Primary tabs

मराठी भाषा, संस्कृती, संतसाहित्य यांच्या अध्ययनाचे जगभरच्या अभ्यासकांचे, संशोधकांचे गुरू - डॉ. शं.गो. तुळपुळे

share on:

प्राचीन मराठी शब्दकोशकार म्हणजेच डॉ. शं.गो. तुळपुळे यांचा आज जन्मदिवस! त्याच्या कारकिर्दी विषयीची जाणून घ्या या लेखात!

राठी भाषा, संस्कृती, संतसाहित्य यांच्या अध्ययनाचे जगभरच्या अभ्यासकांचे, संशोधकांचे गुरू म्हणजे डॉ. शं.गो. तुळपुळे असे समीकरण १९५० ते १९९४ अशी सतत पस्तीस वर्षे पुण्यात, विद्येच्या माहेरघरात ग्राह्य धरले गेले होते.

मराठीच्या प्राचीन  आणि मध्ययुगीन कालातील अनेक रचनांतून निर्माण झालेल्या  शब्दसामग्रीचा अभ्यासपूर्ण ‘शब्दकोश’ तयार करण्याचे प्रचंड काम त्यांच्या कर्तृत्वाचा एक मोठा पैलू होता. संतांच्या रचना, त्याचे भाषाशास्त्र, शिलालेख, त्यांची ऐतिहासिकता, लोककला, लोकदेवता यांचा अभ्यास आणि त्याचे पाश्चात्त्यांना मार्गदर्शन, असे त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू सांगता येतील.

शंकर गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील गोपाळ विष्णू तुळपुळे, एक ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व होते. तुळपुळे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९३८ साली एम.ए. आणि १९४० साली पीएच.डी. पदवी प्राप्त केली. पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यावर सुमारे वीस वर्षे म्हणजे १९६९ सालापर्यंत ते मराठी भाषा-साहित्य विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते. विद्यापीठाच्या सुरुवातीच्या काळात विभागाला आणि मराठीच्या अभ्यासाला एक प्रकारची शिस्त लावण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला, अनेक नामवंत विद्यार्थी घडवले.

शंकर गोपाळ तुळपुळे यांनी १९६० नंतर आपले संशोधनात्मक ग्रंथ लोकांसमोर आणले त्यांमध्ये : १) ‘अ‍ॅन ओल्ड मराठी रीडर’ (जे पाश्चात्त्यांना मराठी शिकण्यासाठी अधिक उपयुक्त होते) १९६०, २) ‘लिंग्विस्टिक स्टडी ऑफ ओल्ड मराठी’ १९७३, ३) ‘फाइव्ह पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र’ १९६२, ४) ‘मराठी शिलालेख’ १९६३, ५) ‘महानुभाव संप्रदाय आणि साहित्य’, ६) ‘रा.द. रानडे जीवन आणि तत्त्वज्ञान’ १९६५, ७) ‘महाराष्ट्र सारस्वताची पुरवणी’, अशी सुमारे वीस ग्रंथांची नावे देता येतील.

‘प्राचीन मराठी शब्दकोश’ हा सुमारे आठशे पानांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे डॉक्टरांची मराठी भाषेला महत्त्वाची देणगी म्हणावी लागेल. डॉ. अ‍ॅनफेल्ड हौस (अरिझोना विद्यापीठ, अमेरिका) यांच्या साहाय्यानेे १९९९ साली, मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनाने हा शब्दकोश प्रसिद्ध केला. याचे कार्य सुरू असतानाचा तुळपुळे यांचा मृत्यू झाल्यामुळे पुढचे सर्व काम डॉ. अ‍ॅन फेल्डहौस यांनी पूर्ण केले. अकराव्या शतकापासून तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या मराठी संतांच्या रचनांतून येणार्‍या मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती, व्याकरण, अर्थ आणि उद्धरणे अशा प्रकारे सविस्तर माहिती देणारा हा शब्दकोश मराठीत आजही अद्वितीय आहे. डॉ. तुळपुळ्यांना असा कोश करण्याची कल्पना १९८३ साली सुचली. डॉ. पेठे, डॉ. जयश्री गुणे यांच्या साहाय्याने आणि डॉ. अ‍ॅन फेल्डहौस यांच्या मदतीने त्यांनी १९८९ साली काम सुरू केले. प्रत्येकी तीनशे नोंदी असलेल्या ६० फाइली तयार झाल्या. त्या-त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मदत घेतली गेली. अठरा मराठी शिलालेख आणि काही ताम्रपट यांतील शब्दांच्या नोंदीदेखील यामध्ये दिल्या गेल्या. इ.स. १०१८ हे साल मराठीचा जन्मकाळ, हे या कोशावरून ध्यानात आले. मराठी भाषा मुख्यत्वे त्या काळी भीमा-कृष्णा-गोदावरीच्या खोर्‍यात नांदत होती. या क्षेत्रातील  गावांचा एक दुर्मिळ नकाशाही यात दिला आहे. संदर्भ ग्रंथांची यादी या विषयांच्या अभ्यासकांना महत्त्वाची वाटते.

अनेक पाश्चात्त्य अभ्यासकांना त्यांनी मराठीची आणि संत साहित्याची गोडी लावली. त्यामध्ये डॉ. गुंथर सोन्थायमर हे पश्चिम जर्मनीचे विद्वान प्रमुख मानावे लागतील. धनगर जमात, खंडोबा-बिरोबा-विठोबा ही दैवते, इतर लोकदेवता, वीरगळ (हिरोस्टोन) इत्यादी विषय त्यांच्या अभ्यासाचे होते आणि त्यांना डॉ. तुळपुळे यांचे अखेरपर्यंत मार्गदर्शन लाभले. पुढे सोन्थायमर यांचेच विद्यार्थी महाराष्ट्रात अभ्यासासाठी येत राहिले. त्यांनाही तुळपुळे सरांनी मार्गदर्शन केले. जर्मनीच्या कॅथरिना किनले या; संत ज्ञानदेवांच्या ‘अभंग गाथा’च्या संपादनासाठी भारतात आल्या. त्यांच्या दोन खंडात्मक ग्रंथाला तुळपुळे यांनीच मार्गदर्शन केले. १९८० साली डेन्मार्कच्या रॉयल डॅनिश लायब्ररीच्या प्रा. एलिझाबेथ स्ट्रॅण्डबर्ग तंजावूरच्या मराठी राजांच्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात आल्या, मोडी शिकल्या आणि त्या कागदपत्रांचा ग्रंथ डॉ. तुळपुळे यांच्या मार्गदर्शनाखाली छापून प्रसिद्ध केला. अशी अनेक पाश्चात्त्य संशोधकांची कामे सांगता येतील, ज्यांमध्ये डॉ. तुळपुळे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

पुणे विद्यापीठाच्या सेवेतून मुक्त झाल्यावर १९७६ साली हायडेलबर्ग विद्यापीठाने आयोजिलेल्या युरोपीय देशातील व्याख्यान दौर्‍यावर ते गेले होते. त्यांनी जर्मनीतील हायडेलबर्ग, हॅम्बुर्ग, कोपनहेगेन (डेन्मार्क) या ठिकाणी व्याख्याने दिली. पश्चिम जर्मनीच्या वेसबेडनच्या हॅरासोविट्झतर्फे त्यांचा ‘मराठी विदग्ध वाङ्मयाचा इतिहास’ या नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. हायडेलबर्ग विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पात डॉ. गुंथर सोन्थायमर यांच्याबरोबर त्यांनी महानुभावाच्या लीळाचरित्रचा इंग्रजी अनुवाद पूर्ण केला. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या, लॉरेन्सचे प्रा. जॉन स्टॅनले यांच्याबरोबर मराठी संत साहित्याचे सर्वेक्षण केले. त्यांनी अमेरिकेच्या क्रिस्टीन राव यांच्याबरोबर मराठी लावणीसंबंधीचे संशोधन-मार्गदर्शन केले. पोवाडा-लोकगीते-लावण्या यांच्याबरोबर भारुडे, भजने, अभंग यांच्याही अभ्यासाची दिशा त्यांनी दाखविली.

लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अ‍ॅण्ड आफ्रिकन स्टडीजचे प्रा. आय.एम.पी. रिसाइड १९६५ साली पंढरपूरच्या विठ्ठलाच्या, संस्कृत पांडुरंग माहात्म्यावर काम करण्यासाठी पुण्यात आले होते. डॉ. तुळपुळे यांनी रिसाइड यांना मुक्त हस्ते मदत केली होती. पंढरपुरातील माहात्म्यवर्णित (श्रीधराच्या पांडुरंग माहात्म्यातील) जुने अवशेष तुळपुळे यांनी उलगडून दाखविले. पंढरपुरातील शिलालेख पुनश्च अभ्यासून पंढरपुराच्या ऐतिहासिक स्वरूपात भर घातली. असेच काम नंतर डेन्मार्कच्या प्रा. एरिक सॅण्ड यांनी केले. प्रा. शार्लोट वोदविले या फे्रंच विदुषीने ज्ञानदेवांच्या हरिपाठाची चिकित्सक आवृत्ती १९६९ साली पॅरिसमध्ये प्रसिद्ध केली. या संशोधनालाही डॉ. तुळपुळे यांचे मार्गदर्शन होते. ही सर्व नावे, त्याचे देश, आणि प्रकल्प वाचल्यावर डॉ. तुळपुळे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठे काम केले, नव्हे मराठी-भाषा, संत साहित्य जगभर पोहोचते केले हे जाणवते.  आजही त्यांचे कार्य विदेशांत गौरविले जाते.

पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर डॉ. रा.ना. दांडेकर (संस्कृत) आणि . शं.गो. तुळपुळे (मराठी) विद्यापीठ सेवेत रुजू झाले. १९८८ साली डॉ. दांडेकरांच्या पीएच.डी.ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांच्या डिग्रीचे नूतनीकरण समारंभपूर्वक हायडेलबर्गमध्ये करण्यात आले. ही जगावेगळी घटना डॉ. दांडेकर संकोचाने सांगू शकले नाहीत पण, डॉ. तुळपुळे कार्यक्रमाला हजर होते. पुण्यात परतल्यावर त्यांनी दै. सकाळमध्ये सविस्तर लेख लिहून ही अभिमानाची घटना भारतीयांसमोर आणली. काही वर्षांपूर्वी संत साहित्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार व्हावा या हेतूने जर्मनीत हायडेलबर्ग येथे डॉ. सोन्थायमर यांनी भक्ती परिषद भरविली. त्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. तुळपुळे यांनी उचलली, नव्हे एका सत्रात वारकरी संप्रदायाचे कीर्तनही सादर केले गेले, अनेक शोधनिबंधांनी  त्यांनी मराठी संत जगभर पोहोचवले.वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत असता, पुण्यात त्यांचे निधन झाले.

-वा..मंजूळ       

(साभार-महाराष्ट्र नायक )                                   

 

No comment

Leave a Response