Primary tabs

माझी परदेशवारी भाग ५

share on:

माझी परदेशवारी यातील पुढचा लेख!

मार्गदोन दिवस वरुण राजांच्या कृपेने मुक्काम पोस्ट घर करावा लागल्याने जीव जरा  कातावलेला होता. त्यामुळे आज सकाळी पावसाने दांडी मारली आणि स्वच्छ निळे आकाश पाहताच हर्षवायूच काय तो व्हायचा राहिला होता. ठरल्याप्रमाणे आज Peace Palace, अर्थात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसला भेट द्यायचं नक्की केलं. स्वच्छ प्रकाश असला तरी गारेगार वारे मात्र वारेमाप होते, याचा अंदाज अनुच्या घरच्या गॅलरीत उभं राहिल्यावर आला. त्यामुळे जॅकेट्स चढवणे क्रमप्राप्त झाले. नेहमीप्रमाणे निघायच्या आधी घरी फोटो सेशन झालेच. त्याशिवाय घर सोडायचं नाही, असा मुळी शिरस्ताच आहे आम्हा माय लेकींचा. आज लेक नव्हती तर मायने तो पुरेपूर पाळला.

अशा रीतीने बस स्टॉपकडे कूच केली. छान गारेगार होतं सगळीकडे. तुरळक अशी रहदारी होती. इथे सगळ्यांना शिस्तच बाई भारी. मग त्या गाड्या असोत वा माणसं. त्याचं काय आहे आपल्याला एवढ्या शिस्तीची सवय नसते ना त्यामुळे गोंधळल्यागत होतं बघा. ह्यांच्या रहदारीच्या दिशाही आपल्यापेक्षा उलट, त्यामुळे बस कुठल्या दिशेने येणार, याबाबत माझा गोंधळ ठरलेला. इथल्या रस्त्यावर सायकल वापरणाऱ्याना मानाचं स्थान आहे का. सायकलवाल्यांसाठी चक्क स्वतंत्र मार्गिका असते आणि त्यावर इतर कुणीही अतिक्रमण केलेले चालत नाही. त्यांचा रिष्पेक्ट म्हणजे एवढा की एखाद्या स्वार जर गाडीवाल्याच्या मध्ये आला आणि त्याला काही झालं तर गाडीवानदादा दोषी धरले जातात. ऊर्जा बचतीसाठी अमलात आणलेला हा मार्ग शारीरिक तंदुरुस्तीसाठी पण फायदेशीर आहे. त्यामुळे एका दगडात दोन पक्षी का काय ते मारले जातात आणि सायकलचा वाहन म्हणून वापर करण्याच्या विविध क्लुप्त्या तर यांच्याकडूनच शिकाव्या. सायकलच्या पुढे छोटीशी बाबा गाडी लावून आपली छोटुली त्यात बसवून आई किंवा बाबा मस्त सायकल हाणत असतात; तर इति सायकल पुराण समाप्त. बऱ्याच दिवसांपासून त्यावर लिहायचं होतं, अखेर आज संधी साधली.

अखेर दोन बस बदलून आमच्या स्वाऱ्या peace palace च्या दरवाजात पोहोचल्या. Palace ची कल्पना करून गेलो होतो; पण समोर चर्च सदृश वास्तू दिसल्याने जरा गोंधळलो म्हणून द्वारपालांकडे चौकशी करून खात्री केली.

आत शिरतानाच एक झाड दिसले ज्याच्या फांद्यांना अनेक tags बांधलेले दिसले. अनुश्रीने आधी सांगितलं होतं, त्याबद्दल त्यामुळे म्हंटलं हाच तो Wish Tree बरं का! त्याबद्दल नंतर सांगीनच.

तर आत जाता जाता Guided Tours are not available अशी पाटी दिसली. इथे सध्या एक खटला न्याय प्रविष्ट असल्याने ही टूर बंद असल्याचे कळले. त्यामुळे जरा हिरमुसले पण Audio guided टूरचा पर्याय होता; त्यामुळे जरा दिलासा मिळाला. तुम्हाला हव्या त्या भाषेत (जागतिक बरं का, नाहीतर उगीच मराठी सांगाल लौकरच तोही सुदिन येवो ही इच्छा) एक पॉईंटर आणि हेड फोन्स दिले जातात. ते वापरून तुम्ही तुमच्या भाषेत सगळी माहिती ऐकू शकता.  Short and sweet अशी ही ऑडिओ guided टूर मला तरी फारच आवडली.

Peace Palace बद्दल मला जे काही समजलं ते संक्षेपाने मांडते.

Peace Palace हे शांतीदेवता आणि न्याय देवता यांचं मंदिर मानलं जातं. शेकडो वर्षे युद्धाच्या धगीने होरपळलेल्या युरोपियन प्रजेला अखेर युद्धाची दाहकता समजली ती युद्ध भूमीवरून येणाऱ्या विदारक छायाचित्रांच्या मुळे, कारण तोवर त्या कलेचा शोध लागला होता आणि समस्त प्रजेच्या मनात आपल्या देशाच्या आणि राजाच्या प्रतिष्ठेसाठी युद्ध करणं खरंच आवश्यक आहे का हा सवाल येऊ लागला आणि अशा तऱ्हेने १९ व्या शतकात शांती ( peace) ह्या संकल्पनेचा उदय झाला. समाज धुरीणांच्या मार्गदर्शनाखाली युरोप आणि अमेरिकेत शांती संघटना बांधल्या जाऊ लागल्या. यामार्गदर्शकांमध्ये Leo Tolstoy आणि Alfred Nobel यांचा समावेश होता. रशियन झार निकोलस दुसरा ह्याच्या पुढाकाराने १८९९  मध्ये पहिली शांतता परिषद हेग शहरात झाली; ज्यात २६ देशांचा सहभाग होता. ह्या परिषदेत प्रामुख्याने निशस्त्रीकरण (disarmament) आणि आंतरराष्ट्रीय न्यायप्रणालीची मुहूर्तमेढ रोवली गेली. दुसरी शांतता परिषद १९०७  मध्ये ४४ देशांच्या सहभागाने झाली. दरम्यानच्या काळात या वास्तूची पायाभरणी करण्यात आली. अनेक उदारहस्तीनी याला आर्थिक अनुदान दिलं. त्यात अग्रणी होते, अमेरिकेतील विख्यात उद्योगपती Andrew Carnegie. त्यांनी त्या वेळेस दीड लाख US डॉलर्सची मदत केली आणि एक अट ठेवली या वास्तूला स्वतःची अशी लायब्ररी असण्याची. आज जगातील सर्वात मोठी इंटरनॅशनल law लायब्ररी ही peace palace ची आहे. पुस्तकांच्या संख्येमुळे ही लायब्ररी जवळच एका स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित केली आहे. अनेकांच्या मदतीतून उभ्या राहिलेल्या ह्या वास्तूची  किल्ली २८ ऑगस्ट १९१३  रोजी Permanent Court Of Arbitration च्या सुपूर्द करण्यात आली.

Peace palace या वास्तूमध्ये International court  of Justice, Permanent court of Arbitration, Hague Academy of international law आणि peace palace library (सध्या स्थलांतरित) अशा चार संस्था कार्यरत आहेत.

आंतर देशीय, आंतर राज्यीय अशा अनेक प्रश्नांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदेप्रणालीनुसार इथे न्यायनिवाडा केला जातो.

ह्या न्यायालयामध्ये जगभरातील १५ जस्टीस नेमले जातात. ही नेमणूक UN general assembly and security council यांच्यामार्फत केली जाते. सध्याच्या मंडळात भारतीय वंशाचे जस्टीस दलवीर भंडारी यांचा समावेश आहे.

अशा तऱ्हेने सामंजस्याने जगभरातल्या समस्या शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याचं महनीय कार्य या वास्तूमधून चालते. आजदेखील जगभरातून मदतीचा ओघ इथे सुरू असतो. त्या यादीत आपले सन्मान्य नागरिक टाटा कुटुंबीय (२००७) आणि अझीम प्रेमजी (२०१७) यांची नावे वाचून उर अभिमानाने भरून आला. या ठिकाणी peace palace शिवाय इतरत्र असलेल्या शांतता संघटनांची माहिती देणारा फलक ही पहिला. United Nations च्या इतक्या महत्तावाच्या संस्थेची माहिती मिळाल्याने ज्ञानात भर वगैरे पडल्याचा फील आला. इमानदारीने हेड फोन्स परत केले. आता wish tree साठी बांधायला tags हवे होते. या wish tree ला तुम्ही आंतरराष्ट्रीय शांतताविषयक काही इच्छा लिहिलेले tags बांधायचे की तुमच्या इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. मी दोन tags बांधले एक पाकिस्तानशी असलेले आपले आपल्या तणावपूर्ण संबंधावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी आणि दुसरा आपल्या प्रिय काश्मीरचा संपूर्ण ताबा आपल्या देशाला मिळावा याकरिता!

© डॉ वंदना कामत

 

 

No comment

Leave a Response