Primary tabs

एक नाजूक आघात

share on:

रस्त्यावरून जाताना आपण बऱ्याचदा अगदी बेदकारपणे गाडी चालवत असतो. आपल्या गाडीमुळे कोणाला त्रास होईल, कोणाला लागेल याचा कधी कधी विचारच करत नाही. त्यातल्या त्यात प्राणी, पक्षी असतील तर दुर्लक्षिले जातात. यावरच आधारीत एक सत्य घटना अमोल बापट यांच्याच शब्दात.

बरीच जुनी घटना आहे तशी. कदाचित तेव्हा मला स्वतःचे अनुभव लिहिता येत नसतील. किंबहुना जरी लिहिता येत असते तरी तेव्हा मुद्दाम लिहिला गेला नसेल. चिपळूणला जातानाची गोष्ट आहे. पावसाळ्यातले दिवस होते. आम्ही तिघं जण गुहागरच्या दिशेनी जात होतो. आदल्या रात्री बऱ्यापैकी पाऊस पडत होता. सगळीकडे छान हिरवेगार झाले होते आणि रस्ते काळेभोर दिसत होते. गाडीमध्ये आम्ही तिघं जण गप्पा मारत होतो आणि जाता जाता रस्त्यात किंवा आजूबाजूला काही पक्षी दिसतात का ते पाहात होतो. रस्ते गुळगुळीत असल्यामुळे गाडी तशी जोरातच जात होती. समोरून अनेक प्रकारची फुलपाखरं, चतुर येताना दिसत होते तर काही काचेवर आपटतही होते. दुचाकी वरून जाणाऱ्या लोकांचं कौशल्य पणाला लागत होतं. असं गाडीवरून जाताना जे डोळ्यात काही गेलं ना तर त्याचा मनस्ताप खूप होतो. धड डोळा बंद करता येत नाही आणि उघडा ठेवता येत नाही. अर्थात हे आपलं झालं पण हवेत उडणाऱ्या या पाखरांमुळे काही पक्ष्यांची मजा चालली होती, मेजवानीच म्हणा ना! निलपंख आणि कोतवाल हे त्यात सगळ्यात जास्त. हे सगळं असं निरीक्षण चालू असताना, अचानक एक पक्षी गाडीच्या बॉनेटच्या दिशेनी जोमानी येताना दिसला. गाडीवर कुठलंही नियंत्रण मिळवायच्या आत तो पुढच्या ग्रीलवर धाडकन आपटला. मी आणि माझा मित्र एकमेकांकडे पाहायला लागलो. आमच्या काचेसमोर फक्त हवेत उडालेली निळसर नारिंगी पिसं दिसत होती. गाडी डावीकडे घेतली. तेवढ्यात मागून एक एसटी भरधाव वेगानी येताना दिसली. आम्ही गाडीत होतो पण अभावितपणे माझा हात वर गेला आणि जणू काही खाली एखादा माणूसच मरून पडला आहे आणि त्याच्या अंगावरून गाडी जायला नको म्हणून जसा आपण हात करतो ना अगदी तसाच.. पण त्या एसटी चालकाला काय फरक पडत होता. त्याला कळलही नसेल कि खाली काही मरून पडले आहे म्हणून. तो तशीच गाडी हाकत पुढे निघून गेला आणि मागे उडला उरल्या सुरल्या पिसांचा धुरळा.. फक्त पांढरी पिसं दिसत होती त्या रस्त्यावर. आम्ही ताबडतोब बाहेर आलो आणि त्या पक्ष्याच्या दिशेनी धावलो. सगळं संपलं होतं. त्या छिन्नविछिन्न देहाकडे बघवत नव्हतं. तो पक्षी म्हणजे नारिंगी डोक्याचा कस्तूर (Orange Headed Thrush) होता. नशिबानी एसटीचं चाक त्याच्या अंगावरून गेलं नव्हतं. पिसं गायब झालेला त्याचा नग्न देह बघवत नव्हता. किमान त्याला उचलून कडेला ठेवावं म्हणून एक काठी आणि एक पान घेऊन आलो पण कसलं काय हो. एकेक अवयव वेगळा निघत होता. त्याचा नाजूक देह उचलताना मान मात्र जड झालं होतं. तरी आम्ही त्याला तसाच उचलून रस्त्याच्या कडेला ठेवलं आणि सुन्न अवस्थेत तिथेच उभे राहिलो. त्या प्रसंगानंतर बराच काळ काहीच बोलता येत नव्हतं.

काय करावं कळेना. कोण होता हा? कुठे चालला होता? त्याची कोण वाट पाहात असेल का? त्याच्या घरट्यात कोण कोण असेल? कदाचित तो त्याच्या पिल्लांना भरवण्यासाठी काहीतरी शोधायला बाहेर पडला असेल.. किंवा बाहेरून घरट्याकडे चालला असेल.. जर पिल्लं असतील तर त्यांचे आता काय होईल? नानाविध प्रश्न. दोष कुणाचा होता? आमचा का त्या पक्ष्याचा? खरतरं कुणाचाच नाही पण आम्ही त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलो आणि जर त्याची पिल्लं असतील तर अर्थात त्यांच्याही आणि आता हे दडपण आमच्या डोक्यावर आयुष्यभर राहणार होतं.

हा लेख वाचणाऱ्या सर्व लोकांना माझी एक विनंती आहे. एखाद्या माणसाला रस्त्यात पडल्यावर जशी आपण लगेच मदत करतो तशीच मदत या जीवांना करा. किमान त्याच्या अंगावरून गाडी जाणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी तरी सरकवा आणि त्या देहाला छिन्नविछिन्न होण्यापासून वाचवा.

No comment

Leave a Response