्रम केले. मराठी मिश्र गीतांचा वाद्यवृंद, ठाणे म.न.पा.सह एकपात्री नाट्यगीत गायन स्पर्धा, एका बालनाट्याचे तर नाटयछंदीने पंचवीस प्रयोग केले.  आज हे ऐकायला विशेष वाटणार नाही कदाचित, परंतू आर्थिक पाठबळ काहीही नसताना त्या वेळी पंचवीस प्रयोग करणं खरंच कठीण होतं. आमच्या मनात एक फार मोठा उपक्रम राबवण्याचा विचार होता. महाराष्ट्रातील सगळ्या हौशी नाट्यसंस्थांना एकत्र आणून एक नाट्यमहोत्सव करण्याचा विचार होता. प्रयत्न खूप केले, परंतू आर्थिक पाठबळाची सोय न झाल्याने एक नावीन्यपूर्ण कल्पना कागदावरच राहिली. 

१९८९ मध्ये माझं लग्न झालं, मी ठाणा सोडून पश्चिम उपनगरात राहायला आलो आणि माझा नाटयछंदीशी असलेला ऋणानुबंध संपला. 

नाटयछंदीने आम्हाला काय दिलं असा विचार केला तर समाजातल्या विविध थरातल्या आणि क्षेत्रातल्या व्यक्तींची ओळख दिली. कुणाची साथ मिळाली तर कुणाचे उपयोगी सल्ले मिळाले.

नाटयछंदीने मला काय दिलं? तर सर्वप्रथम चांगले मित्र दिले, खूप आनंदाचे क्षण दिले, या क्षेत्रात मनमुराद बागडून अगदी शाळेपासून असलेली अभिनयाची खाज मीटवण्याची संधी दिली.

नाटयछंदीने व्यापलेला मनातला एक कोपरा आजही तसाच भरलेला आहे  .

प्रसाद कुळकर्णी 

No comment

Leave a Response