Primary tabs

चित्रवत

share on:

त्याच्या बंगल्यातल्या त्या उंची दालनातली ती सुंदर सुंदर चित्रं बघून मी चकीत झालो होतो.

हवामान बिघडल्याने पुढे ड्राईव्ह न करण्याचा निर्णय घेऊन मी आडबाजूच्या त्या बंगल्यावर जातो काय आणि काही वेळ थांबावे म्हणून तिथल्या यजमानांना विनंती करु असा विचार करत असताना त्या बंगल्याच्या मालकाने - सुजयने, मला ओळखून त्याचा पाहुणचार घेण्याची गळ घालावी काय..सगळेच स्वप्नवत !

सुजय आणि मी शाळेतले मित्र. पण त्याच्या वडिलांची बदली होऊन तो दहावीनंतर कोठे गायब झाला कळलेच नाही. नंतर मधल्या काळात माझा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. म्हणूनच मला त्याला ओळखणे अवघड गेले. त्याने त्या अंधाऱ्या, पावसाळी रात्री मला कसे ओळखले असेल याचेच मला आश्चर्य वाटत राहिले.

तो आता मोठा चित्रकार झाला होता. का ते त्याच्या बंगल्यातल्या भिंतीवर लावलेली अप्रतिम चित्रे पाहूनच कळत होतं. विलक्षण जादू होती त्याच्या चित्रांमध्ये! निसर्गचित्र असेल तर एकटक त्याकडे बघत बसावं असं वाटे. काही वेळाने आपण त्या चित्रातल्या निसर्गाचा एक भाग बनलोय असा भास व्हायचा. एक प्रकारची नजरबंदी होऊन जायची. केवळ निसर्गचित्रच नव्हे तर माणसांची..समुदायाची, एखाद्या विशिष्ट प्रसंगाची त्याने रेखाटलेली चित्रेही मला तितकीच मंत्रमुग्ध करुन गेली.

चित्रातल्या व्यक्ती, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याने इतके जिवंतपणे रेखाटले होते की एखादा खराखुरा प्रसंगच आपल्या डोळ्यासमोर घडतोय असं वाटावं ! त्यातल्या एका सगळ्यात मोठ्या आकाराच्या एका चित्राने माझ्या मनाचा ठाव घेतला. जवळपास अर्धी भिंत व्यापेल एव्हढं मोठं ते चित्र होतं. असं काय होतं त्या चित्रात?

तसं बघायला गेलं तर त्याने त्या चित्रात एक साधाच प्रसंग रेखाटला होता. एका रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या टेबलवर वेगवेगळ्या प्रकारची माणसे खाण्यापिण्याचा आनंद घेत बसली आहेत. बॅकग्राऊंडला मंद संगीत चालू असावं असा भास होत होता. वेटर फक्त अधूनमधून येऊन ऑर्डर घेत-देत आहेत. प्रत्येक टेबल एक छोटंसं विश्व बनलं आहे. मग त्यात एका टेबलवर चार जीवलग मित्र छान गप्पा मारत आहेत..तर दुसऱ्या एका टेबलवर एक चौकोनी कुटुंब तिथल्या वातावरणाचा आणि खाण्याचा आनंद घेत आहे तर कोपऱ्यातल्या एका टेबलवर एक प्रियकर-प्रेयसी एकांतात प्रेमाची उब अनुभवत आहेत.. मनाला अतिशय प्रसन्न करणारं ते चित्र मला विशेष आवडलं. पण त्याचं नक्की कारण मलाही नाही सांगता येणार..

योगायोगाने मी ज्या खोलीत झोपणार होतो तिथल्याच भिंतीवर ते चित्र लावलं होतं. किंबहुना मला ते चित्र आवडल्याने त्याने माझी त्या खोलीत सोय केली असावी. खोली कसली, एक छोटं दालनच होतं ते. रात्री एकदा त्या चित्राकडे बघून मी त्या दालनातले दिवे मालवले. मला सुखरुप या ठिकाणी आणल्याबद्दल देवाचे आभार मानतच मी डोळे मिटले.

सकाळी मला थोडी उशिराच जाग आली. काल सुजयबरोबर दोन पेग जास्त घेतल्याने असेल कदाचित. किंचित हँगओव्हर जाणवत होता. डोळे उघडल्यावर माझी नजर पहिल्यांदा त्या चित्राकडे गेली. सकाळच्या उन्हात त्या चित्रावरचे रंग अजूनच उठून दिसत होते. चित्रात जवळ असणाऱ्या माणसांचे चेहरे आता जास्त स्पष्ट दिसत

होते. ते बघता बघता एका जागी माझी नजर स्थिरावली आणि मी चमकलो. चित्रात जरा दूरच्या टेबलवर एकच व्यक्ती बसली होती. काऊबॉयसारखी तपकिरी रंगाची हॅट घालून. त्याने चौकड्यांचा शर्ट आणि जीन्स घातली होती. त्याच्या कमरेला बहुधा पिस्तूलही असावं. त्याचे डोळे. त्याचे ते तांबूस लालसर डोळे रोखून तो समोर बघत होता. मला तो माझ्या डोळ्यात डोळे घालून रोखून पहात असल्याचा भास झाला आणि मी अस्वस्थ झालो.. मी चटकन त्या चित्रावरून नजर हटवली. मला एकदम जाणवलं की काल मी पाहिलेल्या चित्रात तो माणूस नव्हता.. नक्कीच नव्हता. मला चांगलंच आठवतंय कारण काल ते चित्र मला खूप आवडल्याने मी ते पुन्हा पुन्हा पाहिलं होतं. मग मला फार वेळ तिथे थांबवेना. मी भरभर चालत दिवाणखान्यात जायला निघालो. मला सुजयशी त्या चित्राबद्दल बोलणं भाग होतं.

सुजय कधीचाच उठून दिवाणखाण्यात बसला होता. त्याच्या प्रसन्न हास्याने माझे टेन्शन थोडे कमी झाले आणि मी त्याला ती घटना सांगितली. तो म्हणाला, ”चल, बघू आपण!” ; म्हणून तो  माझ्याबरोबर त्या दालनात आला. तुला माहीत करुन घ्यायचं आहे ना तो कोण आहे? चल माझ्याबरोबर. असे म्हणून एकदम सुजयने माझा हात धरला आणि अक्षरशः मला थोडंस ढकलतच त्या चित्राजवळ नेले. हा काय प्रकार आहे ते मला समजेना. पण काहीतरी विचित्र घडत आहे अशी धोक्याची घंटा मनात वाजू लागली.

आम्ही दोघे आता चित्राच्या अगदी जवळ होतो. त्याने माझा हात अगदी घट्ट पकडला होता. आणि अचानक त्याने माझ्या हातावरची पकड अजून घट्ट करुन सरळ त्या चित्रावर उडी घेतली. मीही मंत्रवत तेच केले. किंबहुना ते करण्यावाचून त्याने मला काही पर्याय ठेवला नव्हता. एक अंधारा पडदा भेदून आम्ही पलीकडे आलो. आता आम्ही जणू एका नवीन जगात आलो होतो. हो, आम्ही चक्क त्या चित्रात आलो होतो ! ज्या गोष्टीची मी कधी कल्पनाही केली नव्हती ती आता प्रत्यक्षात घडत होती. मी आणि सुजय त्या रेस्टॉरंट मध्ये होतो. मंद संगीत चालू होतं.. वेटर ये-जा करत होते आणि बसलेल्या लोकांचा गलबला ऐकू येत होता. अचानक माझी नजर समोर गेली. तो हॅटवाला काऊबॉय माझ्याकडे रोखून बघत होता. त्याची भेदक नजर पाहून माझ्या जीवाचा थरकाप झाला. मी पटकन सुजयचा हात पकडायचा प्रयत्न केला. पण मघाशी त्या अंधाऱ्या पडद्यातून जाताना तो कधीचाच सुटला होता. मी सुजयकडे पाहिले.

सकाळचा प्रसन्न भाव जाऊन त्याच्या चेहऱ्यावर आता भीती दाटून आली होती. डोळे जणू प्राणयाचना करत होते. तो बहुधा त्या हॅटवाल्या माणसाला ओळखत असावा असे मला वाटले.

एकाएकी तो हॅटवाला माणूस उभा राहिला आणि कमरेचे पिस्तूल काढून त्याने हवेत एक गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून तिथे एकच गडबड उडाली. जो तो प्राण वाचवायला तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागला. बाहेर जायच्या दरवाजाजवळ एकच गर्दी झाली. मी सुजयकडे पाहिले. त्याने एकदाच माझ्याकडे डोळे भरून बघितले. त्याच्या डोळ्यातली व्याकुळता पाहून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. तेव्हढ्यात त्या हॅटवाल्या माणसाने नेम धरुन सुजयवर दोन गोळ्या झाडल्या. हा प्रसंग बघून माझा मेंदू बधिर होऊन गेला. पडता पडता सुजयने मला जवळच्या एका खिडकीकडे पळायची खूण केली. त्याला सोडून मी कसा पळू? पण तो प्राणांतिक वेदनांनी तडफडत होता आणि परत परत मला त्या खिडकीकडे जायला सांगत होता. तेव्हढ्यात तो हॅटवाला माणूस पिस्तूल रोखून माझ्या दिशेने येऊ लागला. मला काय करावं समजेना. एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मी त्या खिडकीकडे पळालो आणि त्या खिडकीतून खाली उडी मारली. 

परत एक अंधारा पडदा भेदून मी आता त्या दालनातल्या फरशीवर पडलो होतो. माझ्या समोरचे ते भले मोठे चित्र हळू हळू विरत जात तिथे एक फक्त भिंत राहिली. आणि हे काय? त्या भिंतीवर सुजयचा फोटो होता.. त्या फोटोवर बरीच धूळ जमली होती. आणि.. आणि त्या फोटोला हार घातला होता.. बहुधा काही वर्षांपूर्वी..

कुणीतरी..

मी आजूबाजूला बघितले. तो उंची बंगला नसून आता फक्त एक पडकी वास्तू होती.. जिथे कित्येक वर्षात कोणता वावर नसावा.. भिंतीचे रंग उडालेले..झुंबरे धुळीचा थर साचून काळपट पडलेली आणि भिंतींवरची चित्रे.. ती कालचीच चित्रे होती पण त्यावर धुळीची पुटं चढून ती केविलवाणी दिसत होती.. त्या पडक्या वास्तुसारखी !

 

एकदम काही विचार मनात येऊन मी उठलो आणि त्या बंगल्याबाहेर पडलो. भराभरा चालत माझ्या गाडीच्या दिशेने जाऊ लागलो. मला लवकरात लवकर सुजयच्या खुन्याचा शोध घ्यायचा होता.

© उमेश पटवर्धन

 

 

No comment

Leave a Response