Primary tabs

पाणीदार मराठी !!

share on:

मराठी भाषा वळवावी तशी वळते! याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक ठिकाणी येतोच! असेच काही मजेशीर मराठी वाक्प्रचार सांगत आहेत आपल्या लेखिका माधुरी घाटे-हळकुंडे!

 

 

यंदा पावसाने पार दाणादाण उडवून दिली. सगळ्यात मोठं नुकसान झालं ते शेतकऱ्याचं. आता तरी त्यांना सरकारी प्रयत्नांनी मदतीचा हात दिलाच पाहिजे असे विचार सुरू असतानाच एक गमतीदार विचारही मनात आला. आपण म्हणतो यंदा पावसाने आपल्या 'तोंडचे पाणी पळवले', पावसाला आवरण्यासाठी यंदा 'देव पाण्यात ठेवावे लागणार' असं वाटत होतं, एवढा पाऊस झाला. असे 'पाणी' हा शब्द असलेले अनेक वाक्प्रचार आपण मराठीत  रोज वापरतो. केवळ पाणी या एका शब्दावरूनच किती आणि शिवाय वेगवेगळ्या अर्थाचे वाक्प्रचार आपण प्रचलित मराठीत सर्रास वापरतो बघा. 

चला तर मग करायची का उजळणी? किती आठवत ते ? बघू या कोण किती पाण्यात आहे. मदत नाही घ्यायची कुणाची. कुणाच्या ओंजळीने पाणी प्यायचं नाही. मी नाही हो घेतली कुणाची मदत. तशी मी कुणाला पाणीसुद्धा मागायची नाही. आमचे तीर्थरूप मराठीचे प्राध्यापक. त्यांना जर समजलं मी पाण्यावरचे वाक्प्रचार शोधायला कुणाची मदत घेतली तर ते बिनपाण्यानेच करतील माझी. कारण आमच्या घरी मराठी पाणी भरतं ना ! चला सांगा अजून. आता पाण्यात पडलाच आहात तर करा प्रयत्न. जिद्द हवी राव. लाथ मारेन तिथे पाणी काढेन असा खाक्या हवा बघा. तरच आपण कुणालाही पाणी पाजू शकतो.  

मराठी तर आपली मातृभाषा. आपल्या जिवाभावाची. परप्रांतीय आपल्या या मराठीच्या समृद्ध वारशामुळे आपल्याला पाण्यात पाहतात, पण आपण नाही बुवा त्यांना पाणी लावत. मराठीच्या अभिमानाचं पाणी आपण त्यांना दाखवूनच देऊ या. आपली भाषा एवढी समृद्ध आणि कसदार आहे की निव्वळ 'पाणी' या एका शब्दावरच्या वाक्प्रचारांनीच असूया वाटून त्यांच्या जीवाचं पाणी पाणी व्हावं. आपल्या नादी लागण्यावर त्यांनी आता पाणी सोडलं पाहिजे.  

मराठी माणूस आपला मराठीपणा विसरत चाललाय. शत्रूलासुद्धा पाणी दाखवणारा पिंड आहे आपला. केवळ सामान्य माणूसच याला जबाबदार आहे असं नाही. सरकार दरबारीही बरंच पाणी मुरतंय. पण आता नाका-तोंडात पाणी जायची वेळ आली आहे. आपल्या मुलांना (शुद्ध) मराठीतच (कमीत कमी इंग्रजी शब्द वापरून) बोलायला लावलं पाहिजे. मराठी गाणी, गोष्टी, कविता सतत त्यांना ऐकवल्या पाहिजेत. वाचायला लावलं पाहिजे. त्यासाठी इतर भाषांचं पाणी पार तोडायचं असं नाही. पण व्यावहारिक मराठी जेव्हा घराघरातून बोलली जाईल तेव्हाच ती टिकेल, पसरेल, वापरली जाईल आणि आत्मसात होईल. आपली वाटेल. तो काळ यायला बरंच पाणी कापावं लागणार आहे.

आपल्या मातृभाषेचा आदर म्हणजे इतर भाषांना आपण पाण्यात पाहतोय असं नाही. त्या भाषांवर पाणी सोडतोय, पाणी फिरवतोय असंही नाही किंवा त्या त्या भाषेतल्या उत्तम लेखकांची प्रतिभा पाण्यात गेली असंही नाही. पण जेव्हा आपल्या मराठी घरातलं एखादं मूल स्वतःच्या आई वडिलांशी विनाकारण इंग्रजीत किंवा हिंदीत बोलतं तेव्हा जीवाचं पाणी पाणी होतं. बघा विचार करून. माझ्या या विनवणीवर पाणी नका फिरवू. मुलांना मराठीची गोडी लावा. 

बघा निव्वळ 'पाणी' या शब्दावरून प्रचलित मराठीतले किती वाक्प्रचार आज आपल्याला सापडले! एका शब्दाच्या एवढ्या छटा निर्माण करू शकणारी आपली भाषा आहे की नाही 'पाणीदार'.  किती सापडले तुम्हाला? किती पाण्यात आहात तुम्ही? आता आवरतं घेते नाहीतर आजचं लिखाण शब्दशः पाणीदार व्हायचं. दुसऱ्याच्या तोंडचं पाणी पळवेल अशी "मराठी असे आमुची मायबोली"!

चला आपलं पाणी जोखू या, मोजू या पाण्यावरचे किती  वाक्प्रचार वापरले आपण -

१  पाण्यात पडणे 

२  पाणी पाणी होणे 

३  पाण्यात जाणे 

४  (पुलाखालून) पाणी वाहून जाणे 

५  पाण्यात पाहणे 

६  पाणी नसणे (एखाद्याच्या चेहेऱ्यावर)

७  पाणी लावणे 

८  पाणी दाखवणे (गुरांना)

९  पाणी सोडणे (एखाद्या गोष्टीवर)

१० पाणी तोडणे (एखाद्या गावाचे)

११ पाण्यात असणे (कोण किती पाण्यात)

१२ पाणी कापणे (अंतर पार करणे)

१३ पाणी मुरणे 

१४ पाणी लागणे (एखाद्या विहिरीला)

१५ (दुसऱ्याच्या ओंजळीने) पाणी पिणे 

१६ डोक्यावरून पाणी जाणे 

१७ पाणीसुद्धा न मागणे 

१८ बिनपाण्याने करणे 

१९ पाणी भरणे (इंग्रजी त्याच्याकडे पाणी भरते)

२० (लाथ मारेन तिथे) पाणी काढेन 

२१ पाणी जोखणे 

२२ पाणीही न विचारणे 

२३ पाणी देणे (शस्त्राला धार लावणे/ शेताला पाणी देणे)

२४ पाणी ओतणे (प्रयत्नांवर)

२५ देव पाण्यात ठेवणे

२६ तोंडचं पाणी पळणे 

२७ बारा गावचं पाणी 

संपले की आठवतायत अजून??? 

 

 

2 Comments

  1. avatar

    Madhuri tu mhanje shabdancha Paus ch padlas..

  2. avatar

Leave a Response