Primary tabs

इनोव्हेशनची सुरवात घरापासून

share on:

इनोव्हेशनची सुरुवात घरापासून...

सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टिव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे; अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल, तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार? आपल्याकडे अशी कुठली गरजच उरत नाही. मग अशा वेळी आपली कल्पनाशक्ती काम न करेल तर काय विशेष. पण, आपल्याला अगदी बालवाडीपासून ते उच्चशिक्षण घेत असताना आजूबाजूचे सगळे जण सांगत राहणार ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करा, चाकोरीपलीकडचा वेगळा विचार करा आणि आपण मात्र या गोंधळात ठरलेला अभ्यास आणि मिळालेले मार्क्स पदरात पाडून मोठे होत राहणार. पण एखाद्या दिवशी खरंच असं वेगळं काही करायचं ठरवलं, थोडं हटके जगायचं ठरवलं, तर कुठून सुरुवात करायची? अर्थात आपल्या घरापासून...

आपलं घरच असू शकते आपल्या कल्पनाशक्तीला चालना देणारी कार्यशाळा. आपण जरा डोळे उघडे ठेवून बघितलं, तर जाणवेल की कित्येक गोष्टी आपण अनवधानाने इनोव्हेट करून टाकल्यासुद्धा आहेत. अगदी रोजचा दात घासायचा ब्रश जुना झाला की, आपण त्याचा वापर स्प्रे पेंट करायला करतोय. एखाद्या ग्लासमधून पेन, पेन्सिल, पट्टी डोकावतेय, तर कपाटाच्या दारावर आपलं शाळेचं वेळापत्रक चिकटलेलं आहे. जरा स्वयंपाक घरात गेलो, तर कुठल्याशा जुन्या डब्या, बाटल्या, बरण्या वेगळ्याच पदार्थांनी भरलेल्या असतात. कुठल्याशा कोपर्‍यात ठेवलेल्या तांदळाच्या पिंपावर मखमली कापड पसरून ही जागा मिक्सरने घेतलेली असते. जुन्या कापडाच्या तुकड्यांचंच पायपुसणं बनून गेलेलं असतं. घरभरातला इंच न इंच वापरत आपण ते जगण्यासाठी सोईस्कर करत असतो.

केवळ माणूसच नाही; तर कित्येक मोठमोठाल्या कंपन्या त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक म्हणून इनोव्हेशन या मुद्याला महत्त्व देतात. 3 एम सारखी कंपनी गेली जवळपास 114 वर्षं याच इनोव्हेशनच्या बळावर जगात अधिराज्य गाजवत आहे. post it notes हे या कंपनीचं खूप प्रसिद्ध असं उत्पादन. सर्वप्रथम या कंपनीतील स्पेन्सर सिल्व्हरने एक प्रकारच्या डिंकाचा शोध लावला, ज्यामुळे दोन गोष्टी एकमेकांना चिकटतील. परंतु, त्यातील एक वस्तू बाजूला केली, तर त्याचं निशाण दुसर्‍या वस्तूवर राहणार नाही. पुढे काही वर्षांनी आर्थर फ्रायने त्याच्या हातातील पुस्तक उघडताना त्यातील बुकमार्क गळून पडले, तेव्हा हा डिंक वापरून त्याने त्यावर कागद चिकटवून बघितला. त्या प्रकारच्या पद्धतीने पुढे post it notes अस्तित्वात आल्या आणि त्यांनी जगाच्या बाजारपेठेत इतिहास घडवला.

एखादी प्लास्टिकची बाटली, एखादा लोकरीचा तुकडा; इतकंच काय, एखादा दगड किंवा वीट विचारात घेत त्या त्या वस्तूचा काय काय म्हणून उपयोग होऊ शकतो, यावर तासन्तास चर्चा केली जाते. त्यातील कुठलाही मुद्दा लहान किंवा मोठा मानला जात नाही, तर त्याला कल्पना म्हणून महत्त्व दिलं जातं. यासारख्या, कोणतंही बंधन न मानता केलेल्या विचारमंथनातून स्मार्टफोन, मोबाईल, अ‍ॅप, कम्प्युटर, रंगीत विटा किंवा स्वयंचलित गाडी अशी उत्पादने अस्तित्वात येत असतात.

 वस्तूचा नवा उपयोग केला गेला, त्यापासून नवी वस्तू बनवली गेली, तर त्याला व्यवसायाचं रूप देता येईल का, त्या व्यवसायातून पैसा मिळवता येऊ शकतो का किंवा एखादी नवी बाजारपेठ निर्माण करता येऊ शकते का, एवढा मोठा विचार या लहानशा कृतीमधून करता येऊ शकतो. आपणही जर घरातली एखादी गोष्ट सहज वापरता यावी; म्हणून जाणिवपूर्वक त्यात बदल करायचं ठरवलं तर खूप काही करू शकतो.

- नंदिता केळकर

 

No comment

Leave a Response