हल्लीच्या जमान्यात फक्त पुरुषांनी कमवायचं आणि बायकांनी घरकाम करायचं हे राहिलं नाहीये. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून बायका काम करतात. अगदी घर, नवरा, मुले, सासू सासरे, सणवार सगळे सांभाळून! पण पुरुष पण बायकांच्या बरोबरीने काम करतात का? तर दुर्दैवाने याचं उत्तर नाही असंच मिळतं. याची काही प्रातिनिधिक उदाहरणे माझ्या समोर आहेत.
नवरा एका कंपनीत मोठ्या हुद्यावर कामाला. बायको मोठ्या आयटी कंपनीत कामाला. घरी हे दोघे एक तीन वर्षाचा मुलगा आणि सासू एवढेच. नुकतच नवीन घर घेतलेले. नवऱ्याची कंपनी बंद पडते आणि त्याची नोकरी जाते. काही महिने दुसरी नोकरी शोधून हवी तशी हवी त्या पगाराची मिळत नाही. घरात मी नोकरी करणार नाही कारण मला हवी तशी हवी त्या पगाराची नोकरी मिळत नाही हे जाहीर करून टाकेलेले. बायको समजावून दमलेली. घराचा सगळा आर्थिक भार तिच्यावर. तिने मेहनत करून उभा केलेला छोटा उद्योगही सांभाळायची नवऱ्याची तयारी नाही. सासूही मुलाच्याच बाजूने. इतर बायका नवऱ्याच्या जीवावर जगतात मग नवरा बायकोच्या जीवावर जगला तर कुठे बिघडलं, हे वर! बर घरात नवऱ्याची काडीची मदत नाही. सकाळी सगळी काम उरकून मुलाला शाळेत सोडून ऑफिसला जायचं. नवरा उशीरा उठून दिवसभर टीव्ही, मोबाईल मध्ये नाहीतर झोपा काढणे हाच उद्योग. मुलाला सासू तिच्या सोयीप्रमाणे खायला प्यायला घालते एवढच एक काय ते तिला समाधान! घरातलं सगळं बघणं , आर्थिकदृष्ट्या सांभाळणं आणि उभा केलेला उद्योग बघणं या नादात मुलाकडे दुर्लक्ष! मुलालाही बाबा आणि आजीने शिकवलेले. तुला ही आई वेळ देत नाही तर आपण दुसरी आई आणू! अशा वेळेस माहेरचे आधार देतात पण वडिलांची तब्येत नाजूक असल्यानं ती मुलाला घेऊन माहेरीही जाऊ शकत नाही.
असेच एक दुसरे उदाहरण – मुलाला नोकरी नाही पण आईची इस्टेट आहे, पैसा आहे त्यावर आरामात जगू आणि मुलगा नोकरी शोधतो आहे लवकरच मिळेल अशी आश्वासने देऊन लग्न केले. मुलगी आयटी कंपनीत कामाला. कामाच्या वेळा नाहीत. नवरा नोकरी शोधेल या आशेवर. दोन चार नोकऱ्या केल्या पण पगारच कमी देतात, राबवून घेतात, या कारणासाठी सोडलेली. त्यात मुलगा झाला. घर, नोकरी करून मुलाचे बघायला लागते. सासू मुलाला नोकरी करायला सांगते पण त्याची इच्छा नाही. त्यावरून आईशी भांडणं साठवलेले पैसेही उधळण्यावारी जातात. दिवसभर झोपा काढायच्या नाहीतर गाडीवर फिरत बसायचे हा एकाच उद्योग.
तिसरे उदाहरण म्हणजे मुलगा इंजिनिअर, मुलगी सीए. मुलीला चांगली नोकरी. मुलीच्या आई वडिलांनी हिच्या नावावर घर घेऊन ठेवलेले. आई वडील हयात नाहीत. लग्नानंतर त्याच घरात राहायला गेले. बायकोची नोकरी जरा लांब होती. घरी यायला उशीर व्हायचा. त्यात नवऱ्याला दुसऱ्याच्या हातचं जेवण आवडतं नाही या कारणासाठी बायकोला नोकरी बदलायला लावलेली. कमी पगाराची नोकरी घराच्या जवळ असलेली करायला लावली. त्यात आई वडील नाहीत आणि मोठ्या बहिणीच लग्न झालेलं आणि आर्थिक दृष्ट्या तीही फार करू शकणारी नव्हती. म्हणून मुलीने लग्नासाठी लोन काढलेलं. ते फेडणं तुझी जबादारी म्हणून नवरा मोकळा. त्यात भर म्हणजे नुकतीच जुळी मुले झालेली. त्यात ना ती नोकरी करू शकत होती ना दुसर काही. पण तात्पुरते का होईना नवरा कसेतरी करून सांभाळतो आहे.
वरची तिन्हीही प्रातिनिधिक आणि बोलकी उदाहरणे. तिघीही उच्चशिक्षित. पण घरच्या जबाबदारीने कंटाळलेल्या. केवळ दुसरा काही पर्याय नाही म्हणून जे आहे तसे चालू ठेवलेल्या. खरंच मुलींनी एवढं शिकणं आणि नोकरी करणं म्हणजे सगळ्याच बाजूनी जबाबदारी घेणं होत का? आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या मुलींना अशा लोकांनी जर घरकामात मदत केली तर कुठे बिघडलं? तू पैसा कमावतेस मग मी घराची जबाबदारी घेतो असं म्हणाले तर? या मुलींचे जगणे कितीतरी सोयीस्कर होईल. मुलींनीच कायम तडजोड करायची असे का? मुलांनी तडजोड केली तर त्यांच्या स्व-त्वाला धक्का पोहोचेल? हाउस हसबंड म्हणून हिणवले जाईल?
याचा विचार व्हायलाच हवा. ही मानसिकता बदलायलाच हवी. घर दोघांचे असते आणि दोघांनी मिळून सांभाळायला हवे. आणि जर तसे नसेल तर पूर्वी नवऱ्याने कमवायचे आणि बायकोने फक्त चूल-मूल करायचे हेच बरे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल!
प्रतिनिधी,
युवा विवेक
No comment