Primary tabs

एच आय व्ही - एक वेगळा दृष्टीकोन

share on:

एच आय व्ही कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर नक्कीच बरे होऊन नव्याने आयुष्य जगू शकतो. समुपदेशक उमा मोमीन यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात. गोपानियतेसाठी पात्रांची नवे बदलण्यात आली आहेत.

 

शुक्रवारची जरा आळसटलेली दुपार. वीकेंड ची चाहूल शुक्रवारच्या लंचब्रेक नंतरच लागायला लागते नाही का? चहावल्याच्या वाटेकडे एक डोळा आणि रजिस्टर वरती दुसरा डोळा असं काम चालू होतं. तितक्यात फोन वाजला. अनोळखी नंबर वरून आलेला कॉल जितक्या तत्परतेने उचलतो तितक्याच तत्परतेने मी हा कॉल उचलला. पलीकडून एका पुरुषाचा आवाज आला," मॅडम, मी  माकोडे बोलतोय, साताऱ्यावरून खास तुम्हाला भेटायला आलो आहे. तुम्ही आहात का ऑफिसमध्ये?".  माकोडेना ओळखायचा प्रश्नच नव्हता. सेक्युरिटीला त्यांना सोडायला सांगितलं आणि माझं मन भूतकाळात गेलं. अगदी ११ वर्षांपूर्वी माकोडे आणि त्यांची बायको शांता मला पहिल्यांदा भेटले होते त्या दिवसापर्यंत.

माकोडे हे साताऱ्याचे एक सुखवस्तू शेतकरी. बागायती शेती, दुधाचा जोडधंदा असं सगळं काही व्यवस्थित. नवराबायको, दोन गोजिरवाणी मुलं असं हे चौकोनी कुटुंब. सगळं काही नीट चालू होतं...पण...हा पण दरवेळी आड येतो ना? तसाच तो इथेही आला. जाधवांनी रक्तदान करायचं म्हणून आधी स्वेच्छेने केलेली एचआयव्ही  टेस्ट पॉझीटीव्ह आली होती. नारी मध्ये सगळ्या अद्ययावत  तपासण्या करण्यासाठी त्यांना माझ्याकडे पाठवलं होतं खरं, पण इथे त्यांच्या बायकोला तर त्यांचा रिपोर्ट माहीत नाही आणि माकोडे तर काही बोलायच्याही मनस्थितीत नव्हते. मग त्यांना पुढच्या तपासण्या, आमच्याकडे होणारे संशोधनं याबद्दल काय बोलणार. मग ठरवलं, स्टडीबद्दल नंतर बघू, पण माकोडे पतिपत्नीना पहिल्यांदा वास्तवात येऊ द्यावे.

आधी माकोडे यांच्याशी बोलले. खूप प्रयत्न केल्यानंतर माकोडे बोलायला लागले. त्यांच्या बोलण्यातून हे दिसून आलं की घराची सुखवस्तू परिस्थिती, खिशात खेळणारा गरजेपेक्षा जास्त पैसा आणि कॉलेज दिवसातली मस्ती यातून जे व्हायला नको झालं होतं. मित्रांच्या नादाने कॉलेज दिवसात एक दोन वेळा लालबत्ती एरिया मध्ये स्वारी भेट देऊन आली होती. आणि आता त्यांच्या गावात माकोडेच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून त्यांना सामाजिक कर्तव्य पार पाडायचे होते. पण कुठेतरी जुने दिवस आठवून, त्यांनी आधी एकदा बाहेर एचआयव्ही  तपासणी करून घ्यायचं ठरवलं. तपासणी केली आणि रिपोर्ट दुर्दैवाने  पॉझीटीव्ह आले आणि माकोडेंंच्या  पायाखालची जणू जमीनच सरकली होती. आता हे सगळं घरातल्या लोकांना, विशेषतः बायकोला सांगायचं कसं? आता मी मरणार? मग माझ्या मुलांचं काय होणार?

भीती, अपराधी पणाची भावना, अनिश्चित आयुष्य या सगळ्यातून माकोडेंंना नैराश्य आलं, की त्यांच्या डोक्यात सतत आत्महत्येचे विचार घोळू लागले होते. एक दोन वेळा घरातलं पिकावर मारायचं कीटकनाशक औषध प्यायचा देखील प्रयत्न केला, पण  मुलांचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि हिंंमत नाही झाली. घरात थांबायची इच्छा होत नव्हती, रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता, घरी खेळणारी मुलं पाहून रडू यायचं, मुलांना काही कळायचं नाही, घाबरून जायची बिचारी. बायकोला देखील ही अस्वस्थता जाणवत होती. तिनेही विचारायचा खूप प्रयत्न केले पण यांचं निर्वणीच बोलणं ऐकून तीही गांगरून गेली. या सगळ्या रोलरकोस्टर वरच्या कसरतीत, माकोडेंंनी जिथे तपासणी केली होती, तिथून त्यांना नारीमधल्या संशोधनावर माहिती मिळाली. मग कदाचित आम्ही त्यांना पूर्ण बरे करू शकू अशी आशा घेऊन ते आमच्याकडे आले होते. त्यांना खोटी आशा न दाखवता औषधोपचाराची परिणामकारकता आणि मर्यादा समजावून सांगितल्या. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीने समुपदेशन केलं. त्यांच्या बायकोला माझ्यासमोर त्यांनी स्वतः त्यांचा रिपोर्ट  सांगितला. थोड्या फार कौन्सेलिंग नंतर तिने देखील तो उमद्या मनानी स्वीकारला. माकोडेंंची  मनस्थिती नॉर्मल व्हायला अजून ४-५ वेळा त्यांना बोलवावं लागलं. कालांतराने ते आमच्या संशोधन अभ्यासात देखील सहभागी झाले. आज आमचा अभ्यास पूर्ण होऊन देखील ६ वर्ष झाली. पण अजूनही त्यांची तब्येत छान आहे.

दारावरची टकटक ऐकून मी परत भानावर आले. समोर हसतमुखाने माकोडे सपत्नीक उभे होते हातात मिठाईचा बॉक्स घेऊन. त्यांचं तितक्याच हसतमुखाने स्वागत करून त्यांना बसायला सांगितलं. पण बसायचं सोडून ते माझ्या थेट पाया पडायला लागले. वयाने माकोडे माझ्यापेक्षा मोठे असल्याने तेंव्हा मात्र मी फारच ओशाळले. तेव्हा माकोडे म्हणाले, " मॅडम, मोठा मुलगा इंजिनिअर झाला, अमेरिकेला असतो. छोटा बीएससी करत आहे. माझी मुलं आता छान स्थिरस्थावर झाली आहेत. तुम्ही तेव्हा समजावलं नसतं तर आज हा दिवस पाहायला मी जिवंत राहिलो नसतो. किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो. आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आणि माझ्या बायकोमुळे उभा आहे आणि तुम्हाला सांगतो आता दोन चार वर्षात मुलाच्या लग्नाची पत्रिका पण घेऊन येतो आणि नातवडांचे पेढे पण." नंतर शेती कशी वाढवली, छोटा मुलगा  तो पसारा अजून कसा वाढवायचा विचार करत आहे, अशा जवळपास पुढच्या १० वर्षांची स्वप्नं जाधवांच्या डोळ्यात मी त्या ५ मिनिटात पहिली.

 कॉफी पिऊन १०-१५ मिनिटांनी ते गेले, पण तेवढा वेळ मला छानशी थंडगार झुळुक अंगावरून जावी, अगदी तसं वाटत होतं.

आत्महत्येचा पर्यंत केलेल्या माणसाला मी वाचवू शकले आणि  अशा लोकांना समुपदेशनाचे काम मी करते याचे समाधान वाटले.
 

No comment

Leave a Response