Primary tabs

माझी परदेश वारी

share on:

 

 

दत्त दर्शनला जायाचं ,जायाचं .... च्या चालीवर नेदरलँडला जायाचं, जायाचं नि जायाचं हे खूप वर्ष म्हणत होते मी. आणि अखेरीस विच्छा माझी पुरी होणार असं दिसू लागलं. निमित्त झालं ते माझ्या लेकीचं नोकरी निमित्ताने हेग शहरात राहायला येणं. तिच्यासाठी देखील, नेदरलँडला जाण्याचा योग पहिल्यांदाच आला होता. गेली दहा बारा वर्षे नवरोबा ऑफिसच्या निमित्ताने नेदरलँडचा वारकरी झाला होता. त्याच्याकडून त्या देशाविषयी अफाट स्तुती आम्ही ऐकून होतो. आम्हा दोघींना मात्र त्या वारीत कधी सामील होता नाही. आता मात्र आम्ही आमच्या जीवावर ( म्हणजे लेक नोकरीच्या आणि मी लेकीच्या) वारी करत होतो.
त्यामुळे उत्साह अमाप होता.

"नेदरलँड हा असेल कसा प्रत्यक्षातूनी" अशी उत्सुकता मनात आणि लेकीला भेटण्याची ओढ काळजात घेऊन ह्या वारीची तयारी उत्साहात केली गेली. शेंगेन व्हिसा मिळवण्याचे सोपस्कार उरकल्यावर जीव भांड्यात पडला. के एल एम विमान कंपनीच्या ( रॉयल डच एरलाईन्स) थेट  विमानाने जायचं ठरलं. साडे आठ तासाचा प्रवास असणार होता, म्हणजे आधीच्या अमेरिकेच्या प्रवासाला लागणाऱ्या वेळेच्या निम्म्याहून कमी वेळचा. त्यामुळे उगीचच बरं वाटत होतं. माझ्या कुंडलीत "परदेश गमन विमान उड्डाण विलंब योग" इतका प्रबळ आहे की तो दर वेळी मला लाभतोच. तसेच याही वेळेस झाले आणि तब्बल चार तासाच्या विलंबानंतर आमचं विमान नेदरलँडकडे झेपावलं. विमानातल्या सुविधा चांगल्या आणि प्रत्यक्ष प्रवासाचा काळ कमी त्यामुळे फारसा त्रास न होता आम्सटरडॅमच्या स्कीफोल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. तिथून पुढे प्रवासी गाडीने अर्ध्या पाऊण तासात हेग गाठलं. जाताना रस्याच्या दोन्ही बाजूला बघता बघता माझी पुरती दमछाक झाली. गुळगुळीत स्वच्छ रस्ते आणि लांबवर पसरलेली हिरवाई याचं खूपच अप्रूप वाटत होतं. लेकीच्या घरापाशी कधी येऊन पोहोचलो कळलंदेखील नाही. हवा स्वच्छ आणि ओलसर थंड होती. युरोपियन सिझनप्रमाणे समर असला तरी पावसाला मात्र तिथे कधीही हजेरी लावण्याचा हक्क होता.

लेकीच्या हातचे गरमगरम पोहे, चहा आणि सोबत अखंड गप्पा यात वेळ कसा गेला कळलंच नाही.  आन्हिके उरकून मग सुपरमार्केटला खरेदीसाठी जायचं ठरलं. इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्कृष्ट असल्याचं ऐकून होते, त्याचा प्रत्यय आलाच सुपरमार्केटला जाताना. भाज्या फळं, इतर गोष्टी याची खरेदी (इथे ग्रोसरी म्हणायचं बरं का) करून घरी परतलो.

दुसऱ्या दिवशीपासून आमच्या भटकंतीला सुरुवात झाली. हेग शहराला लाभलेल्या सुंदर समुद्र किनाऱ्याला भेट देऊन आम्ही तिचा श्रीगणेशा केला.

© डॉ वंदना कामत

1 Comments

  1. avatar

    Very easy flowing and nicely written. Looking forward to more

Leave a Response